Budget Trips

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

Dipali Naphade  |  Jan 16, 2019
ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

बऱ्याच लोकांना फिरण्याची खूप हौस असते. पण ट्रॅव्हल करून इतर ठिकाणं बघताना आपल्याला नक्की पैसे कसे खर्च करायचे किंवा अचानक असं लक्षात येतं की, अरे आपल्याकडे आता पुरेसे पैसेच राहिले नाहीत. असा अनुभव अर्थातच कधी कोणाला येऊ नये. आता बऱ्याच ठिकाणी एटीएमचीही व्यवस्था असते. त्यामुळे आपण बऱ्याचदा जास्त पैसे आपल्याजवळ बाळगतही नाही. पण एखाद्या ट्रेकला असताना असे अनुभव हमखास येऊ शकतात आणि अशा ठिकाणी पैसे काढण्यासाठी पर्यायही नसतो. त्यामुळेच प्रवासापूर्वी पैशांची बचत करणं आणि पैशांचं व्यवस्थित आयोजन करणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रवास करत असतानादेखील तुमचं तुमच्या पाकिटाकडे व्यवस्थित लक्ष असायला हवं आणि त्यामुळे आपल्या खिशाला झेपतील आणि परवडतील असेच पर्याय आपण निवडायला हवेत आणि इतर गोष्टींसाठी पैसे वाचवायला हवेत. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स घेऊन आलो आहोत. ट्रॅव्हलयारीचे सह-संस्थापक आणि संचालक ऑरविंद लामा यांनी काही उपयुक्त टीप्स यासाठी दिल्या आहेत.

आपले पॉइंट आणि माइल्स खर्च करा:

तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा एअरलाइनच्या संदर्भात तुमच्याकडे मोफत माइल्स असतील तर त्याचा उपयोग करून प्रवासाची तिकिटे आरक्षित करा. अत्यंत हौशी प्रवाशांसाठी ट्रॅव्हेल क्रेडिट कार्ड हे नेहमीच्या डेबिट कार्डपेक्षा अधिक योग्य असते कारण क्रेडिट कार्ड्सवर असे मोफत पॉइंट मिळवण्याची अधिक संधी असते, जे विमानाचे तिकीट, हॉटेल किंवा रोख रकमेऐवजी वापरता येऊ शकतात. वेगवेगळ्या कार्ड्सवर वेगवेगळे लाभ असतात, जे वेगवेगळ्या लोकांसाठी अनुकूल असतात. त्यामुळे तिकीटांचे आरक्षण करण्यापूर्वी थोडी चौकशी करा आणि तुमच्यासाठी सर्वात योग्य ते निवडा. तुम्ही जितका क्रेडिट कार्डचा उपयोग करून प्रवास कराल, तितके जास्त तुम्ही कमवाल आणि भावी प्रवासासाठी पैसे वाचवाल. बहुतांशी ऑनलाइन ट्रॅव्हेल मार्केटप्लेसेस विमानाच्या आणि हॉटेलच्या आरक्षणासाठी विशेष पॉइंट आणि व्हर्च्युअल कॅशदेखील देतात जे तुम्ही केव्हाही वापरू शकता. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो आणि तुम्ही जास्त प्रमाणात आपले पैसे वाचवू शकता.

Also Read Best Places To Visit In India In Marathi

शेअरिंग इकॉनॉमी वापरा

तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी शेअरिंग इकॉनॉमी वापरू शकता, वाहतूक, गाईड टूर्सपासून ते जेवणखाण आणि राहण्याच्या सोयीपर्यंत सगळ्यासाठी. फॅन्सी हॉटेलऐवजी राहण्यासाठी हॉस्टेल किंवा कुणाच्या घरी राहण्याची सोय असल्यास ते पर्याय निवडा. याचं कारण असं की, अशा ठिकाणी आपल्याला अगदी स्थानिक आणि अस्सल अनुभव मिळतो आणि खर्चाच्या दृष्टीनेही ते अधिक सोयीचे होते. काऊचसर्फिंग आणि ग्लोबल फ्रीलोडर्स यांसारख्या समुदायांचे खूप मोठे नेटवर्क आहे आणि ते जगभरात राहण्याचे मोफत पर्याय सुचवतात आणि इतर प्रवाशांना भेटण्याचा, त्यांच्यात मिसळण्याचा तो एक चांगला मार्ग आहे. यामधून स्थानिक लोकांकडून जास्त माहितीही मिळते आणि बऱ्याचदा इतर चांगल्या आणि वेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा चांगला अनुभवही मिळतो. जेव्हा खूप जास्त लोक आपल्याबरोबर असतील तेव्हा नक्कीच तुमचा खर्च कमी होत असतो शेअरिंगमध्ये. पण जेव्हा तुम्ही अगदीच एक – दोन जण प्रवास करत असता आणि तुम्हाला जास्त फिरायचे असते तेव्हा कधीही शेअरिंग इकॉनॉमी या पर्यायाचा विचार करणं जास्त योग्य आहे.

