लाईफस्टाईल

उन्हाळ्यात अजिबात खाऊ नका ‘या’ गोष्टी, होतो वाईट परिणाम

Dipali NaphadeDipali Naphade  |  Mar 27, 2019
उन्हाळ्यात अजिबात खाऊ नका ‘या’ गोष्टी, होतो वाईट परिणाम

होळी संपली आणि उन्हाने अक्षरशः आपलं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये वातारवण पूर्ण तापू लागलंय. अशा उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तसंही उन्हाळ्यात गरमीमुळे काहीही खावं असं वाटत नाही. पण हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष द्यायला हवं. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जे खाल त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. वास्तविक उन्हाळ्याच्या दिवसात असे काही पदार्थ असतात जे आपल्या शरीरामध्ये उष्णता अधिक वाढवातात. त्यामुळे या हंगामात अशा स्वरूपाचे पदार्थ खाणं टाळायला हवं. भरपूर पाणी प्या आणि भरपूर फळं खा ज्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असेल. अशा पदार्थांमुळे तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. जाणून घेऊया उन्हाळ्यामध्ये असे कोणते पदार्थ आहेत ज्यापासून आपण सर्वांनीच लांब राहायला हवं.

तळलेले आणि मसालेदार पदार्थ

samosa

हा हिवाळा नाहीये की, तुम्ही समोसा, कचोरी, तळलेली भजी खाणार आणि तुम्हाला हे पदार्थ पचतील. उन्हाळ्यात विशेषतः तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ खात असाल तर तुम्ही त्यापासून जरा लांबच राहायला हवं. अन्यथा बद्धकोष्ठ, अपचन, पोटदुखी आणि कमी झोप अशा समस्या होतात. या समस्यांपासून दूर राहायचं असेल उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे पदार्थ खाणं टाळा.

स्ट्रीट आणि जंक फूड

उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर विकलं जाणारं अर्थात स्ट्रीट फूड उन्हाळ्यात खाणं टाळा. कारण हे पदार्थ उन्हामुळे लवकर खराब होतात ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खूपच वाईट होतं. शिवाय जंक फूड अर्थात बर्गर, पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज अशा तऱ्हेच्या पदार्थांमुळे पोट खराब होतं. परिणामस्वरूप फूड पॉईझन होण्याची शक्यता वाढते. शिवाय हे पदार्थ सकाळी करून ठेवलेले असतात. उन्हाळ्यामध्ये ताजे पदार्थ खाण्यावर जास्त भर देण्याची गरज असते. शिवाय तेलकट पदार्थ टाळण्याचीही गरज असते.

Also Read About टॅन काढण्याची उत्पादने

चहा आणि  कॉफी कमी प्या

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चहा आणि कॉफी पिण्यामुळे शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते. तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये चहा आणि कॉफी अशा पेयांपासून दूर राहा. तुम्ही अगदीच या दोन्ही पेयांशिवाय राहू शकत नसाल तर दिवसातून केवळ एकदाच या पेयांचं सेवन करू शकता.

मसाल्यांमुळे होऊ शकतं नुकसान

मसाल्यांशिवाय जेवणात स्वाद अर्थात चव येत नाही हे खरं आहे. पण म्हणतात ना जान है तो जहान है. या उक्तीप्रमाणे मिरची, आलं, काळी मिरी, जिरं आणि दालचिनी अशा स्वरूपचे मसाले आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. तसंच या मसाल्यांमुळे तुमच्या शरीरामध्ये अलर्जी निर्माण होते. शिवाय तुम्हाला त्वचारोग होण्याची शक्यताही निर्माण होते. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेणं टाळा. उन्हाळ्याचे काही महिने हे मसाले खाणं टाळा. कारण हे मसाले खाल्ले नाहीत तर तुमचं नुकसान होणार नाहीये. पण जास्त प्रमाणात खाल्लेत तर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार आहे.

नॉनव्हेज तर विसराच

उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज खाणं जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा. उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मांसाहारी खाल्ल्यास तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकतं. लाल मांस, अंडे, प्रॉन्स या सर्व पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात उष्णाता असते. बऱ्याच लोकांना लाल मांस खाणं आवडतं. पण तुम्ही जर हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे खाल्ल्यामुळे तुमचं पोट खराब होतं. तसंच यामुळे डायरिया होण्याचीदेखील भीती असते.

ड्रायफ्रूट्स तर अजिबात नाही

तसं तर ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी चांगले असतात. पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही गरजेपेक्षा जास्त ड्रायफ्रूट्स खाल्लेत तर ते चांगलं नाही. कारण ड्रायफ्रूट्स तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण करतात. यामुळे तुमच्या शरीरावर खाज आणि जळजळसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

फोटो सौजन्य – Instagram

हेदेखील वाचा –

उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी

घरगुती उपायांनी घालवता येईल शरीरावरील टॅन

रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

Read More From लाईफस्टाईल