श्री गणेशाच्या जन्मदिवसाला आता काही तासांचा अवधी बाकी आहे. संपूर्ण भारतभर गणशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतो. आपल्यापैकी प्रत्येकालाच गणेश चतुर्थीची माहिती असते. प्रत्येकजण एकमेकांना आवर्जून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतात. आपले गणराज हे माता पार्वती आणि शंकर भगवान यांचे पुत्र आहेत. ज्याच्या जन्माबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. ज्याचा उल्लेख वराहपुराण आणि शिवपुराणामध्ये आढळतो. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या कथा नक्की वाचा.
पहिली कथा
वराहपुराणानुसार भगवान शंकराने गणपतीला पंचतत्त्वांनी बनवलं आहे. जेव्हा भगवान शंकर गणेशाला घडवत होते तेव्हा त्यांनी विशिष्ट आणि अत्यंत रूपवान असं रूप बाप्पाला दिलं. ही बातमी देवीदेवतांना मिळाली. त्यांना जेव्हा गणेशाच्या रूपाबाबत आणि वैशिष्ट्यांबाबत कळलं तेव्हा त्यांना भीती वाटू लागली की, गणपतीच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनेल. ही भीती भगवान शंकरांना कळली, ज्यानंतर त्यांनी गणपतीला लंबोदर केलं आणि हत्तीचं तोंड लावलं.
दुसरी कथा
शिवपुराणातील कथा यापेक्षा वेगळी आहे. या कथेनुसार माता पार्वतीने आपल्या शरीराला हळद लावली होती. जेव्हा त्या शरीरावरची हळद उतरवत होत्या तेव्हा त्यांनी एक पुतळा बनवला. ज्या पुतळ्यांमध्ये त्याने प्राण घातले. अशाप्रकारे विनायकाची निर्मिती झाली. यानंतर माता पार्वतीने गणेशाला आदेश दिला की, तू दारावर उभा राहून पहारा दे आणि माझे रक्षण कर. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. काही वेळानंतर जेव्हा शंकर भगवान आले तेव्हा त्यांनी गणेशाला सांगितले की, मला पार्वतीला भेटायचे आहे. ज्याला गणेशाने नकार दिला. शंकराला माहीत नव्हते की, हा कोण आहे. दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर युद्धात झाले. या दरम्यान शंकर भगवानांनी त्रिशूळ काढला आणि गणपतीचे डोके उडवले. जेव्हा माता पार्वतीला हे कळले तेव्हा ती बाहेर आली आणि रडू लागली. तिने शिवजींना म्हटले की, तुम्ही माझ्या मुलाचा शिरच्छेद केला. शिवजी म्हणाले हा तुझा मुलगा कसा असेल. त्यानंतर पार्वतीने संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली. हे ऐकल्यावर शिवजींनी पार्वतीची समजूत घातली आणि म्हणाले की, मी प्राण तर परत देईन पण त्यासाठी एक शिर हवे. यावर त्यांनी गरूडाला सांगितले की, उत्तर दिशेला जा आणि तिकडे जे कोणी मुलं आपल्या आईकडे पाठ करून झोपले असेल त्याचे शिर घेऊन ये. गरूड जेव्हा भटकत होते तेव्हा त्यांना असं कोणीच आई आणि मुलं मिळालं नाही. शेवटी एक हत्तीण दिसली. हत्तीणीच शरीर अशाप्रकारचं असतं की, ती आपल्या मुलाकडे तोंड करू झोपू शकत नाही. गरूड तिच्या मुलाचं शिर घेऊन आले. भगवान शंकराने आपल्या मुलाच्या शरीराला ते जोडलं आणि त्यात प्राण ओतले. त्याच नामकरण केलं. अशाप्रकारे गणपतीला हत्तीचं शिर लागलं.
तिसरी कथा
श्री गणेश चालीसामध्ये वर्णन केल्याप्रमाणे माता पार्वतीने पुत्र प्राप्तीसाठी कठोर तप केलं. या तपाला प्रसन्न होऊन स्वतः श्री गणेश ब्राम्हणाचं रूप धारण करून तिथे पोचले आणि त्यांनी हे वरदान दिलं की, माता तुला गर्भधारणा केल्याविनाच दिव्य आणि बुद्धीमान अशा पुत्राची प्राप्ती होईल. असं म्हणून ते अंतर्ध्यान पावले आणि पाळण्यात बालरूपात अवतरले. चारी लोकांत आनंदाच वातावरण झालं. भगवान शंकर आणि पार्वती यांनी मोठा उत्सव ठेवला. सगळीकडून देवी, देवता, सुर, गंधर्व आणि ऋषीमुनी त्याला पाहायला येऊ लागले. शनि महाराजही तिथे पोचले. माता पार्वतीने आपल्या बालकाला सोबत येऊन त्यांचा आशिर्वाद घेण्याचा आग्रह केला. शनी महाराज आपल्या दृष्टीमुळे बालकाला पाहण्याचं टाळत होते. माता पार्वतीला वाईट वाटलं. तेव्हा पार्वती माता शनी महाराजांना म्हणाली की, तुम्हाला हा उत्सव आवडला नाही का, माझ्या बालकाचं आगमन आवडलं नाही का. तेव्हा शनीदेव बालकाला पाहण्यास पोचले. पण जसं शनीदेवांनी किचिंत दृष्टीने बालकाकडे पाहिलं. त्याचं डोकं आकाशात उडालं. उत्सवाचं रूपांतर शोकात झालं. माता पार्वती दुःखी झाली. सगळीकडे हाहाकार झाला. लगेचच गरूड चारी दिशांना उत्तम शिर आणण्यासाठी गेलं. गरूडजींनी हत्तीचं शिर आणलं. हे शिर भगवान शंकरांनी बालकाच्या शरीराला जोडून त्यात प्राण ओतले. अशाप्रकारे गणपतीचं शिर हत्तीचे झाले.
आपल्या आवडत्या बाप्पाच्या जन्माबाबतच्या या कथा तुम्हाला माहीत होत्या का, तुम्हाला या कथा कश्या वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हा सर्वांना POPxo Marathi कडून गणशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम