शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी अनेक उपाय केले जातात. ट्विझिंग, प्लकिंग, वॅक्सिंग, शेव्हिंग, हेअर रिमूव्हिंग क्रीम वापरणे असे तात्पुरते उपाय आपण करतो. जर केस कायमचे काढून टाकायचे असतील तर इलेक्ट्रोलिसीस किंवा लेझर हेअर रिमूव्हल केले जाते.तुम्हाला जर सारखे सारखे वॅक्सिंग करायचे नसेल आणि रेझरने शेविंग करायचे नसेल किंवा केमिकल्सयुक्त हेअर रिमूव्हिंग क्रीम वापरायचे नसेल तर कदाचित एपिलेटर वापरणे हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. हे विद्युत उपकरण थेट मुळांपासून केस काढण्यासाठी डिझाइन केलेले आहे. एपिलेटरचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे ड्राय एपिलेटर, जे पाण्याशिवाय वापरले जाऊ शकते आणि दुसरे वेट एपिलेटर ज्यामध्ये स्नान करतानाच केस काढण्याची सोय असते.
एपिलेटर कसे काम करते
एपिलेटर हे वॅक्सिंग सारखेच काम करते. ते देखील वॅक्सिंग प्रमाणेच केस मुळांपासून काढून टाकते. परंतु एपिलेटर वापरताना वॅक्स वापरायची गरज नसते. त्याऐवजी, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर एपिलेटर फिरवले की केस मुळापासून काढून टाकले जातात. तुम्हाला जर एपिलेटरचा जास्त चांगला परिणाम हवा असेल तर सर्वोत्तम एपिलेटर वापरण्यापूर्वी तुमची त्वचा स्क्रबने एक्सफोलिएट करा. एक्सफोलिएशमुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि त्वचेमध्ये केसांची इनग्रोथ देखील होण्यास प्रतिबंध होतो.
एपिलेटर कसे वापरायचे
एपिलेटरला तुमच्या त्वचेच्या 90-अंश कोनात ठेवा आणि हळू हळू त्वचेवर फिरवा. तुमच्या त्वचेवर डिव्हाइस दाबू नका. त्याऐवजी, ते त्वचेवर सैलपणे धरा. तुमची त्वचा खेचून घ्या आणि नंतर केसांच्या वाढीच्या दिशेने हळूहळू एपिलेटर फिरवा.जर तुम्ही केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने एपिलेटर फिरवले तर तुमच्या त्वचेवरील केस मुळापासून निघणार नाहीत, ते अर्धवट तुटतील. तुम्हाला जर एपिलेटर वापरायचा असेल तर तो रात्री वापरा. कारण केस काढून टाकल्यानंतर काहींना त्वचेवर लालसरपणा आणि जळजळ जाणवते.
काही एपिलेटर्सचा स्पीड वेगळा असतो. तुम्हाला अंदाज येईपर्यंत आणि सवय होईपर्यंत सुरुवातीला स्पीडचे सेटिंग कमीच ठेवा आणि नंतर तुम्हाला कितपत सहन होतेय त्यानुसार हळूहळू वेग वाढवा. वॅक्सिंगसारखे एपिलेटर एका झटक्यातच मोठा पॅच काढत नाही, त्यामुळे तुम्हाला एपिलेटर वापरताना थोडा धीर धरावा लागेल. तुम्हाला तुमच्या त्वचेवर एपिलेटर हळूहळू फिरवावे लागेल. जर तुम्ही घाई करून एपिलेटर भराभर फिरवले तर तुमचे सगळे अनावश्यक केस निघणार नाहीत. तुमची त्वचा जर सेन्सिटिव्ह असेल तर एपिलेटर वापरल्यानंतर त्वचेचा दाह किंवा जळजळ होऊ नये म्हणून त्वचेला मॉइश्चरायझ करा.
एपिलेटरमुळे त्वचेचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक वापरानंतर एपिलेटर साफ करण्यास विसरू नका. तुम्ही एपिलेटर डिव्हाइस स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करू शकता. काही लोकांना केस मुळापासून काढणे हे वेदनादायक वाटू शकते. तसेच काहींना पहिल्यांदाच एपिलेशन करताना काही प्रमाणात अस्वस्थता जाणवते. तुमच्या शरीराच्या काही भागांची त्वचा इतरांपेक्षा जास्त संवेदनशील असू शकते त्यामुळे हात व पायांपेक्षा अंडर आर्म्सवर एपिलेशन करताना काहींना जास्त वेदना जाणवू शकते.
एपिलेटर वापरण्याचे फायदे
केस मुळापासून निघताना वेदना होणे हीच काय एपिलेटरची एक कमतरता आहे. परंतु जर तुम्हाला ही वेदना सहन होत असेल तर एपिलेटर वापरण्याचे खूप फायदे आहेत. एपिलेटर वापरण्याचा एक फायदा असा आहे की शेव्हिंग, डिपिलेटरी क्रीम किंवा ट्विझिंगपेक्षा एपिलेटरमुळे त्वचा दीर्घकाळ हेअर-फ्री राहील कारण केस मुळापासून काढल्यावर पुन्हा वाढण्यास जास्त वेळ लागतो. जर तुम्हाला खूप लहान केस काढायचे असतील तर एपिलेशन हा एक चांगला पर्याय असू शकतो कारण कमी ग्रोथ असताना वॅक्सिंगचा फारसा उपयोग होत नाही.
हात, पाय, खाजगी अवयव आणि अगदी चेहेऱ्यावरही तुम्ही एपिलेटरचा वापर करू शकता. याप्रकारे तुम्ही घरच्या घरीच वॅक्सिंग केल्यासारखी नितळ त्वचा मिळवू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक