उन्हाळा सुरु झाला की, मस्त थंड थंड गोष्टी प्यावाशा वाटतात. असंच एकदा सोशल मीडिया चाळत असताना एक अशी भन्नाट रेसिपी दिसली की वाटले ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर व्हायला हवी. आता आपण रसवंती गृहात गेलो की, आपल्याला उसाचे मोठे कांड दिसतात. त्यातून रस काढून त्यावर संस्कार करुन आपल्याला तो मस्त थंडगार आणि आल्हाददायक असा रस दिला जातो. पण मी बघितलेल्या एका व्हिडिओमध्ये चक्क उसाच्या रसात उस नव्हता! हो, हे खरे आहे. आता उसाशिवाय उसाचा हा रस अगदी तसाच चवीचा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
असा बनवा उसाशिवाय उसाचा रस
उसाचा हा रस बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एकदम सोप्प साहित्य
साहित्य: एक वाटी गूळ, पुदिन्याची पाने, काळं मीठ, लिंबाचा रस
कृती:
- एका मिक्सरच्या भांड्यात गूळ घेऊन त्यामध्ये थंड पाणी, लिंबाचा रस आणि काही पुदिन्याची पाने घालून तो चांगला वाटून घ्यायला आहे.
- यासाठी तुम्ही सेंद्रिय गुळ न वापरता काळा गुळ वापरला तर त्याचा फायदा तुम्हाला अधिक होईल. शिवाय त्याची चवही तितकीच चांगली लागेल.
- पुदिन्याची पाने तुम्हाला नको असतील तर ती तुम्ही वगळू शकता. पण त्यामध्ये पुदिना घालून बघा. त्याने चव नक्कीच वाढण्यास मदत मिळते.
- जर तुम्हाला पुदिना वाटून न घालता त्याची चव लागावी असे वाटत असेल तर तुम्ही पुदिना चिरुन देखील घालू शकता.
- हे सरबत थंड प्या. तुम्हाला उसाचा रस प्यायलासारखे नक्की वाटेल.
आता गुळापासून रस बनवणे म्हणजे तुम्ही एक प्रकारे उसाचाच एक घटक वापरत आहात. त्यामुळे हा रस चवीला चांगलाच लागतो. त्यात काळमीठं आणि लिंबाचा रस आल्यामुळे त्याची चव अजून जास्त वाढते.
उसाच्या रसाचे सेवन
उसाचा रस हा पूर्वी अनेक ठिकाणी दिसायचा. रसवंती गृह ही अगदी नाक्या नाक्यावर असायची. आता रसवंती गृहांची संख्या कमी झाली आहे. पण उन्हाळ्याच्या या दिवसात अगदी हमखास अनेक ठिकाणी तुम्हाला उसाचा रस दिसतो. अगदी पारंपरिक पद्धतीने चालणारे उसाचा रस काढणाऱ्या त्या धुंगरु लावलेल्या मशीन्स फार कमी दिसत असतील. कारण हल्ली अनेक ठिकाणी पॅक्ड ज्युस मिळतात. त्यामुळे ती मजा येत नाही. पण जर उसाचा रस प्यायचा असेल तर तुम्ही तो रसवंती गृहात प्या किंवा आम्ही सांगितलेला हा नवा प्रकार तरी नक्की ट्राय करा.
उसाच्या रसाचा हा वेगळा प्रकार तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा