महिला सगळ्याच क्षेत्रात उत्तम काम करतात. आताच्या काळात असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही. चाकोरीबद्ध जीवन झुगारत काहीतरी वेगळे करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांनी स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. फार पूर्वीपासूनच काही महिलांनी आपल्या कलागुणांनी आणि अभ्यासूवृत्तीने समाजाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळवून दिला आहे. महिला घर चालवू शकते तर देशही चालवू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी.. ज्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीचा अधिक दबदबा होता त्या काळात त्यांनी देशाची धुरा हातात घेतली आणि समर्थपणे सांभाळली. राष्ट्रपती पदावर विराजमान होत उत्तम कामगिरी केलेल्या प्रतिभाताई पाटील, सध्या देशाचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्या गाथा प्रत्येकाला प्रेरणा देतील अशाच आहेत. समाजात राहून वेगळा विचार बाळगणाऱ्या अशाच काही यशस्वी महिलांच्या यशोगाथा आम्ही एकत्रित केल्या आहेत. त्या वाचून तुम्ही नक्की वेगळी वाट निवडायला हवी. अशा स्त्रीचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी महिला दिन शुभेच्छा संदेश पाठवू तुम्ही इतर महिलांना प्रेरणा देऊ शकता.
Table of Contents
सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal)
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत. त्यांचा हा यशस्वी प्रवास मुळीच सोपा नव्हता. अनाथ मुलांची सेवा करणे त्यांना वाढवणे हे तितके सोपे नाही. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून त्यांनी लहान मुलांची पोटं भरली. आजही अनाथांची माय घराघरात पोहचली असली आणि अनेक पुरस्कारांची मानकरी असली तरी देखील त्या आजही त्यांचे गत जीवन विसरलेल्या नाहीत. सिंधुताई सपकाळ यांचे लग्न वयाच्या 9 व्या वर्षी वयाने तिप्पट असलेल्या मुलाशी लावून देण्यात आले. शिकण्याची इच्छा असणाऱ्या सिंधुताईंना लग्नानंतर शिकता आले नाही. कारण त्यांच्या सासरी शिक्षणाचा गंधही नव्हता. त्यामुळे दगड फोडणे, लाकुडफाटा आणणे, शेण गोळा करणे अशी काम करता करता अभ्यासासाठी कागदांचे तुकडे जमा करायच्या आणि त्या घरी उंदरांच्या बिळात लपवून ठेवायच्या वयाच्या 18 व्या वर्षापर्यं त्यांची तीन बाळतंपणं झाली. चौथ्यांदा गरोदर असताना त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्या नवऱ्याने त्यांना घराबाहेर बेदम मारुन काढून टाकले. आईनेही नाकारल्यामुळे त्यांना पोट भरण्यासाठी भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. परभणी- नांदेड- मननाड या रेल्वे स्टेशनवर त्या भीक मागायच्या.त्यांच्या मनात आत्महत्येचा विचारही आला. पण पोटच्या पोरीला मारण्याचा गुन्हा त्यांना करायचा नव्हता. स्वभावाने जिद्दी असलेल्या सिंधुताईंनी मनाशी निश्चय केला आणि आपल्यासारख्याच अनाथ झालेल्यांना भीक मागून आणलेल्या वस्तू देऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी 1994 साली अनाथ मुलांसाठी एक संस्था स्थापन केली. पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या ठिकाणी संस्था सुरु करत त्यांच्या मुलीला त्यांनी शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केलं. समाजातील सगळ्या अनाथ मुलांना एकत्र करुन त्यांना शिकवणे आणि खाण्यापिण्याची सोय तसेत राहण्यासाठी डोक्यावर छप्पर देण्याचे काम सिंधुताईंनी एकटे केले. आता त्यांनी अनेक संस्था उभारल्या असतील पण शून्यातून त्यांनी केलेला हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम
