लग्नानंतर जर नवरा बायकोमध्ये वाद झाले तर घरातील मोठी माणसं म्हणतात की, एखादं मुल झालं की याचं नातं आपोआप ठीक होईल. काही प्रमाणात ही गोष्ट बरोबर आहे पण वास्तवता यापेक्षा खूप वेगळी असते. कारण नवराबायकोमध्ये समंजसपणा नसेल तर मुलं झाल्यावरच जास्त भांडणं होतात. कारण एक आई आणि एक बाबा म्हणून त्यांच्या मुलाबाबतच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि नकळत नवरा बायकोच्या नात्यात हळू हळू दुरावा जाणवू लागतो. म्हणूनच प्रश्न निर्माण होतं की आधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यामध्ये असा काय बदल होतो ज्यामुळे अचानक दोघांच्या नात्यामध्ये इतके मोठे बदल होत जातात.
पहिल्या आणि दुसऱ्या बाळाच्या जन्मात नेमकं किती अंतर असावं
बाळाच्या जन्मानंतर पतीपत्नीमध्ये वाद होण्याची कारणे –
मुलांच्या जन्मानंतर अनेक अशा गोष्टी असतात ज्यामुळे नवरा बायकोमध्ये वाद होऊन त्यांचे नाते दुरावण्याची शक्यता असते.
एकमेकांना वेळ न देणे –
बाळाच्या जन्मानंतर स्त्रीचा जास्तीत जास्त वेळ तिच्या बाळाच्या संगोपनात जातो. त्यामुळे बाळाच्या जन्माआधी जसं ते एकमेकांना वेळ देत होते तसं ते वेळ देऊ शकत नाहीत. जर नात्यातील वीण घट्ट नसेल तर त्यांच्यामध्ये फक्त या साध्या कारणामुळेही दुरावा येऊ शकतो. दिवस रात्र फक्त बाळाचं संगोपन करणं ही त्यांची जबाबदारी होते आणि एकमेकांना क्वालिटी टाईम देणं त्यांना शक्य होत नाही.
एकमेकांसोबत कमी संवाद करणं –
एकमेकांसोबत बोलण्यामुळे अनेक गोष्टी, अनेक समस्या कमी होतात. मात्र बाळ झाल्यावर एकमेकांना वेळ न दिल्यामुळे त्यांना गप्पा मारता येत नाहीत. त्यांचे बोलणे हे फक्त संसारातील प्राथमिक गोष्टींपुरतं पर्यादित राहतं. एकमेकांची सुख-दुःख वाटून न घेतल्यामुळे त्यांच्या मनात एकमेकांबद्दल असेलेला प्रेमाचा ओलावा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतरही ठरवून एकमेकांना वेळ देणं, एकमेकांशी गप्पा मारणं प्रत्येक कपलसाठी गरजेचं आहे.
योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुत होण्याची शक्यता कमी, तज्ज्ञांचे मत
शारीरिक दूरावा –
गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाच्या जन्मानंतर काही महिने नवरा बायकोमध्ये शारीरिक जवळीक होत नाही. इतके महिने सेक्स न केल्यामुळे दोघांना शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. पुढे बाळाच्या संगोपनात ते इतके व्यस्त होतात की त्यांच्यामधील शारीरिक दुरावा अधिकच वाढत जातो. सहाजिकच या गोष्टींचा नकळत त्यांच्या मनावर परिणाम होतो. ज्याचे रूपांतर भांडणात होण्याची शक्यता असते.
बाळाची जबाबदारी –
आजकाल घरातील सर्वच कामानिमित्त बाहेर जातात. ज्यामुळे मुलांची जबाबदारी नेमकी कोणी साांभाळची हा प्रश्न निर्माण होतो. जरी मुलांना सांभाळण्यासाठी त्यांचे आजीआजोबा, मदतनीस घरात असतील तरी काही गोष्टी आईवडील म्हणून तुम्हाला कराव्याच लागतात. अशा जबाबदाऱ्या नेमक्या आई म्हणून पत्नीने पार पाडव्या की बाबा म्हणून नवऱ्याने पार पाडाव्या याबाबत वाद होण्याची शक्यता असते. दोघंही नोकरी करणारे असतील तर या गोष्टी आधीच समजूतदारपणे सोडवाव्या लागतात. नाहीतर बाळाच्या जन्मानंतर पतीपत्नीमध्ये दुरावा होण्याचे हे एक कारण नक्कीच असू शकते.