केस

ब्लो ड्रायर शिवाय असे कोरडे करा केस, दिसतील चमकदार

Trupti Paradkar  |  Aug 25, 2021
how to dry hair without blow dryer

केस धुणे आणि केस सुकवणे ही एक मोठी प्रक्रिया असल्यामुळे नेहमी ठरवून केस धुतले जातात. बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी अथवा रात्री निवांत असताना केस धुणे सोयीचे असते. मात्र जर अचानक घाईत असताना केस धुवावे लागले. तर ते सुकवण्यासाठी हेअर ड्रायरची मदत घेतली जाते. ब्लो ड्राय केल्यामुळे केस सेट जरी होत असले तरी असे सुकवलेले केस लवकर तुटतात. तुमच्या केसांमध्ये  कोरडेपणामुळे जास्त गुंता होतो. याला कारण केस ड्रायरने सुकवणे असू शकतं. यासाठीच जाणून घ्या ब्लो ड्रायरशिवाय घाईत असताना केस कसे सुकवावे.

वापरा जुना टी शर्ट

अंघोळ केल्यावर टर्कीशच्या टॉवेलने घट्ट बांधून अथवा घासून केस  पुसण्याची अनेकींना सवय असते. मात्र असे केस सुकवले तर तुमचे केस तुटून नाजूक होतात. टॉवेलने केस लवकर सुकतात मात्र ते तुटण्याची जास्त शक्यता असते. पण म्हणूनच केस सुकवण्यासाठी बऱ्याचदा ड्रायरची मदत घेतली जाते. मात्र तुम्ही केस पुसण्यासाठी तुमचा एखादा  जुना टी शर्ट वापरू शकता. कारण टी शर्टचे कापड मऊ असते. ज्यामुळे तुमचे केसातील पाणी हे कापड शोषून घेते आणि केस लवकर कोरडे होतात. 

कंडिशनर लावण्याआधी केस विंचरा

केसांना कंडिशनर लावण्यामुळे तुमचे केस मऊ तर होतातच शिवाय तुमचे लवकर सुकतात. कारण कंडिशनरमध्ये तुमच्या केसांच्या वरील भागाला कोट केले जाते. ज्यामुळे त्यावर पाणी थांबत नाही. यासाठी शॅम्पू नंतर कंडिशनर लावण्याआधी केस जाड दाताच्या  कंगव्याने विंचरून घ्या. त्यानंतर ते टी शर्टने पुसून कोरडे करा आणि  मग केसांना कंडिशनर लावा.

घरगुती उपाय करून तुमचे केस करा डिटॉक्स, जाणून घ्या पद्धत

मायक्रो फायबर टॉवेल वापरा

केस कोरडे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ओले केस पुसण्यासाठी मायक्रो फायबर टॉवेल वापरणे. या टॉवेलमुळे केस लवकर कोरडे होतात आणि तुटत नाहीत. टॉवेल खरखरीत नसल्यामुळे केस तुटून गळण्याची शक्यता कमी असते. शिवाय या टॉवेलमुळे केस अती प्रमाणात कोरडे होणे थांबवता येते. 

केस गळत असतील तर वापरा भृंगराज तेल, जाणून घ्या फायदे

जर केस ब्लो ड्राय करायचे असतीलच तर या टिप्स करा फॉलो –

केस सेट करण्यासाठी जर तुम्ही ड्रायर वापरणार असाल तर लक्षात ठेवा ड्रायरचे तापमान कमी असेल अशा पद्धतीने सेट करा. शिवाय केस सेट करण्यासाठी योग्य हेअर ब्रशचा वापर करा. केस सेट करण्यापूर्वी केसांवर योग्य हेअर सीरम लावा. ज्यामुळे केसांवर सीरमचा  कोट तयार होईल आणि केसांचे नुकसान होणार नाही. 

लांब केस असतील तर अशी घ्या काळजी, या चुका पडतील महागात

या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समधून जरूर कळवा.

Read More From केस