नाव: सिंधुताई सपकाळ
जन्म: 14 नोव्हेंबर 1948, वर्धा
पुरस्कार: पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार
मिताली राज (Mithali Raj)
क्रिकेट हे क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी असताना महिला क्रिकेट टीमच्या माध्यमातून आपल्यातील क्रिकेटमधील निपुणता दाखवत महिला क्रिकेट टीमने देशातील कित्येकांची मन जिंकली आहेत. मिताली राज ही त्यापैकीच एक आवडती महिला क्रिकेटपटू म्हणजे मिताली राज. मिताली राज ही अशी खेळाडू आहे जिने 20 टी 20 मॅचेसमध्ये 2 हजारांहून अधिक रन्स केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 6 हजांराहून अधिक रन केले आहेत.मितालीचा जन्म जोधपूरचा असून तिने लहानपणी भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने लहान असताना भरतनाट्मचे काही शोजही केले आहेत. मितालीला तिच्या घरातूनच क्रिकेटचे शिक्षण मिळाले. मितालीचे वडील धीरज डोराई हे एअरफोर्समध्ये कामाला होते. तेथून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी बँकेत काही काळासाठी नोकरी केली.. मितालीलाच त्यांनी प्रोत्साहित केले. त्यांना त्यांच्या घरातच क्रिकेटचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यामुळे तिला हे यशाचे शिखर गाठता आले.
नाव: मिताली राज
जन्म: 3 डिसेंबर 1982, जोधपूर
टेस्ट पदार्पण: 14 जानेवारी 2002
गौरी सावंत (Gauri Sawant)
महिला म्हणून जन्माला येणं म्हणजे खडतरं आयुष्य जगणं असं होत नाही. गणेश सावंत नाव घेऊन जन्माला आलेल्या मुलाला ज्यावेळी आपण पुरुष नाही तर स्त्रीचे एक रुप आहोत अशी जाणीव होऊ लागली. त्यावेळी समाज त्याच्यापासून दूर होऊ लागला. पुरुषासारखा जन्माला येऊन असे बायकांचे चाळे करणाऱ्या गणेशला लहानपणी छक्का, हिजडा नावाने हिणवले जायचे. पण तरीही त्याने स्वत:ला यापासून दूर केले नाही. लहान असताना घरी शिस्तीचे वातावरण होते. वडील पोलिस असल्यामुळे वडिलांच्या धाकातच मुलं वाढलेली होती. गणेश आणि त्याची बहीण वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती. पण गणेश जस जसा मोठा होऊ लागला त्याच्यातील ते बदल सगळ्यांनाच दिसू लागले होते. त्याच्या वडिलांनाही त्याच्या या वागण्याचा खूप राग होता. त्याच्या या वागण्यामुळे तेही फार त्रस्त होते. त्यांनी त्याला सुधारण्यासाठी अनेक डॉक्टर केले. पण त्याचे दुष्परिणाम गणेशवर होऊ लागले. त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने घर सोडले. घर सोडल्यानंतरचा त्याचा प्रवास आणखी खडतर झाला होता. पण त्याने त्याला योग्य साथ लाभत गेली आणि त्याने आयुष्याचा योग्य मार्ग स्विकारला. ऑपरेशननंतर गणेशपासून तो गौरी झाला आणि त्याच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायला सुरुवात केली. गौरी सावंतचा हा प्रवास अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे. समाजात राहात समातील लोकांमध्ये समाविष्ट होत अनेक अधिकार तृतीयपंथी समाजाने आपल्या नावी केलेले आहेत. गौरी सावंत तृतीय पंथींसाठीही एक आदर्श आहे. केवळ भीक मागण्यासाठी आणि लोकांनी त्यांना चिडवण्यासाठी त्यांचा जन्म झालेला नाही. तर आपल्यासारख्या अनेकांना भावनिक आधार देणे त्यांचे उद्दिष्ट आहे.
