बाहेर जाऊन बर्गरसाठी नेहमीच मुलं हट्ट करत असतात. पण मुलांना जंक फूड द्यायला नको असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. पण घरच्या घरीही तुम्ही सोप्या पद्धतीने पौष्टिक बर्गर करून मुलांना देऊ शकता. जेणेकरून मुलांनाही बर्गर खाण्याचे समाधान मिळेल आणि त्यांना जंक फूड देण्यापासून तुम्हीही दूर राहाल. पण आता प्रश्न पडतो की इतका फापटपसारा कसा काय बरं स्वयंपाकघरात करायचा? तर आम्ही तुम्हाला बर्गर बनविण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहोत. तुम्हाला अगदी मुलांना मैद्याचा पाव द्यायचीही गरज नाही. तर आई म्हणून तुम्हालाही आनंद मिळेल आणि आईने बर्गर घरी बनवला आहे याचा वेगळाच आनंद मुलांनाही मिळेल. त्यामुळे तुम्ही हा प्रयत्न नक्की करून पाहा.
तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ, रेसिपी मराठीत (Rice Recipes In Marathi)
बर्गरसाठी लागणारे साहित्य
तुम्हाला जर मुलांना बाहेरील मैद्याचा पाव द्यायचा नसेल तुम्ही घरात असलेल्या ब्राऊन ब्रेडचा यासाठी वापर करू शकता. जर तुम्हाला पाव देणं चालणार असेल तर तुम्ही बाहेरून पाव घेऊन येऊ शकता. पण पावापेक्षाही ब्रेडचा वापर करणं आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरेल.
- पाव अथवा ब्राऊन ब्रेड
- बटर
- कांदा
- टॉमेटो
- चीज स्लाईस
- केचअप
बर्गरचे कटलेट बनविण्यासाठी साहित्य
- 2 उकडलेले बटाटे
- थोडेसे उकडलेले मटार
- उकडलेले गाजर आणि फरसबीचे तुकडे
- आवडत असल्यास, बीटरूट कापून उकडून घ्या
- गरम मसाला
- चाट मसाला
- आमचूर पावडर
- मीठ
- बारीक रवा (घोळण्यासाठीदेखील वेगळा असू द्यावा)
- पातळ पोहे अथवा ब्रेडक्रम्प्स
- तळण्यासाठी तेल
कटलेट बनविण्याची कृती
बटाटे उकडून सोलून घ्या आणि मॅश करा. त्यात उकडलेले मटार, गाजर-फरसबी, बीटरूट मिक्स करून व्यवस्थित स्मॅश करा. त्यात गरम मसाला, चाट मसाला, मीठ, आमचूर पावडर, थोडासा बारीक रवा, ब्रेडक्रम्प्स अथवा पातळ पोहे मिक्स करा आणि सर्व एकत्र करा. त्यानंतर त्याचे गोळे बनवा आणि तुम्हाला हवा तसा त्याचा शेप द्या. शेप दिल्यावर बारीक रवा एका ताटलीत घ्या आणि हे कटलेट्स त्यामध्ये व्यवस्थित घोळवा. बटाटा असल्यामुळे रवा त्याला व्यवस्थित चिकटतो. यामुळे अधिक कुरकुरीतपणा येतो. रवा नसल्यास, तुम्ही ब्रेडक्रम्प्समध्येही हे कटलेट्स घोळवू शकता. कटलेट्स घोळवून झाल्यावर तुम्ही गॅसवर तेल गरम करत ठेवा आणि मध्यम आचेवर कटलेट्स तळून घ्या. टिश्यू पेपरवर कटलेट्स काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)
बर्गर कसा बनवाल
तुमचे कटलेट्स तुम्ही आधी तयार करून घ्या. त्यानंतर तुम्ही तयार पाव आणले असतील तर त्याला बटर लावा आणि ब्राऊन ब्रेड असेल तर काठाच्या वाटीच्या सहाय्याने तुम्ही तो गोलाकार कापून घ्या. दोन ब्रेड असे गोलाकार कापून त्याला बटर लावा. त्यामध्ये तुम्ही कांद्याच्या चकत्या आणि टॉमेटो ठेवा. त्यावर कटलेट ठेवा आणि त्यावर चीज स्लाईस ठेवा. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही यात ऑलिव्हचा उपयोग करून घेऊ शकता. तुमचा बर्गर तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर चटणी अन्यथा केचअपसह मुलांना हा पौष्टिक आणि स्वादिष्ट बर्गर खायला द्या. मुलांना केचअपच्या सहाय्याने ब्रेडवर चेहरे बनवणं आवडतं. त्यामुळे तुम्ही हा प्रयोग करूनही त्यांना अधिक आनंद देऊ शकता. घरच्या घरी तुमचा स्वादिष्ट आणि पौष्टिक बर्गर तयार आहे. वाट कसली पाहताय हा लेख वाचल्यावर लगेचच तुम्ही घरच्या घरी असा मस्त बर्गर तयार करा आणि फोटो पोस्ट करा.
परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा