DIY लाईफ हॅक्स

कपड्यावरील डाग कसे काढावे, जाणून घ्या सोपे उपाय (How To Remove Stains From Clothes)

Dipali Naphade  |  Jan 5, 2020
कपड्यावरील डाग कसे काढावे

आपले कपडे आपल्याला खूपच आवडतात. पण त्या तुमच्या प्रिय कपड्यांवर डाग पडला तर? या कल्पनेने पण नकोसं होतं. पण कधीतरी घाईगडबडीत किंवा खाताना स्वतःच्या चुकीमुळे अथवा दुसऱ्यांच्या चुकीने आपल्या आवडत्या कपड्यांवर डाग पडतातच. डाग पडल्यावर आता हा ड्रेस खराबच राहणार का? असंं वाटू लागतं. पण नाही. तुम्ही तुमच्या कपड्यांवरील डाग घरगुती उपाय करून काढून टाकू शकता. कपड्यांवर विविध प्रकारचे डाग पडत असतात. मग अशा प्रत्येक डागासाठी आपल्याला वेगळा उपाय शोधायची गरज भासते. त्याविषयीच काही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. शिवाय इतर कपड्यांबरोबरच आपल्याला सर्वांनाच पांढरे कपडेही खूप आवडतात. पण त्यांना सांभाळणं खूपच कठीण वाटतं. अनेकदा पांढऱ्या कपड्यांचा रंग पिवळा पडतो. त्याची चमक नाहीशी होतो. पण ही चमक परत आणण्यासाठी आणि कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. तुम्ही ते घरी नक्की करून पाहा. जाणून घेऊया काय आहेत उपाय –

कपड्यावरील डाग कसे काढावे (How To Remove Stains From Clothes In Marathi)

कपड्यावरील डाग कसे काढावे

आपण कपडे घालतो आणि त्यांना जपतोदेखील. पण आपल्याही नकळत बऱ्याचदा आपल्या कपड्यांवर शाईचे, हळदीचे, ग्रीसचे असे अनेक डाग लागतात. मग आपल्या आवडत्या कपड्यांवरील हे डाग काढण्यासाठी आपल्याला आपले कपडे लाँड्रीमध्ये देऊन भरपूर पैसे मोजावे लागतात. पण तुम्ही घरच्या घरीदेखील हे डाग काढू शकता. कपड्यांवरील डाग नक्की कसे काढायचे याचे अनेक घरगुती आणि सोपे उपाय आपल्याकडे आहेत. तुम्ही ते करून तर बघा. नक्कीच तुमच्या कपड्यांवरील डाग निघून जातील. कपड्यांवर कोणत्या स्वरूपाचे डाग आहेत आणि ते कशा प्रकारे घालवायचे आहेत याची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही या टिप्स तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये अंमलात आणल्यात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला सतत जास्त पैसे देऊन कपडे लाँड्रीमध्ये देण्याची गरज भासणार नाही. तसंच तुम्हाला यातून कोणत्या डागावर कोणता उपाय करायचा आहे हेदेखील पटकन कळेल.

कपड्यावरील डाग काढण्यासाठी घरगुती टिप्स (Home Remedies For Clothes Stains In Marathi)

डाग काढण्यासाठी घरगुती टिप्स

कपड्यांवरील विविध डाग घालवण्यासाठी अनेक सोपे उपाय हेत. त्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती नक्की तुम्ही तुमच्या डाग लागलेल्या कपड्यांवर करून पाहा.

1. कपड्यावरील शाईचे डाग कसे काढावे (How To Remove Ink Stain)