नाव: गौरी सावंत
जन्म: पुणे
यश: चारचौघीची दिग्दर्शक, विक्सची जाहिरात
सीमा मेहता (Seema Mehta)
सीमा मेहता या ज्वेलरी डिझायनर आणि कथ्थक डान्सर आहेत. त्यांना नुकताच नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे. नृत्यासोबतच त्या ज्वेलरी डिझायनर आहेत. ज्याप्रमाणे नृत्यामध्ये नजाकत लागते अगदी त्याचप्रमाणे दागिने घडवतानाही नाजकत लागते असे त्या म्हणतात. 1000 महिलांमधून त्यांना पुरस्कार देण्याचे कारण असे होते की, आहे त्या क्षेत्रात समाजसेवा करण्याची त्यांची ओढ. त्यांनी त्याच्या नृत्याचे धडे अशा वर्गातील मुलांना दिले. ज्यांच्यामध्ये कला आहे पण त्यांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही. सीमा मेहता या अशामुलांना शिक्षण देण्याचे काम करतात. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अनेक लहान मुलांना या क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. मेहता यांची स्वत:ची चांदम नृत्य भारती नावाची संस्था असून त्यामध्ये ज्वेलरी डिझायनिंगचे धडे दिले जातात.
नाव : सीमा मेहता
जन्म: 1976
पुरस्कार: नारी शक्ती पुरस्कार
सीमा राव (Seema Rao)
सीमा राव यांचा नव्याने परिचय करुन देण्याची काहीच गरज नाही. डॉ. सीमा राव या पहिल्या महिला कमांडो ट्रेन असून युद्धासाठी सैनिकांना तयार करण्याचे काम करतात. चाकोरीबद्ध क्षेत्रापेक्षाही वेगळे असे काम सीमा राव यांचे आहे. लढण्यासाठी तयार करण्यासोबत त्यांना मानसिक दृष्ट्या तयार करण्याचे काम डॉ. सीमा राव करतात. आतापर्यंत त्यांनी 20 हजारहून अधिक कमांडोना प्रशिक्षण दिले आहे. देशसेवेसाठी त्यांच्या कुटुंबानी बरीच वर्ष दिली असून त्यांच्या घरातील वातावरण देशसेवेने भरलेले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पैशांची अपेक्षा न करता त्यांनी हे क्षेत्र निवडून कमांडोना लढाईसाठी तयार केलेले आहे. रणांगणावर लढायला जाताना नुसतीच ताकद नाही तर युक्तीही तितकीच महत्वाची असते. शत्रूला नामोहरम करणे म्हणजे काय याचा खरा अर्थ सीमा राव यांनी प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या कमांडोना दिला आहे. त्यांची पुढील पिढीही देशासाठी अशाच पद्धतीने काम करत आहे.
नाव: डॉ. सीमा राव
जन्म: मुंबई
पुसस्कार: राष्ट्रपती पदक
स्मृती मोररका (Smriti Morarka)
एखाद्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी केवळ कमावणे हाच एक उद्देश्य असू शकत नाही. कारण काहींसाठी पैशांपेक्षाही कला आणि समाजसेवा ही फार महत्वाची असते. हातांनी विणलेल्या कपड्यांची विक्री सुरु केली. तंतुवी नावाची कंपना स्थापन करुन त्यामाध्यमातून हातांनी विणलेल्या कपड्यांची विक्री करण्यात आली. विणकाम ही कला जपण्याचे अनोके काम स्मृती मोररका यांनी केले. सुरुवातीला हाताने विणलेल्या कपड्यांची स्वस्त मिळणाऱ्या कपड्यांसोबत तुलना करण्यात आली. प त्यांनी त्याचा योग्य अभ्यास करुन यावरही विजय मिळवला. त्यांनी विणकामाची ही कला जपली आणि त्यांच्या ब्रँडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली. हातमागाला चांगले दिवस आणण्याचे काम स्मृती मोरारका यांनी केले. स्मृती मोररका यांनी हातमागच नाही तर मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यांचा हातमाग वाचवण्याचा लढा अजूनही सुरु असून त्यांनी या माध्यमातून जगभरात भारतीय कला पसरवली आहे.