ऑनलाईन ट्रॅव्हेलमध्ये सामील व्हा

फेसबुक आणि ट्रॅव्हेल ब्लॉगसाइट्सवर ऑनलाइन ट्रॅव्हेल ग्रुप आणि अन्य ग्रुप असतात. अशा ग्रुपमध्ये तुम्ही सामील होऊन प्रवासात असतानाही प्रेक्षणीय स्थळांबद्दलचे मेसेज नियमित मिळवू शकता. या ग्रुपमधील आपल्या साथी प्रवाशांकडून आणि स्थानिक लोकांकडून सर्वात स्वस्त आणि चांगले पर्याय कसे शोधावे याबाबत टीप्स मिळवता येते. ते तुम्हाला प्रवास कशाने करावा आणि कुठे राहावे याबद्दल तर माहिती देतीलच पण त्याबरोबर खाण्यापिण्याच्या उत्तम पण किफायतशीर जागांची माहिती देखील पुरवतील. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या जागेचा सुंदर आणि अस्सल अनुभव तुम्हाला मिळेल. शिवाय तुम्हाला इतर ठिकाणं पाहायची असतील तर या ग्रुपमधून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या योजना आखू शकता. शिवाय जास्तीत जास्त लोकांना एकत्र करून खर्चही कमी करू शकता.

चांगल्या डील्स शोधा

आजकाल इंटरनेटमुळे सर्व जग अगदी जवळ आलं आहे. कॅशबॅक वेबसाइट्स आणि अॅप तुम्हाला कुठे शॉपिंग करायचे असेल, ती दुकाने शोधून देतात आणि तुमच्या खरेदीवर कॅशबॅकच्या रूपात काही टक्के पैसे परतही देतात, त्यामुळे तुम्ही प्रवास करत असताना थोडी बचत करू शकता. एटीएम कार्ड वापरुन पैसे काढल्यास बँक शुल्क लागू होते. म्हणून प्रवास करत असताना नेहमी क्रेडीट कार्ड वापरणे फायद्याचे असते, जेणे करून तुमच्याकडची कॅश संपत नाही आणि त्याच वेळी काही पॉईंट्स देखील तुम्हाला मिळत राहतात. शिवाय एटीएम कार्ड वापरून डेबिट कार्डाने पैसे काढल्यास, लागणारे शुल्कही वाचते.

वाचा – New Year Plans: ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

अशा ठिकाणी खा, जेथे स्थानिक लोक खातात

खाण्यासाठीच्या जागा शोधताना पर्यटकांसाठी रचलेल्या सापळ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. लोकप्रिय ठिकाणी खाद्यपदार्थांचे भाव दुप्पट असतात आणि त्यांची गुणवत्ता अर्धी असते. रस्त्यांवर मिळणारे पदार्थ आणि लहान लहान उपाहारगृहे, जेथे स्थानिक लोक नेहमी जात असतात, ती अधिक स्वस्त आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ देतात. असाच पर्याय निवडा. त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी असते कारण खप जास्त असल्याने अन्न नेहमी ताजेच असण्याची शक्यता वाढते आणि उपचारांचा खर्चही वाचतो. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर नक्की कुठे खायला चांगलं मिळतं हे माहित नसल्यामुळे खूप गोंधळ होऊ शकतो. अशावेळी तेथील स्थानिक अशी प्रसिद्ध खाण्याची ठिकाणं कोणती याची माहिती काढून घ्या. मिलशेअरिंगडॉटकॉम आणि इटवुईथडॉटकॉम यांसारख्या वेबसाइट्स तुम्हाला घरगुती जेवणाचे पर्याय शोधण्यास मदत करतात, जेथे स्थानिक लोक आणि पर्यटक नेहमी जात असतात.