कपड्यावरील शाईचे डाग कसे काढावे

बऱ्याचदा कळत नकळत अंगावर बॉलपेन अथवा शाईचा डाग लागतो. पण मग हा डाग कसा घालवायचा तर यासाठी गुणकारी उपाय म्हणजे लिंबू आणि मीठ. शाईच्या डागावर लिंबू आणि मीठ चोळून काही वेळ कपडा तसाच ठेवून द्या. नंतर हा कपडा व्यवस्थित धुतल्यावर यावरील डाग निघून गेल्याचं तुम्हाला दिसून येईल. याशिवाय दुसरा उपाय म्हणजे तुमच्याकडे नेलपॉलिश रिमूव्हर तर नक्कीच असेल. नेलपॉलिश रिमूव्हर एका कापसाच्या बोळ्यावर घ्या. शाई असलेल्या डागावर हा कापसाचा बोळा घासून साफ करा. शाईचे डाग निघून जातील. तुमचा शाईचा डाग पडलेला कपडा धुतल्यास, तुम्ही पुन्हा पहिल्यासारखा हा कपडा नक्कीच वापरू शकता. तसंच शाई जेव्हा ओली असते आणि तुमच्या लगेच लक्षात आलं तर तुम्ही त्या ओल्या शाईवर मीठ लावून घासा आणि कपडा लगेच धुवा. असं केल्याने शाईचा डाग लगेच निघून जातो.

2. चिखलाचे डाग (Mud Stain)

चिखलाचे डाग

पावसाळ्यात हमखास कितीही काळजी घेतली तरीही कपड्यांवर चिखलाचे डाग येतातच. अशावेळी तुम्ही कितीही साबणाने कपडे घासले तरीही हे डाग जात नाहीत. मग अशावेळी नक्की काय करायंच तर त्यावर सोपा उपाय आहे. पाण्यात व्हिनेगर घालून हे चिखलाचे डाग असलेले कपडे भिजवून ठेवा. त्यानंतर त्या कपड्यांवरील डाग तुम्ही घासा. व्हिनेगरमुळे हमखास चिखलाचे डाग निघून जातात. याशिवाय दुसरी पद्धत म्हणजे कच्च्या बटाट्याची पेस्ट करून ती चिखलाचे डाग असलेल्या कपड्यांना लावावी. काही काळ तशीच ठेवून नंतर कपडे धुवावेत. हे डाग सहज निघून जाण्यास मदत होते. कच्चा बटाटा हा डाग घालवण्यासाठी उपयुक्त आहे. कपड्यांवर चिखलाचा डाग लागला असेल तर तो पहिले नीट स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर त्यावर कच्चा बटाटा घासा. थोड्या वेळाने कपडा साबणाने धुऊन टाका. तुमच्या कपड्याला लागलेला चिखलाचा डाग निघून स्वच्छ कपडा तुम्हाला मिळेल.

3. कपड्यावरील रंगाचे डाग कसे काढायचे (How To Remove Color Stains From Clothes)

रंगाचे डाग हे लहान मुलांच्या कपड्यांवर तर अगदी हमखास पडतात. त्यासाठी तुम्ही जास्त कपडे खसाखसा घासण्याची गरज नाही. तुमच्या घरात असलेल्या नेलपेंटच्या रिमूव्हर अथवा रॉकेलने तुम्ही हे डाग काढून टाकू शकता. ज्या जागी कपड्यावर गडद रंग असेल तिथे कोलगेट लावूनही तुम्ही डाग काढून टाकू शकता. कोलगेट त्या ठिकाणी काही वेळी कोलगेट लावून ठेवावं. कोलगेट सुकू द्यावं. कोलगेट सुकल्यावर कपडे धुतल्यास, डाग लगेच निघून जातात. 

4. चॉकलेट (Chocolate)

चॉकलेट कपड्यावरील डाग

चॉकलेट आईस्क्रिम अथवा चॉकलेट खाताना कधीतरी अचानक चॉकलेट पातळ होऊन अंगावर सांडतं. अशावेळी चॉकलेटचा गडद डाग कपड्यांवरून जाणं कठीण असतं. मग अशावेळी तुम्ही तुमचा आवडता कपडा नक्कीच दूर करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपाय करावा. चॉकलेटचा डाग काढून टाकणंही सोपं आहे. चॉकलेटचे डाग काढण्यासाठी कपडे गरम पाण्यात भिजवू नका. थंड पाण्यातच कपडे भिजवा. तसंच तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साईडदेखील वापरू शकता.

