घर आणि बगीचा

देव्हाऱ्याची निवड करताना कधीच करु नका या चुका

Leenal Gawade  |  Sep 9, 2021
देव्हारा निवडताना

 घरात सकारात्मक उर्जा देणारी आणि आत्मविश्वास देणारी जागा म्हणजे देव्हारा. पूर्वी घरांमध्ये देवघर असायची. देवासाठी एक स्वतंत्र खोली असायची. पण आताच्या घरांमध्ये जागेची कमतरता पाहता घराचा चांगला कोपरा पाहून देव्हारा बनवला जातो. वास्तूशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देव्हारा बसवला जातो.  प्रत्येकाच्या वास्तूच्या इशान्य कोपऱ्यात त्याची जागा केलेली असते. याशिवाय तुमच्या घराच्या वास्तूनुसार वास्तूरचनाकार तुम्हाला त्याची योग्य जागा सांगत असतो. दिशा वगळता देव्हाऱ्याची निवड ही देखील तितकीच महत्वाची असते. कारण खूप जण इंटेरिअर करताना घरात देव्हारा असा काही बनवतात की, त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. घरी देव्हाऱ्याची निवड करताना तुमचा देव्हारा नेमका कसा असावा हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. देव्हाऱ्याची निवड करत असाल तर तुम्ही टाळा या चुका

देव्हारा विकत घेताना असू द्या या गोष्टींचे भान

Instagram

 आता तुम्ही देव्हारा विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गोष्टी या नक्कीच लक्षात घ्याव्यात अशा आहेत त्या कोणत्या ते जाणून घेऊया. 

  1. देव्हारा हा नेहमी लाकडाचा असावा. हल्ली वेगवेगळ्या दगडांपासून तयार झालेले देव्हारे मिळतात. पण तसे देव्हारे हे जड असतात असे जडत्व असलेले देव्हारे चांगले नाहीत. 
  2. देव्हाऱ्याला कळस कधीही असू नये. कळस हा मंदिरासाठी बनवलेला असतो. त्यामुळे सकारात्मक उर्जा बाहेर पडते. घरी असलेल्या कळसाला तसा पर्याय नसतो. कारण सगळ्यांच्या देव्हाऱ्यावर भिंत आलेली असते.त्यामुळे ती उर्जा अडली जाते. 
  3. देव्हाऱ्यात दिवा लावण्याची सोय असेल तर त्याचा रंग पिवळा निवडा. कारण पिवळा रंग हा शुभ मानला जातो. 
  4. भिंतीत कोरून बनवलेले देवघर अजिबात चांगले मानले जात नाही. त्यामुळे जागा वाचवण्यासाठी असे करत असाल तर मुळीच करु नका. 
  5. लाकडाचा रंग निवडताना त्यावर काळ्या रंगाचा प्रभाव अधिक नसावा. चॉकलेटी रंगाचा देव्हारा हा अगदी परफेक्ट असतो. 
  6. देव्हाऱ्यात मूर्ती किंवा फ्रेम ठेवायला योग्य जागा असावी. तुमची उपलब्ध जागा आणि देवघरातील देवांची संख्या पाहूनच त्याचा आकार ठरवा. 
  7. घरासाठी फार मोठे, प्रशस्त असे मंदिर मुळीच निवडू नका. घराला साजेसे असे मंदिर असायला हवे. 
  8. दिखावा करण्यासाठी देव्हारा हा खूप सजवलेला किंवा अति डिझाईनने युक्त नसावा. तो साधा सोपा आणि सुटसुटीत वाटेल असा असावा. 
  9. देव्हाऱ्यात अडगळ होणार नाही अशी त्याची डिझाईन असावी. त्यानुसारच त्याची निवड करावी. 
  10. काही देवघरांमध्ये आधीच काही शुभचिन्हे बनवलेली असतात. जर त्याचा अर्थ कळत नसेल तर तुम्ही मुळीच असे देव्हारे घेऊ नयेत. 

आता नवा देव्हारा घेताना या गोष्टींची काळजी अगदी हमखास घ्ययला हवी.

घरातील देवघर सजवा सोप्या पद्धतीने, दिसेल अधिक सुंदर

Read More From घर आणि बगीचा