DIY लाईफ हॅक्स

पोळ्या करा अधिक पौष्टिक, गव्हासोबत या धान्यांचाही करा समावेश

Trupti Paradkar  |  Oct 16, 2020
पोळ्या करा अधिक पौष्टिक, गव्हासोबत या धान्यांचाही करा समावेश

भारतीय खाद्यसंस्कृतीत गव्हाची पोळी हा आहारातील एक मुख्य खाद्यपदार्थ आहे. दिवसभर तुम्ही कितीही इतर पदार्थ खाल्ले तरी पोळीशिवाय पोट नक्कीच भरत नाही. इतर चटपटीत आणि आकर्षक पदार्थ खाऊन मनाला बरं वाटतं पण पोट मात्र तेव्हाच भरतं जेव्हा पानात भाजी, पोळी, वरण, भात असे पौष्टिक पदार्थ असतात. पोळीमध्ये तुमच्या शरीरासाठी पोषक आणि पचनासाठी सुलभ घटक असतात. पण कधी कधी नेहमी पोळी-भाजी खाऊनदेखील कंटाळा येतो. अशा वेळी तुमच्या पोळीला अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक करण्यासाठी तुम्ही गव्हासोबत इतर काही धान्यांचा वापर करू शकता. ज्यामुळे स्वादही बदलेल आणि पोषणही अधिक होईल. यासाठी जाणून घ्या कशी करावी पोळी अधिक पौष्टिक…

पोळ्यांसाठी गव्हाचे पीठ का वापरतात –

गव्हाच्या पिठाने बनवलेल्या पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होतात. शिवाय गव्हाच्या पिठात कार्बोहायड्रेट, प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. जर पोळ्यांसाठी कणीक मळताना गव्हाचे पीठ न चाळता वापरले तर त्यातून शरीराला पुरेसं फायबर ही मिळतं. पण पोळ्यांचा रंग काळवंडू नये अथवा त्या कडक होऊ नयेत म्हणून आजकाल सर्वजण गव्हाचे पीठ चाळून मगच मळतात. वास्तविक ही एक चुकीची पद्धत आहे. कारण यामुळे पिठातील फायबर्स निघून जातात. गव्हावरील आवरणामुळे पोळ्यांमध्ये हे नैसर्गिक आणि पौष्टिक फायबर्स येत असतात. तेव्हा शक्य असल्यास पोळ्यांसाठी न चाळतात कणीक मळा ज्यामुळे शरीराला पुरेसे फायबर्स नक्कीच मिळतील.शिवाय जर तुम्हाला पोळ्यांमधून अधिक पोषण हवं असेल गव्हाच्या पीठात इतर धान्यांचे पीठ मिसळा. ज्यामुळे तुमच्या पोळ्या मल्टीग्रेन होतील.

Instagram

यासाठी खा मल्टीग्रेन पोळ्या –

डाएट आणि खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टींमध्ये सतत बदल होत असतात. सध्या मल्टीग्रेन ब्रेड, मल्टीग्रेन बिस्किट, मल्टीग्रेन नास्ता अशा गोष्टींचे फॅड आहे. असे बाजारातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही मल्टीग्रेन पोळ्या तयार करू शकता. ज्यामुळे तुम्हाला अधिक पौष्टिक अन्न घरीच मिळू शकेल. 

Instagram

मल्टीग्रेन पीठ कसं तयार करावे –

भारतात अनेक तृणधान्ये आणि कडधान्ये पिकवली जातात. आपण भारतात राहतो त्यामुळे इथे पिकवली जाणारी सर्वच धान्ये आपल्या शरीरासाठी पोषक असतात. तुम्ही गव्हाचे पीठ मल्टीग्रेन करण्यासाठी तुमच्या आवडीच्या आणि सोयीच्या कोणत्याही धान्यांचा यामध्ये समावेश करू शकता. मात्र एक लक्षात ठेवा यामध्ये पाऊण भाग गव्हाचा असेल आणि उरलेला पाव भाग इतर धान्ये असतील. जसं की जर तुम्ही चार किलो गव्हाचे पीठ तयार करणार असाल तर त्यामध्ये एक किलो इतर धान्ये मिसळा. गव्हाचे पीठात तुम्ही सोयाबीन, चणाडाळ, ज्वारी, नाचणी, मका अशी अनेक धान्ये मिसळू शकता. गव्हाचे पीठ तयार करताना त्यात सोयाबीन मिसळल्यामुळे पोळ्या मऊ आणि  पौष्टिक होतात. अशा मल्टीग्रेन पोळ्या खाण्यामुळे लहान मुलांची वाढ चांगली होते. शारीरिक वाढ आणि मानसिक विकासासाठी आहारात सर्व प्रकारची धान्ये आणि कडधान्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घरच्या घरी हे मल्टीग्रेन पीठ तयार करू शकता. निरनिराळी पीठे एकत्र करूनही तुम्ही पोळ्यांसाठी पीठ तयार करू शकता. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

गोल आणि मऊ पोळ्या (चपात्या) बनवण्यासाठी वापरा सोप्या टिप्स

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

Read More From DIY लाईफ हॅक्स