नाव: स्मृती मोरारका
जन्म: कोलकाता
पुरस्कार: नारी शक्ती पुरस्कार
राहीबाई पोपरे (Raheebai Popre)
काहीतरी वेगळे करण्याचीच जिद्द प्रत्येकवेळी उरी बाळगायला नको. आपण करत असलेल्या कामातून समाजपयोगी काम करणे हे देखील तितकेच कठीण काम असते. शेती हे भारतातील सर्वात मोठा अर्थाजनाचे साधन आहे. यामध्ये वेगळेपणा आणत शेतकऱ्यांची मदत करण्याचे राहीबाई पोपरे यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यात त्या ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जातात. केमिकल्स आणि तांत्रिक शेतीच्या काळातही शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेत त्यांनी बिया जमा करण्याची पद्धत अगदी निगुतीने सुरु ठेवली. पारपंरिक शेतीचा अलबंव करत त्यांनी आतापर्यंत शेती केली आहे. पण शेतीसाठी लागणाऱ्या बियांणांची सोय करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पिकांच्या बिया जमवायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला ‘जुनं ते सोनं’ हा मूलमंत्र त्यांनी योग्य जपला आणि पारंपरिक पद्धतीने बिया जमवू लागल्या. त्याच्यांकडे 54 वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या बिया आहेत. त्यांनी आधी घरगुती पद्धतीने जतन करत त्याची शेती केली. त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागात त्यांनी बिया वाटपाला सुरुवात केली. शेतीसाठी समर्पित भावना ठेवून त्यांनी आता इतर महिलांच्या मदतीने बी जपणुकीचे काम अविरत सुरु ठेवले आहे. पाहायला गेले तर ही एखाद्यासाठी फारच सामान्य अशी गोष्ट असेल. पण एका अशिक्षित महिलेने याचे महत्व जाणून शेतीसाठी अशा पद्धतीने योगदान करणे हे सामाजासाठी आणि महिलांसाठी फारच महत्वाचे झाले आहे.
नाव: राहीबाई पोपरे
जन्म : 1964, अहमदनगर
पुरस्कार : पद्मश्री पुरस्कार, नारीशक्ती पुरस्कार
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा संदेश
चेतना सिन्हा (Chetna Sinha)
महिला या जन्मत:च काटकसरी आणि कोणताही उद्योग सांभाळण्यास सक्षम असतात. त्यांच्यामधील याच कलागुणांना वाव देण्याचे काम चेतना सिन्हा यांनी केले. मुंबई विद्यापीठातून बीकॉमचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांची पदव्युत्तर पदवी घेतली. रिझर्व्ह बँकेने त्याचा अर्ज त्यातील काही सभासद हे अशिक्षित असल्याच्या नावाखाली ज्यावेळी फेटाळला. त्यानंतर त्या पुन्हा गावाकडे वळल्या. ज्या गावाला नाकारण्यात आले होते. त्याला शिकवण्याचा वसाच त्याची घेतला. गावातील महिलांनीही त्यांना शिकवण्याची विनंती केली. त्यांनी महिलांना धडे देत पुन्हा एकदा बँकेचा अर्ज भरला आणि अशा महिलांना त्यांच्या उद्योगासाठी पैसे मिळवून दिले. माणदेशी य संस्थेअंतरर्गत त्यांनी अनेक महिलांना त्यांचा अधिकार मिळवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची एक संधी मिळवून दिली. सध्या त्यांच्यासोबत 3 लाखांहून अधिक महिल्या जोडल्या गेलेल्या आहेत. अशा महिलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना आर्थिक पाठिंबा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गृहोद्योगाला चालना मिळाली आहे. कोणत्याही उद्योगासाठी आर्थिक बाजू महत्वाची असते. जी चेतना सिन्हा यांनी महिलांना मिळवून दिली.
