Natural Care

कोरोनाच्या काळात मास्क वापरताना कशी घ्याल त्वचेची काळजी

Trupti Paradkar  |  Oct 19, 2020
कोरोनाच्या काळात मास्क वापरताना कशी घ्याल त्वचेची काळजी

लॉकडाऊन संपून आता जनजीवन पुन्हा एकदा नव्याने सुरळीत सुरू झालं आहे. कोरोनाच्या संक्रमणाची भीती कमी झालेली नसली तरी आता कामानिमित्त घराबाहेर पडण्याची गरज प्रत्येकालाच वाटू लागली आहे. त्यामुळे अशा काळात स्वतःची योग्य ती काळजी घेत दैनंदिन कामांना सुरूवात करणं प्रत्येकासाठी गरजेचं झालं आहे. असं असलं तरी सुरक्षेसाठी मास्क आणि सॅनिटाईझर या दोन गोष्टी प्रत्येकाने जवळ बाळगायलाच हव्या. मात्र सतत मास्क चेहऱ्यावर मास्क घातल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठीच जर तुम्ही खूप वेळ मास्क वापरत असाल तर त्वचेची योग्य ती काळजी घ्यायला मुळीच विसरू नका.

डॉ. अनीश देसाई, स्ट्रॅटेजिक मेडिकल अफेयर्स अ‍ॅड्रोइट बायोमेड लिमिटेड यांच्या मते मास्क घातलेल्या भागात लाल पट्टे, इरिटेशन, एक्ने, त्वचा काळसर होणे या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण चेहऱ्याची त्वचा इतर भागापेक्षा जास्त मऊ असते आणि मास्कचा काठ वारंवार चोळला गेल्यामुळे त्या ठिकाणी जळजळ होऊ शकते. मास्क घाललेली त्वचा संवेदनशील होते. संवेदी मज्जातंतू त्या ठिकाणी सक्रिय होतात. त्याचा त्वचेवर अधिक परिणाम होतो. बऱ्याचदा लोशन आणि क्रिम देखील ते कमी करण्यात अक्षम ठरतात. यासाठीच मास्क काढून टाकल्यानंतर चेहऱ्यावर हायपोअलर्जेनिक मॉइश्चरायझर लावा. मलम आधारित मॉइश्चरायझर लावू नका. कारण त्यात घाम आणि तेल अडकून तुमच्या समस्या अधिक वाढू शकतात.

मास्क घातल्यावर आणि काढल्यावर अशी राखा त्वचेची निगा –

निरोगी राहण्यासाठी आणि कोरोनाच्या काळातही सुंदर दिसण्यासाठी या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत.

मास्क घालताना आणि काढताना तुमचे हात स्वच्छ करा

मास्क ही जरी आता जीवनशैली झालेली असली तरी तो काढताना आणि घालताना तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी. बऱ्याचदा मास्क काढताना आपण ही काळजी घेत नाही. बाहेरून आलेल्या घाणेरड्या हातानेच चेहऱ्यावरून मास्क काढला जातो. ज्याचा परिणाम  तुमच्या त्वचेवर आणि  पर्यायाने आरोग्यावर होऊ शकतो. यासाठी घरात आल्यावर आधी हात स्वच्छ धुवा मगच चेहऱ्यावरून मास्क काढा. ज्यामुळे तुमच्या हातावरचे बॅक्टेरिआ चेहऱ्यावरील त्वचेवर जाणार नाहीत.

Shutterstock

चेहरा स्वच्छ धुवा

बाहेरून आल्यावर लगेचच अंघोळ करणे  ही आता जीवनशैलीच झाली आहे. पूर्वीपासुन आपल्या संस्कृतीत बाहेरून घरी आल्यावर अंघोळ करणे अथवा चेहरा, हात, पाय स्वच्छ करण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे बाहेरून घरी येताना अंगावर असलेले जीवजंतू नष्ट होतात. कोरोनाच्या काळात याबाबत विशेष काळजी घ्यायलाच हवी. त्वचेची काळजी घेण्यासाठी हा नियम स्वतःहून प्रत्येकाने लावून घेतला पाहिजे.

Shutterstock

मेकअप बेतानेच करा

खरंतर हा काळ मेकअपसाठी योग्यच नाही. पण तरीही जर तुम्हाला मेकअप शिवाय बाहेर जाण्याची सवय नसेल तर मेकअप ऐवजी अशा स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करा ज्यामुळे तुम्ही सुंदर तर दिसालच पण तुमच्या त्वचेचीदेखील योग्य काळजी घेतली जाईल. सनस्क्रिन लोशन, टिंट मॉईस्चराईझर अशा प्रॉडक्टने त्वचेची काळजी घ्या.

चांगल्या कापडाचे मास्क वापरा

दिवसभर खूप तास मास्क चेहऱ्यावर लावण्यामुळे श्वसनाला तर त्रास होतोच शिवाय तुमची त्वचादेखील खराब होऊ शकते. यासाठी अशाच मास्कची निवड करा ज्यामध्ये कॉटन सारखे मऊ आणि आरामदायक कापड वापरलेले असेल. अशा सुती कापडांमधून तुमच्या त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळू शकते. एक ते दोन तासाने  सुरक्षित जागी जाऊन दोन ते तीन मिनिटांसाठी मास्क काढा. ज्यामुळे त्वचेला आराम मिळेल. गाडीत बसल्यावर काही मिनिटांसाठी तुम्ही मास्क तोंडावरून काढू शकता. 

Shutterstock

मास्क स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवा

जर तुम्हाला सतत मास्क लावावा लागत असेल तर तुमचा  मास्क स्वच्छ  आणि निर्जंतूक असेल याची काळजी घ्या. कारण  मास्कमधून जीवजंतू थेट तुमच्या चेहऱ्यावर जाऊ शकतात. यासाठी सतत मास्क बदला, कापडाचे असतील तर स्वच्छ धुवा, जुने झाल्यावर त्याची योग्य ती व्हिलेवाट लावा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

फेस्टिव्ह सीझनमध्ये साबुदाण्याच्या फेसपॅकने त्वचा करा चमकदार

रविनाने सांगितलेल्या टिप्सने करा हाताचा कोरडेपणा दूर

फळांचा असा वापर करुन मिळवा तजेलदार त्वचा

Read More From Natural Care