Care

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे ‘5’ सोपे आणि नैसर्गिक उपचार

Trupti Paradkar  |  Apr 30, 2019
पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे  ‘5’ सोपे आणि नैसर्गिक उपचार

आजकाल अनेकजणींना कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सतावत असते. वीस अथवा तिशीच्या लोकांचे केस पांढरे होणं ही आजकाल एक सामान्य गोष्ट झाली आहे. वाढते प्रदूषण, धुळ, कामाचा अती ताण, भविष्याची चिंता अशा अनेक गोष्टींमुळे तुमचे केस अकाली पांढरे होऊ शकतात. पांढरे केस लपविण्यासाठी ते कलर केले जातात. मात्र केस कलर केल्यामुळे ते दिवसेंदिवस अधिकच पांढरे होत जातात. शिवाय एखादा केस पांढरा असेल तर तो मुळापासून उपटून काढल्यास त्याच्या बाजुचे केस त्यामुळे पांढरे होतात. थोडक्यात पांढऱ्या केसांची समस्या पार्लरमधील उपाय केल्यामुळे कमी होण्याऐवजी वाढतच जाते. यासाठी घरातच काही सोपे आणि घरगुती उपचार करून तुम्ही तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचवू शकता. 

यासोबत वाचा केस धुताना करू नका या ‘7’ चुका

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे ‘5’ सोपे आणि नैसर्गिक उपचार

1. केसांना मेंदी लावा

पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल युक्त कलर लावण्यापेक्षा केसांना मेंदी लावा ज्यामुळे केसांचा रंग बदलेल. यासाठी  आवळा, रिठा आणि शिकेकाई पाण्यात टाकून ते पाणी उकळा. पाणी अर्धे झाल्यावर त्या गरम पाण्याने मेंदी भिजवा. भिजवलेली मेंदी रात्रभर एखाद्या लोखंडी भाड्यांत ठेवा. सकाळी या मेंदीमध्ये आंबट दही आणि अंड्यांचा पांढरा भाग त्यात टाका आणि केसांना मेंदी लावा. केसांना मेंदी लावल्यावर ती किमान अर्धा ते एक तास केसांवर राहू द्या. मेंदी लावल्यावर केस शॉवर कॅपने झाकून ठेवा. ज्यामुळे केसांमधील मेंदी सुकणार नाही. मेंदी सुकल्यास केस धुताना केस तुटण्याची शक्यता असते. मेंदीमध्ये आवळा, रिठा आणि शिकेकाई टाकल्यामुळे केसांचे  योग्य पोषण होते. दह्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही. मेंदी लोखंडी भांड्यात भिजवल्यामुळे नैसर्गिक डाय तयार होतो आणि केस काळे दिसू लागतात.

2. आहारात प्रोटिन्सचे प्रमाण वाढवा

जर तुमच्या शरीरात मॅलेनिनची (Melanin) कमतरता असेल तर तुमचे केस लवकर पांढरे होतात. शरीरातील मॅलेनिन वाढण्यासाठी आहारात पुरेश्या प्रमाणात प्रोटिन्स वाढवा.

3. जास्वंदीचे तेल केसांना लावा

केसांचे योग्य पोषण झाले तर केस लांब आणि काळे होतात. जर तुमचे केस पांढरे होत असतील तर केसांना योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. केसगळती थांबविण्यासाठी फायदेशीर आहे जास्वंदीचे फुल. यासाठी नारळाच्या तेलात जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या टाकून ते तेल गरम करा. कोमट तेल केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने केसांना मसाज करा. केसांवर गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल घट्ट पिळून केसांना गुंडाळून ठेवा. वीस मिनीटांनी केस शॅंपू करा. नियमित केसांना या तेलाचा मसाज केल्यास केस पांढरे होण्यापासून वाचवता येतील.

4. कांदा आणि लिंबाचा रस केसांना लावा

कांद्याच्या रसामुळे तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबवता येतात. शिवाय यामुळे तुमचे केस गळणेदेखील कमी होते. यासाठी कांद्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांच्या मुळांना लावा आणि वीस मिनीटांनी केस धुवून टाका.

5. आवळा रस, बदाम तेल आणि लिंबाचा रस केसांना लावा

केसांना पांढरे होण्यापासून थांबविण्यासाठी हा एक उत्तम आणि सोपा उपाय आहे. यासाठी आवळा रस, बदामाचे तेल आणि लिंबाचा रस समप्रमाणात घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करा. अर्धा तासाने केस शॅंपू करा. आठवड्यातून तीनदा हा प्रयोग केल्यामुळे तुमचे केस पांढरे होणे थांबू शकते.

अधिक विस्तृत माहितीसाठी वाचा पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय (Home Remedies For Black Hair In Marathi)

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From Care