5. रक्ताचे डाग (Blood Stains)

रक्ताचे डाग पडले असतील कपड्यांवर तर ज्या ठिकाणी पडले असतील तो भाग दुधात भिजवून ठेवा अथवा पाण्यात 2 चमचे मीठ घालून ढवळून त्यात कपडा भिजत ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे रक्ताचे डाग कपड्यावर असल्यास निघून जातात. शर्टावर डाग पडल्यास, रात्रभर दुधात भिजत ठेवा. सकाळी डिटर्जेेंटने शर्ट स्वच्छ करून घ्या. अशा तऱ्हेने रक्ताचे डाग तुम्ही काढू शकता. रक्ताचे डाग काढण्यासाठी नक्कीच कठीण असतात. पण हे उपाय करून पाहिल्यास, तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. हे अतिशय सोपे घरगुती उपाय आहेत.

कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज

6. टॉमेटोचे डाग (Tomato Stains)

टॉमेटोचे डाग

कपड्यावर टॉमेटोचा रस अथवा टॉमेटो सार, टॉमेटो सॉसचा डाग पडल्यास हा डाग निघणं कठीण आहे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे आता कपडा टाकून द्यावा लागणार असंही वाटतं. पण तसं अजिबात नाही. हा डाग काढणं थोडं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. सहसा टॉमेटोचे सॉस अथवा टॉमेटोचा रस सांडल्यानंतर डाग ओला असतानाच कपडा धुणं योग्य ठरतं. डाग धुतल्यानंतर काळसर अथवा पिवळट झाला तर तुम्ही मिठाच्या गार पाण्यामध्ये हा कपडा साधारण 10-15 मिनिट्स भिजत ठेवा. घामाचे पिवळे डाग जसे या मिठाच्या गार पाण्याने जातात तसाच टॉमेटोचा डाग जाण्यासही याची मदत होते. तसंच कपडा जास्त वेळ घासत राहावा लागत नाही. त्यामुळे हा पटकन करता येणारा उपाय आहे.

7. रेड वाईन (Red Wine)

रेड वाईनचा डाग हा कपड्यावरून काढणं थोडं कठीण होतं. त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणून चुन्याचा वापर करू शकता. चुना वापरण्यापूर्वी कपड्यावर जिथे रेड वाईनचा डाग पडला आहे तो भाग व्यवस्थित धुऊन घ्या. त्यानंतर त्यावर चुन्याची पेस्ट लावा. ती पेस्ट वाळू द्यावी. त्यानंतर पुन्हा एकदा तो कपडा नीट व्यवस्थित डिटर्जंटने धुऊन घ्यावा. रेड वाईनचा न निघणारा डाग चुन्याची पेस्ट लावल्यास लवकर निघून जातो. तसंच धुवायलाही जास्त त्रास होत नाही.

8. चहा आणि कॉफीचे डाग (Tea And Coffee)

चहा आणि कॉफीचे डाग

असा एकही माणूस नाही ज्याच्या कपड्यांवर चहा आणि कॉफीचे डाग पडले नसतील. हे डाग थोडे जिद्दी असतात. त्यामुळे हे डाग काढण्यासाठी बोरँक्स पावडर वापरता येते. तसंच तुम्ही हा डाग लागलेला कपडा पहिल्यांदा स्वच्छ धुवा आणि मग जिथे डाग पडला आहे तिथे ही पावडर लावा. दुसरी पद्धत म्हणजे या डागावर मीठ चोळा नाहीतर कपडा पसरट बशीमध्ये ठेवा आणि त्यावर ग्लिसरीन लावा. हा कपडा पूर्ण एक दिवस तसाच राहू द्यावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुवावा. दुसऱ्या दिवशी यावरील चहा आणि कॉफीचा डाग निघून जातो. त्यावर कोणत्याही प्रकारचं निशाणही राहात नाही. 

तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर

9. हळदीचे डाग काढणे (Turmeric Stains)

हळदीचे डाग कसे काढावे

हळदीचा डाग कधीही जात नाही असं म्हटलं जातं. पण यावर उपाय म्हणजे व्हिनेगर. तुम्ही हळदीचा डाग असणाऱ्या ठिकाणी व्हिनेगर किंवा लिंंबू लावा आणि नंतर कपडे धुण्याच्या पावडरने कपडे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवा. हळदीचे डागही तुम्हाला कपड्यांवर दिसणार नाहीत. दुसरा उपाय म्हणजे कपडे धुण्याची कोरडी पावडर तुम्ही या डागावर लावा आणि त्यानंतर साध्या साबणाने कपडे स्वच्छ धुवा. हे डाग निघून जातात. तसंच हळदीचा डाग पडल्यावर कपडा उन्हात वाळत घातल्यास हा डाग उडून जातो. हळदीचा डाग पडलेला कपडा जर मिठाच्या गार पाण्यात भिजत ठेवला आणि मग धुतला तर हा डाग निघून जाण्यास मदत होते.