फ्री अॅक्टिव्हिटीज शोधा

कुठेही जाण्यापूर्वी जिथे फिरायला जात आहात, तिथल्या जागेचा नीट रिसर्च करा. त्या क्षेत्रामधील फ्री अॅक्टिव्हिटीज नक्की काय आहेत हे जाणून घ्या. त्यामुळे उगीच पैसै उधळण्याची गरज भासणार नाही. स्थानिक गाईडपेक्षा अभ्यास करून गेल्यास, तुम्ही स्वतः स्वतःचे गाईड बनू शकता आणि फिरण्याचा जास्त आनंद उपभोगू शकता. शिवाय अशा तऱ्हेने तुम्हाला तुमचे पैसेही वाचवता येतात. बऱ्याच ठिकाणी म्युझियम्स किंवा इतर ठिकाणी एका विशिष्ट वेळी कमी पैसे आकारले जातात. अशा वेळीच तुम्ही त्या ठिकाणी पाहायला जा. जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे बचत करू शकता.

स्थानिक दुकान अथवा शेतकऱ्यांकडून सामान घ्या

फिरायला गेल्यानंतर त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्य किंवा काही गोष्टी खरेदी करण्याचा मोह कोणालाच आवडत नाही. बाजारामध्ये अशा वस्तूंचा अव्वाच्या सव्वा भाव सांगितला जातो. मग हवं असल्यास सुद्धा हात आवरता घ्यावा लागतो. अशावेळी तुम्ही फिरत असताना तेथील स्थानिक दुकानांमधून अथवा शेतकऱ्यांकडून अशा वस्तू विकत घ्या. त्यामुळे त्यांनाही फायदा होतो आणि तुम्हालाही वस्तू स्वस्तात मिळतात. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या पैशाची अर्थातच बचत करू शकता.

पाण्याची बाटली आणि खाण्याचे पदार्थ स्वतः न्या

बऱ्याचदा बाहेरून पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. त्यामध्ये जास्त पैसे खर्च होतात. त्यापेक्षा आपण जिथे राहत आहोत, तिथूनच दोन ते तीन पाण्याच्या बाटल्या आपल्या बॅगेत भरून घ्याव्यात. शिवाय आपण प्रवास करताना काही पदार्थ आपल्याबरोबर घेतच असतो. इतर ठिकाणी ते पदार्थ महाग मिळतात. त्यामुळे फिरत असताना खूप भूक लागल्यानंतर या गोष्टी आपल्याबरोबर कायम ठेवाव्यात. त्यामुळे उगीच नको त्या ठिकाणी पैसे खर्च करावे लागत नाहीत

Also Read 7 Simple Yet Effective Ways To Save Money In Marathi

टूरिस्ट डेस्टिनेशनजवळील अन्नपदार्थ कधीच खरेदी करू नका

बऱ्याच शहरांमध्ये टूरिस्ट डेस्टिनेशनजवळील रेस्टॉरंट्समधील पदार्थांचे भाव खूपच जास्त असतात. त्यामुळे अशा ठिकाणी काहीही खाणं किंवा खरेदी करणं टाळा. त्यापेक्षा फिरून आल्यानंतर काही अंतरावरील हॉटेल्सचा आसरा घ्या. जिथे तुम्हाला कमी गर्दी आणि चांगलं अन्नही मिळेल. यामुळे तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकता. एक लक्षात ठेवा जास्त अंतरावर हॉटेल असलं तरीही त्याची गुणवत्ता पाहूनच जेवायला जा.  

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफ सीझन फिरायला जा

आपण जिथे जाणार आहोत तिथला नक्की ऑफ सीझन कोणता हे पाहून घ्या. अशा वेळी तुम्हाला जास्त गर्दी मिळत नाही हे तर आहेच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशावेळी तुमचे पैसे जास्त वाचतात. शिवाय तुम्हाला राहण्यासाठी चांगले पर्याय पटकन मिळतात आणि हंगामाच्यावेळी असणाऱ्या भावांपेक्षा फारच कमी भाव यावेळी असतात. त्यामुळे हा पर्याय नेहमी वापरा.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम 

 

Read More From Budget Trips