आरोग्य

चालताना अथवा धावताना धाप लागत असेल तर या टिप्स करा फॉलो

Trupti Paradkar  |  Mar 23, 2021
चालताना अथवा धावताना धाप लागत असेल तर या टिप्स करा फॉलो

व्यायाम करताना धावणं, वेगाने चालणं असे प्रकार करावे लागतात. वेगाने धावताना ह्रदय जोरजोरात पंप होते ज्यामुळे तुम्हाला धाप लागणं स्वाभाविक आहे. मात्र जर तुम्ही थोडसं धावला अथवा वेगाने चालला तरी तुम्हाला खूप धाप लागत असेल तर तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवण्याची गरज आहे. धाप लागते म्हणून चालणं अथवा धावणं सोडून देऊ नका. त्यापेक्षा आम्ही दिलेल्या या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा आणि तुमची क्षमता वाढवा. वेगाने चालताना अथवा धावताना या टिप्स केल्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल आणि धाप लागणं कमी होईल.

व्यायामाआधी वॉर्मअप करा

कोणताही कठीण व्यायाम करण्यापूर्वी आधी शरीर त्यासाठी तयार करणं खूप गरजेचं आहे. धावणं ही एक कार्डिओ प्रकारातील एक्सरसाईज आहे. यासाठीच धावण्यासाठी तुमच्या शरीराला प्राथमिक व्यायामाची गरज असते. ज्यामुळे तुमचं शरीर धावण्यासाठी सक्षम होतं. यासाठी वेगाने चालण्याआधी आणि धावण्याआधी दहा ते पंधरा मिनिटे स्ट्रेचिंग व्यायाम करायला हवेत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील तापमान हळू हळू वाढेल आणि तुम्हाला धावणं सोपे जाईल. शरीराला धावण्यासाठी अशा प्रकारे तयार केल्यामुळे तुम्हाला धाप लागणं कमी होईल. 

वेगावर द्या लक्ष

धावताना वेग खूप महत्त्वाचा असतो. जर धावायला सुरूवात केल्याबरोबर लगेच तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला वेगावर लक्ष देण्याची गरज आहे. नेहमी लक्षात ठेवा धावण्याची सुरूवातही कमी वेगाने करावी. ज्यामुळे शरीराला तुमच्या वेगासोबत कार्य करणे सोपे जाते. एकदा तुमचे शरीर वेगानुसार कार्य करू लागले की तुम्ही हळू हळू तुमचा वेग वाढवू शकता. 

श्वासावर लक्ष द्या –

व्यायाम करताना नेहमी श्वासावर लक्ष द्यायला हवं. कारण जर व्यायाम करताना तुमच्या शरीरात लयबद्ध पद्धतीने श्वास सुरू असेल तर तुमच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि शरीरावरील ताण कमी होतो. यासाठीच धावण्याची सुरूवात करताना तुमच्या श्वासावर तुमचे लक्ष असायला हवे. श्वास घेताना आणि तो बाहेर टाकताना तो लयबद्ध पद्धतीने असायला हवा. ज्यामुळे तुमची श्वसनक्रिया व्यवस्थित होतो आणि धावताना तुमच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. सहाजिकच यामुळे तुम्हाला धाप लागणं कमी होतं. श्वास कमी पडत असल्यास मध्ये मध्ये तोंडाने श्वास घेतल्यानेही चांगला  फायदा होऊ शकतो.

श्वसनाचे व्यायाम करा –

धावताना श्वास टिकवून ठेवला तरच तुमचे धावण्याचे उद्दिष्ट अथवा एखाद्ये ध्येय गाठणं शक्य होते. यासाठीच धावण्याआधी शरीर तयार करायला हवे. धावण्यामुळे शरीराप्रमाणेच मनालाही व्यायाम मिळत असतो. त्यामुळे धावताना शरीराप्रमाणेच मनावरही नियंत्रण असायला हवे. असं नियंत्रण मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे श्वसानाचे व्यायाम नियमित करणं. अनुलोम-विलोम, कपालभाती सारखे प्राणायम आणि शरीरावर योग्य ताण निर्माण करणारी  योगासने केल्यामुळे तुम्हाला धावताना श्वास टिकवून ठेवणं शक्य होईल. प्राणायमाचा फायदा तुम्हाला वेगाने चालताना, खूप वेळ बोलण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. यासाठीच तुमच्या डेली रूटिनमध्ये प्राणायमाला स्थान द्या.  

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

सायकल चालवण्याचे वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling In Marathi)

पोहण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Swimming Benefits In Marathi)

जाणून घ्या ‘वॉकिंग मेडिटेशन’ कसं करावं आणि त्याचे फायदे

Read More From आरोग्य