10. तेलकट डागांसाठी टाल्कम पावडर (Talcum Powder For Oily Skin)

तेलकट डागांसाठी टाल्कम पावडर

तुम्हाला हा उपाय वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हा प्रयोग नक्की करून पाहा. तुमच्या कोणत्याही कपड्यावर जर तेलकट डाग लागले असतील तर तुम्ही त्या कपड्यावर डाग पडलेल्या ठिकाणी टाल्कम पावडर चोळा. त्यानंतर पूर्ण एक दिवस हा कपडा टाल्कम पावडर लावून तसाच ठेऊन द्या. दुसऱ्या दिवशी कपडा धुवा आणि पाहा जादू! असं केल्याने तुमच्या कपड्यांना लागलेला तेलकट डाग नक्कीच निघून गेला असेल.

Woolen clothes care tips: लोकरीचे कपडे धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

11. टूटपेस्ट आणि डिटर्जंटची कमाल (Use Of Toothpaste And Detergent)

टूटपेस्ट आणि डिटर्जंटची कमाल

कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावून ठेवा. ती त्या डागांवर सुकू द्या. टूथपेस्ट सुकल्यावर तुम्ही त्यावर डिटर्जंट लावून धुवा. डाग निघण्यासाठी याचा उपयोग होतो. टूथपेस्ट आणि डिटर्जंटचं कॉम्बिनेशन कपड्यांवरील डाग काढायला मदत करतं. तसंच हे कॉम्बिनेशन इतकं कमाल करतं की, कपड्यांवर डाग पडला होता हे जाणवूदेखील देत नाही.

12. टर्पेन्टाईनने जातात ग्रीससारखे जिद्दी डाग (Use Of Turpentine To Remove Stains)

टर्पेन्टाईनने जातात ग्रीससारखे जिद्दी डाग

ग्रीस लागल्यानंतर कपड्याचे डाग जाणारच नाहीत असं म्हटलं जातं. पण असं अजिबात नाही. ग्रीससारखे जिद्दी डागही टर्पेन्टाईन लावल्याने निघून जातात. तसंच सायकल ऑईलचे डाग असतील तर निलगिरीच्या तेलाने हे डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरतात.

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी काही सोप्या टिप्स (Easy Tips To Remove Stains In Marathi)

कपड्यांवर इतरही काही डाग पडत असतात ते काढण्यासाठी काही सोप्या टिप्स – 

प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. कपड्याचे डाग काढताना कपड्याचा मूळ रंग खराब होतो का ?

तुम्ही कपड्याचे डाग नक्की कशा प्रकारे काढत आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने कपड्यांवरील डाग काढलेत तर कपड्याचा मूळ रंग खराब होत नाही. त्याचप्रमाणे कपड्यांवरील डाग काढत असताना कपडा जास्त प्रमाणात घासू नये. या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

2. घरगुती उपाय करून नक्की हे जिद्दी डाग निघतात का ?

घरगुती उपाय करून बाहेरच्या तुलनेत अतिशय लवकर कपड्यांवरील जिद्दी डाग निघतात. तसंच कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. फक्त तुम्हाला डाग काढण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी. उगीच डागावर घासत राहिल्यास, कपडा खराब होण्याची शक्यता असते.

3. तेल अथवा तुपाचा डाग पटकन जाऊ शकतो का ?

तेल अथवा तुपाचा डाग पटकन घालवायचा असल्यास, तुम्ही त्यावर टाल्कम पावडरचा वापर करावा. टाल्कम पावडरचा उपयोग करून हा डाग पटकन जाऊ शकतो. टाल्कम पावडर नसल्यास तुम्ही कणकेचा वापरही करू शकता.

Read More From DIY लाईफ हॅक्स