नाव: चेतना सिन्हा
जन्म: 21 मार्च 1959, मुंबई
पुरस्कार: नारी शक्ती पुरस्कार
सुरेखा यादव (Surekha Yadav)
मुली गाडी चालवत असेल तर आजुबाजूने जाणारे 10 जणं तरी टोमण्यादाखल गाडी चालवणारी मुलगी आहे, जरा जपून राहा असे म्हणतील. पण आताच्या काळात मुलगी दुचारी, चार चाकी, ट्रॅक्टर, विमान आणि कोणतेही वाहन अगदी सहजपणे चालवू शकतात. ज्या रेल्वेने सगळ्या देशाला जोडून ठेवले आहे. अशा रेल्वेला चालवणारी पहिली महिला पायलट अर्थात रेलचालक महिला म्हणजे सुरेखा यादव. रुळांवरुन झुकझुक करणारी गाडी,… त्या मागे धावणारे डबे आणि प्रवाशांना सुखरुप नेण्याच्या कामाची जबाबदारी घेतलेल्या सुरेखा यादव यांचा आदर्श प्रत्येक महिलेने घ्यावा असा आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अशा क्षेत्रात सुरेखा यादव यांनी आपला यशस्वी ठसा उमटवला आहे. सुरेखा यादव यांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हाता. रेल्वे बोर्डाची परिक्षा दिल्यानंतर सुरुवातीला त्यांना चाचणी म्हणून एक ते दोन स्टेशन मध्य रेल्वे चालवण्याे ट्रेनिंग देण्यात आले. त्यांचे कसब ओळखल्यानंतर हळुहळू त्यांना जास्तीचा पल्ला देण्यात आला. डेक्कन क्वीन ही गाडी चालवणाऱ्या त्या पहिला महिला पायलट होत्या. 1988 पासून त्या सेवेमध्ये रुजू झाल्या आहेत. आता त्या त्यांच्याप्रमाणेच इतर महिला लोकोमोटिव्ह पायलेटला प्रशिक्षण देण्याचे काम करतात. त्यांच्या या धीरामुळेत सध्या रेल्वेमध्ये मोटरमन पदावर अनेक महिला कार्यरत आहेत.
नाव : सुरेखा यादव
जन्म: 2 सप्टेंबर 1965, सातारा
पुरस्कार : सह्याद्री हिरकणी पुरस्कार, जिजाऊ पुरस्कार इ.
स्वाती पिरामल (Swati Piramal)
आरोग्य क्षेत्रातही महिला या फार अग्रगण्य अशा पदावर आहेत. स्वाती पिरामल हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. स्वाती पिरामल या भारतील वैज्ञानिक असून आरोग्याशी निगडीत अनेक सोयी सुविधांचा शोध त्यांनी लावला आहे. त्या पिरामल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. शहरी लोकांसाठी आरोग्य सुविधा पुरवणे नाही तर गावातील लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली. आपले हे कार्य पुढे तसेच चालत राहावे यासाठी त्यांनी या कार्यात अनेक लोकांनाही सहभागी करुन घेतले. आरोग्य क्षेत्रात त्यांचे काम वाखाणण्यासारखे आहे. ज्या काळात पोलिओची साथ पसरु लागली होती. साधारण 70 च्या दशकात लहान मुलांमध्ये ही लक्षणे दिसून येत होती. त्यावेळी स्वाती आणि त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील मैत्रिणींनी एक कँप आयोजित करुन 25,000 हून अधिक लहान मुलांना पहिल्या टप्प्यात लस दिल्या. पोलिओ हा गंभीर आजार असून लहान मुलांचे आयुष्य उद्धवस्त करु शकतो. यासाठी त्यांनी जनजागृती अभियान सुरु केले. गावातील लहान मुलांना गोळा करुन त्यांना लस देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे या क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखे आहे.
नाव: स्वाती पिरामल
जन्म : 28 मार्च 1956 , मुंबई
पुरस्कार : पद्मश्री पुरस्कार
या महिलांच्या यशोगाथा वाचा शेअर करा आणि काहीतरी नवं नक्कीच करा.या शिवाय तुम्ही स्त्री घोषवाक्य पाठवूही महिलांनाही एक नवी प्रेरणा मिळेल
Read More From Stories
जाणून घ्या बुद्ध पौर्णिमेची इत्यंभूत माहिती (Buddha Purnima Information In Marathi)
Leenal Gawade