Diet

सावधान , हाय कोलेस्टेरॉल डाएटमुळे वाढतो अल्झायमर्सचा धोका

Vaidehi Raje  |  Mar 2, 2022
alzheimer's disease

अल्झायमर्स  हा स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.  स्मरणशक्ती कमी होणे आणि विचार करणे, समस्या सोडवणे आणि भाषा समजून घेण्यात- बोलण्यात अडचण येणे या सर्व समस्या अल्झायमर्सशी निगडित आहेत. अल्झायमर्स  हे जगभरात 12 दशलक्ष लोकांना प्रभावित करणारे मृत्यूचे 6 वे प्रमुख कारण आहे. 

अल्झायमर्सचा रुग्णांच्या आयुष्यावर होणारा परिणाम 

अल्झायमर्स  रोग ही एक वाढत जाणारी न्यूरोडीजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे ज्यामध्ये व्यक्तीची स्मृती कमी होत जाते आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या हळूहळू वाढत जातात. या आजारामुळे थेट मेंदूच प्रभावित होत असल्याने अल्झायमर्स झालेल्या व्यक्तीच्या दैनंदिन सामान्य क्रियांवरही भयंकर परिणाम होतात.  अल्झायमर्स  असलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये बीटा-अ‍ॅमाइलॉइड प्लाक तयार होतो. हा प्लाक म्हणजे प्रथिनांचे क्लस्टर्स असतात जे मज्जातंतू पेशी आणि टँगल्स यांच्यातील संप्रेषण (कम्युनिकेशन) रोखतात. टँगल्स म्हणजे मृत किंवा मरणार्‍या चेतापेशी होय. मेंदूमध्ये हा प्लाक तयार झाल्याने मज्जातंतूंच्या पेशींना होणारा पोषक पुरवठा थांबतो. नैराश्य, चिडचिड, गोंधळ आणि विसरभोळेपणा ही अल्झायमर्सची सुरुवातीची काही लक्षणे आहेत. जसजसा अल्झायमर्स  वाढत जातो तसतसे स्मरणशक्ती कमी होणे, संवादात अडचणी व तार्किक बुद्धी न चालणे या समस्या अधिक तीव्र होतात. 

हाय कोलेस्टेरॉल डाएटचा अल्झायमर्सशी संबंध 

नेचर केमिस्ट्री ट्रस्टेड सोर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिले आहे की शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल बीटा-अ‍ॅमाइलॉइड नावाच्या प्रोटीनच्या क्लस्टरसाठी उत्प्रेरक म्हणून देखील कार्य करू शकते. आपण वर बघितलेच की अल्झायमर्स  असलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये बीटा-अ‍ॅमाइलॉइड प्लाक तयार होतो.  म्हणजेच हाय कोलेस्टेरॉल डाएट असणाऱ्यांना अल्झायमर्सचा अधिक धोका संभवतो. ज्या लोकांच्या आहारात कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्सचा जास्त समावेश असतो आणि फायबर, भाज्या आणि फळे असतात त्या व्यक्तींना अल्झायमर्सचा धोका जास्त असतो. म्हणून शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे.

भाषा समजणे, स्मृती संपादन, चेहरा ओळखणे, वस्तू ओळखणे, समज आणि श्रवणविषयक माहितीवर प्रक्रिया करणे ही मेंदूच्या टेम्पोरल लोबची प्रमुख कार्ये आहेत. अल्झायमर्समध्ये मेंदूच्या टेम्पोरल लोबचेही खूप नुकसान होते. होमोसिस्टीन या न्यूरोटॉक्सिनमुळे मेंदूच्या टेम्पोरल लोबचे नुकसान होते. व्हिटॅमिन बी 12, बी 6 आणि फोलेट होमोसिस्टीनशी रिऍक्ट होऊन होमोसिस्टीन ब्रेकडाऊन करून त्यापासून आपल्या शरीराला आवश्यक असलेली इतर रसायने तयार करतात. म्हणून आहारात व्हिटॅमिन बी 12, बी 6 आणि फोलेट असायला हवे. शरीरात जर होमोसिस्टीनची लेव्हल जास्त असेल तर तुमच्या शरीराला व्हिटॅमिनची कमतरता भासते आहे. जर यावर वेळेत उपाय केले नाहीत तर हाय होमोसिस्टीनमुळे तुम्हाला स्मृतिभ्रंश, हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय करता येतात.

अल्झायमर्स  होऊ नये म्हणून कुठला आहार घ्यावा 

शारीरिक आणि मानसिक चलनवलन, योग्य ताण व्यवस्थापन यांसह मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असा संतुलित आहार घेतल्यास अल्झायमर्सचा धोका कमी होतो. जर्नल ऑफ अल्झायमर्स  डिसीजमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बीटा-कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्स हे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट आहेत, जे अल्झायमर्सशी संबंधित मेंदूच्या ऱ्हासासाठी जबाबदार असलेल्या फ्री रॅडिकल्सशी लढा देतात.  

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी लक्षणीय प्रमाणात असते तर काजू, तेलबिया आणि तृणधान्ये यांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. तसेच पिवळ्या, लाल आणि केशरी रंगाची फळे आणि भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीरात बीटा-कॅरोटीन जाते. कांदे, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, संत्री, सफरचंद आणि रताळी खाल्ल्याने आपल्याला फ्लेव्होनॉइड्स मिळतात. या सर्वांचा आहारात नियमित समावेश असायला हवा. 

जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सांगितले आहे की ज्या लोकांच्या आहारात  फोलेट आणि व्हिटॅमिन बी 12 समृद्ध अन्न असते त्यांना अल्झायमर्सचा धोका कमी असतो. पालेभाज्या, संत्री, सुकामेवा आणि शेंगा हा फोलेटचा उत्तम स्रोत आहे तर चिकन, मासे, दुग्धजन्य पदार्थ हे व्हिटॅमिन बी 12 ची गरज पूर्ण करतात. 

म्हणूनच हाय कोलेस्टेरॉल डाएट न घेता संतुलित आहार घेतला पाहिजे तसेच नियमित व्यायाम-प्राणायाम करणे देखील आवश्यक आहे.

Photo Credit- istockphoto,

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Diet