DIY फॅशन

पेटीकोट घालताना करू नका या चुका, जाणून घ्या योग्य पद्धत

Dipali Naphade  |  Oct 11, 2021
how-to-wear-petticoat-in-a-right-way

साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते. फारच कमी महिला असतील ज्यांना अजिबात साडी आवडत नसेल आणि जरी आवडत नसली तरी कधी ना कधी तरी नेसावी लागतेच. आजकाल मुलींनी साड्या आवडतात पण अनेक जणी आहे ज्यांना साडी नेसताच येत नाही. मग अशावेळी शिवलेल्या साड्यांचाही पर्याय निवडला जातो. साडी व्यवस्थित नेसली तरच त्याचा उत्तम लुक उठून दिसतो. साडी जितकी सुंदर तितकीच ती चापूनचोपून व्यवस्थित नेसायला यायला हवी. बऱ्याचदा महिला साडी नेसतात पण ती नीट दिसत नाही. तुमच्यासह जर असं कधी होत असेल तर त्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे पेटीकोट नीट न घालणं. साडीचा लुक चांगला दिसण्यासाठी पेटीकोट योग्य तऱ्हेने घालणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने पेटीकोट न घातल्यास, साडीचा पूर्ण लुक खराब होतो. अनेक जणींना पेटीकोट घालण्याची पद्धतच माहीत नसते. त्यामुळे पेटीकोट घालताना तुम्ही या चुका करू नका आणि जाणून घ्या योग्य पद्धत.

पेटीकोट घालताना किती उंचीवर घालावा 

साडी नेसताना पेटीकोट घालणे गरजेचे असते. पण पेटीकोट घालताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे पेटीकोट किती उंचीवर घालावा. जास्त लांब आणि लहान पेटीकोट असल्यास, तुमच्या साडीचा लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेटीकोट विकत घ्यायला जाता तेव्हा आपल्या उंचीनुसारच पेटीकोट घ्या. पेटीकोट लांब असेल तर तुम्ही तो अल्टर करून घ्या. मात्र अति उंची ठेऊ नका. 

पेटीकोट तुम्ही बेंबीच्या जास्त वर बांधू नका. त्यामुळे साडीचे फिटिंग (Fitting of Saree) खराब होते. तुमच्या लोअर बॉडीची उंची कमी असेल तर तुम्ही साडी बेंबीच्या खाली नेसावी. अर्थात पेटीकोट तुम्ही बेंबीच्या खाली घालावा. पेटीकोटची उंची नेहमी पायाच्या अँकलपर्यंतच असायला हवी. जास्त लांब पेटीकोट असल्यास, चालतानाही त्रास होतो आणि तुमच्या साडीची शोभाही निघून जाते. कारण पेटीकोट साडीतून बाहेर दिसण्याचीही शक्यता असते. तर पेटीकोट लहान असल्यास, पायात अडकतो आणि साडी शरीराला नीट चापूनचोपून बसत नाही. 

पेटीकोट कसा बांधावा

पेटीकोटचा आकार आपण जेव्हा निवडतो त्यानंतर तो व्यवस्थित बांधणे गरजेचे आहे. आजकाल महिलांना हेदेखील माहीत नसते की, पेटीकोटची दोरी नक्की कोणत्या बाजूला बांधायची असते. पेटीकोटची नाडी ही आपल्या पदराप्रमाणे आपल्याला पेटीकोटची नाडी कोणत्या बाजूला बांधावी लागते हे ठरवावे लागते. मराठमोळी साडी अर्थात समोरच्या बाजूला पदर असेल तर तुम्हाला उजव्या बाजूला बांधावी लागते आणि जर गुजराती अर्थात उलट्या पदराची साडी असेल तर पेटीकोटची नाडी ही डाव्या बाजूला बांधावी लागते. पेटीकोटची नाडी ही नेहमी कॉटनची असावी हे लक्षात ठेवा. कॉटनची दोरी असेल तर पेटीकोटची गाठ लवकर सुटत नाही आणि सैलसर होत नाही. पण जर सिल्कची दोरी असेल तर हळूहळू पेटीकोठची गाठ सुटून पेटीकोट सैलसर होतो आणि मग साडी सावरणे कठीण जाते.

साडीनुसार करावी पेटीकोटची निवड 

सहसा साड्यांमध्ये कोणतेही पेटीकोट चालतील असा समज असतो. पण असे अजिबात नाही. तुम्ही कोणती साडी नेसणार आहात त्यानुसारच पेटीकोटची निवड करायला हवी. त्यामुळे सुळसुळीत साड्यांमध्ये तुम्ही कॉटनचे पेटीकोट घालण्याची चूक करू नका. तसंच ज्याप्रमाणे साडीला इस्त्री असते त्याचप्रमाणे चुरगळलेला पेटीकोटदेखील घालू नका. यामुळे तुमच्या साडीचा लुक खराब होतो. पेटीकोट निवडताना याची नेहमी काळजी घ्यावी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन