आरोग्य

पावसाळ्यात हे घरगुती उपाय करून आजारपण ठेवा दूर

Trupti Paradkar  |  Jul 1, 2019
पावसाळ्यात हे घरगुती उपाय करून आजारपण ठेवा दूर

पावसाला नुकतीच दमदार सुरूवात झाली आहे. पावसाळा हा ऋतू सर्वांच्याच आवडीचा आहे. सहाजिकच पावसाला सुरूवात झाली की पावसात भिजण्याचे आणि पावसाळी पिकनिकचे वेध अनेकांना लागतात. मात्र पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता अधिक प्रमाणात वाढते. ज्यामुळे हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक ठरतं. पावसात दूषित पाणी, जंतूसंसर्ग यामुळे साथीचे आजार लवकर पसरतात. पावसाळा कितीही आनंददायी असला तरी या ऋतूत आजारपण येण्याची शक्यतादेखील तितकीच वाढते.  म्हणूनच घरात जर लहान मुलं अथवा वृद्ध माणसं असतील तर या दिवसांमध्ये त्यांच्या आरोग्याची काळजी अधिक घेण्याची गरज असते. यासाठीच पावसाळ्यात आजारपणापासून दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच फायद्याचे ठरू शकतात.

Shutterstock

पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

नियमित कोमट पाणी प्या-

Shutterstock

पावसाळ्यामध्ये हवामानामध्ये दमटपणा वाढतो. ज्यामुळे जंतूसंसर्ग लवकर होऊ शकतो. शिवाय पचनशक्ती मंदावल्याने तुम्हाला अपचन, पोटाच्या समस्या देखील जाणवू शकतात. यासाठी सोपा उपाय म्हणजे पावसाळ्यात नियमित कोमट पाणी प्या. सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना आणि जेवणापूर्वी कोमट पाणी पिण्याची सवय लावा ज्यामुळे तुमचे आजारपणापासून रक्षण होईल. शिवाय शक्य असल्यास घराबाहेर पडताना पाण्याची बाटली जरूर न्या. ज्यामुळे बाहेरील दूषित पाण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही.

गवती चहा अथवा आल्याचा चहा घ्या-

पावसाळ्यातील थंड हवामानावर मात करण्यासाठी अनेकजण चहाचा आसरा घेतात. पाऊस पडू लागल्यावर गरमागरम, वाफाळता चहा घेण्यात एक वेगळीच मौज असते. मात्र या दिवसात वारंवार चहा घेतल्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण जर तुम्हाला चहा आवडतच असेल दिवसभरात दोन वेळा गवती चहा अथवा आल्याचा चहा घ्या. चहामध्ये साखर आणि दूधाचा वापर कमी  प्रमाणात करा. ज्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला असे आजार नक्कीच होणार नाहीत. मसाला चहासोबत तुम्ही ग्रीन टीदेखील नक्कीच घेऊ शकता.

अंघोळीच्या पाण्यामध्ये कडूलिंबाची पाने टाका-

Shutterstock

कडूलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास तुम्हाला कोणतेही त्वचेचे विकार होत नाहीत. पावसाळ्यात दूषित पाण्यातून चालल्यामुळे पाय  अथवा इतर अवयवांवर नायटा, खरूज असे त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. शिवाय ओले कपडे बराच वेळ अंगावर राहिल्यास हे विकार बळावू शकतात. यासाठी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने अथवा त्याचा रस टाका. 

हलका आहार घ्या-

पावसाळ्यात अती तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्याची कितीही इच्छा झाली तरी त्याचा मोह टाळा. कारण अशा मसालेदार पदार्थांमुळे तुम्हाला पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार आणि जड  आहार घेण्यापेक्षा हलका आणि सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा.

 

घरात आर्युर्वेदिक धूप घाला-

पावसाळ्यात घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही घरात आयुर्वेदिक धूप घालू शकता. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात धूपाचे साहित्य मिळते. अशा प्रकारचा धूप घरात दाखवल्यामुळे घरात डास अथवा जीवजंतूंचा प्रादूर्भाव होत नाही. 

खिडकीत खडे मीठ ठेवा-

घरातील खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये, बाथरूममध्ये वाटीत खडे अथवा जाडे मीठ ठेवावे. मीठामुळे घरातील वातावरण निर्जंतूक राहण्यास मदत होते. शिवाय सर्दी-खोकला झाल्यास जाड्या मीठाचा शेक घेतल्यामुळे आराम मिळतो.

बाल्कनीत तुळशीचे रोप लावा-

Shutterstock

घराच्या खिडकीत अथवा बाल्कनीमध्ये तुळशीची रोपं लावावी. भारतीय संस्कृतीत तुळशीचे झाड घरासमोर लावण्याला एक अनन्यसाधारण महत्त्व  आहे. वास्तविक तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. तुळशीचे रोप घराबाहेर लावलेले असल्यास घरातील वातावरण शूद्ध राहण्यास मदत होते. ज्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार कमी प्रमाणात होतात. शिवाय सर्दी खोकला झाल्यास पटकन तुळशीच्या पानांचा रस अथवा काढा घ्यावा. ज्यामुळे लवकर आराम मिळतो.

मधाचे चाटण घ्या-

Shutterstock

दररोज सकाळी एक चमचा मध आणि चिमूटभर हळदीचे चाटण नियमित घ्या. ज्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. कोमट पाण्यातून नियमित मध घेतल्यास पचनसमस्या देखील कमी प्रमाणात होतात. यासाठीच पावसाळ्यात घरात मध जरूर ठेवा. लहान मुलांनादेखील तुम्ही मधाचे चाटण नक्कीच देऊ शकता.

अधिक वाचा

सर्दी खोकला घरगुती उपाय (Home Remedies for Cough and Cold)

कलियुगातही वरदान ठरणारी तुळशीची पानं

कडूलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत!

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From आरोग्य