Weight Loss

भाताने वाढणार नाही वजन,जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

Trupti Paradkar  |  Nov 11, 2020
भाताने वाढणार नाही वजन,जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

 

तुमचं वजन खूपच वाढलं असेल आणि त्यासाठी तुम्ही डाएट करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. कारण वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या डाएटमध्ये कमी केल्या जाणाऱ्या पदार्थांत भाताचे नाव पहिल्या क्रमांकावर असते. मात्र फक्त भात खाऊन तुमचे वजन वाढते हा एक खूप मोठा गैरसमज आहे. शिवाय तुम्हाला जर भात खाण्याची सवय असेल तर वजन कमी करण्यासाठी भात खाणे पूर्ण बंद करणं नक्कीच त्रासदायक असू शकतं. यासाठीच आम्ही तुम्हाला भात शिजवण्याबाबत आणि खाण्या अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे भात खाऊनही तुमचे वजन मुळीच वाढणार नाही.

दिवसभरात फक्त एकचवेळ भात खा –

 

जर तुम्हाला भात खूप आवडत असेल आणि भाताशिवाय तुमचं पोटच भरत नसेल तर हा उपाय अगदी बेस्ट आहे. यासाठी फक्त दुपारी भात खा आणि रात्रीच्या वेळी भात खाणे टाळा. शिवाय जेव्हा तुम्ही भात खाणार असाल तेव्हा त्यासोबत जास्त कार्बोहायड्रेट असणारा दुसरा एखादा पदार्थ खाणे टाळा. कारण भातामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. असं केल्याने तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट मिळणार नाहीत आणि तुमची भात खाण्याची ईच्छादेखील पुर्ण होईल. 

भाज्यांसोबत भात शिजवा –

 

जर भात खायचाच असेल तर तुमच्या साध्या आणि पांढऱ्याभाताला थोडं पौष्टिक पद्धतीने बनवून खा. जसं की तुमच्या भातामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या समाविष्ट करू शकता. ज्यामुळे भातासोबत तुमच्या पोटाला प्रोटिन्स आणि फायबर्स मिळतील. भात आणि भाज्या एकत्र खाण्यामुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहिल. तुमच्या भाताला अधिक पौष्टिक करण्यासाठी तुम्ही भात फरसबी, मटार, सिमला मिरची, ब्रोकोली, टोफू, पनीर अथवा चिकन यासोबत शिजवू शकता.  

Instagram

भात फ्राय करू नका –

 

फ्राईड राईस हा प्रकार सध्या सर्वांच्या आवडीचा झाला  आहे. पण असा परतलेला भात खाण्यामुळे तुमच्या  शरीराला त्याचा काहीच फायदा होत नाही. भातासोबत तेलाचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे तुमच्या शरीरातील फॅटस् वाढू लागतात. त्यामुळे शक्य असल्यास भात उकडून खा. तेलात, तुपात, मस्का अथवा क्रिममध्ये तयार केलेला भात पौष्टिक नसतो.

भात उकडताना अशी घ्या काळजी –

 

भात करण्याची एक सोपी आणि सर्वमान्य पद्धत म्हणजे तो कुकरला लावणे, मात्र ही अतिशय चुकीची पद्धत आहे. भात कुकरला लावण्यामुळे जरी तुमचा वेळ वाचत असला तरी त्यामुळे भातामधील पौष्टिक घटक कमी होतात. यासाठी भात भरपूर पाणी टाकून भांड्यामध्ये शिजवावा. शिवाय तो शिजत असताना त्यातील अतिरिक्त पाणी काढू टाका. ज्यामुळे त्यातील स्टार्च निघून जातात. भात हलका झाल्यामुळे तो पचायला हलका होतो  आणि अपचनाचा त्रास कमी होतो. शिवाय अशा प्रकारे शिजवलेला भात शरीरासाठी फायदेशीर ठरतो.

हातसडीचा भात खा –

 

जर तुम्हाला जेवताना दोन्ही वेळ भात खावासा वाटत असेल तर पॉलिश केलेल्या तांदळाचा भात खाण्याऐवजी हातसडीच्या तांदळाचा भात खा. हातसडीच्या तांदळाला एक सुंदर सुंगध आणि चव असते. शिवाय हातसडीच्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे तो खाण्यामुळे तुमचे वजन वाढत नाही..

 

अशा प्रकारे योग्य काळजी घेऊन शिजवलेला भात योग्य वेळी, प्रमाणात खाण्यामुळे तुम्हाला भात खाण्याने कोणताही त्रास होत नाही. शिवाय यामुळे तुमचे वजनही वाढत नाही, म्हणूनच आता अशा प्रकारे तुमचा आवडता भात तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

वजन कमी करण्यासाठी आहारात करा अळीवचा समावेश

आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

Read More From Weight Loss