लाईफस्टाईल

श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत

Dipali Naphade  |  Feb 12, 2019
श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत

तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे का की, कितीही स्मार्ट माणसं असली तरीही पैशांच्या बाबतीत काही ना काही चुकीच्या गोष्टी घडतच असतात. बऱ्याचदा आपलं बजेट बिघडत असतं. पैसे खर्च करण्याची सवयदेखील खरं तर चुकीची आहे. प्रत्येक गोष्टीत समतोल असायला हवा. पैसे खर्च करायला हवेत पण पैसे कसे वाचवायला हवेत याकडेदेखील लक्ष द्यायला हवं. ही सवय वेळीच थांबवली नाही तर, खर्च करायची सवय वाढतच जाते आणि त्यामुळे पुढे बरंच नुकसानदेखील सहन करावं लागतं. त्यामुळे जेव्हा गरज असते, तेव्हा हातामध्ये पैसे राहात नाहीत. त्यामुळे पैसे वाचवणं किती गरजेचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.

तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे शिल्लक राहण्यासाठी नवा लाँच झालेला मोबाईल वा दुसरी कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर, त्याआधी दहावेळा नीट विचार करावा. केवळ आपल्याकडे महाग गोष्टी आहेत हे दुसऱ्यांना दाखवायच्या असतील तर त्यासाठी कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नका. आपल्याला खरंच ज्या वस्तूंची गरज आहे, त्याच वस्तू खरेदी करा. बऱ्याचदा लोक आपल्या गरज आहे त्यापेक्षा दिखाव्यासाठी वस्तूंची खरेदी करत असतात. त्यामुळे अशा लोकांजवळ पैसे कमी प्रमाणात टिकतात आणि कमावलेले पैसे नक्की कुठे निघून जातात ते कळतही नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. अशा चुका करू नका. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. नक्की अशा कोणत्या चुका केल्या जातात याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. घाईघाईत निर्णय घेऊ नका
पैसे हे शिल्लक ठेऊनच वाचतात हे सर्वांनाच माहीत आहे. पैशांच्या बाबतीत अचानक घेतलेले निर्णय ही सर्वात मोठी चूक आहे. ही चूक करण्यापासून खरं तर तुम्ही लांब राहायला हवं. उदाहरणार्थ एखाद्या वेळी तुम्हाला अचानक काही खावंसं वाटल आणि तुम्ही निघालात किंवा तुम्हाला वाटलं आता तुम्हाला फोन बदलायचा आहे आणि तुम्ही लगेच जाऊन फोन विकत घेतलात. तसंच तुम्हाला मध्येच वाटलं की, तुम्हाला अचानक कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि तुम्ही लगेच तिकिट्स बुक करून निघालात. खरं तर हे सर्व करायला हवं. पण तुम्हाला जर वाटत असेल हे सर्व करताना पैशाची बचत होणंदेखील गरजेचं आहे तर, हे सर्व करण्यासाठी तुम्हाला सर्व काही योग्य प्लॅन आखून करायला हवं. त्यामुळे तुम्ही योग्यरित्या नीट विचारपूर्वक प्लॅन करायला हवेत आणि डोकं थंड ठेवून विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता. शिवाय तुम्हाला फिरायला जायचं असल्यास, आधी बुकिंग केल्यासही बरेच पैसे वाचू शकतात. कोणताही खर्च करण्याआधी हा खर्च करण्याची खरंच आता गरज आहे का? याचाही विचार करायला हवा. असा विचार करत असताना जर आपल्या स्वतःच्या मनामध्ये लगेच उत्तर हो आलं नाही तर आपण नक्कीच उधळपट्टी करत असून याची गरज नाहीये हे समजायला हवं. अशा गोष्टी करणं आरामात टाळता येऊ शकतं. कोणीतरी आपला मित्र वा सहकारी उधळपट्टी करत आहे म्हणून आपणही तसंच करायला हवं असं नाही. त्यामुळे कोणताही पैशांच्या बाबतीतील निर्णय घेत असताना विचार करणं आवश्यक आहे. उगीच उधळपट्टी करणं टाळायला हवं.

2. मासिक बजेट न ठरवणं


मासिक अर्थात महिन्याचं बजेट न ठरवणं ही तुमची दुसरी महत्त्वाची चूक आहे. पैसे वाचवण्याचा एक उपाय म्हणजे तुम्ही महिन्याचं व्यवस्थित बजेट तयार करायला हवं आणि ठरवलेल्या बजेटच्या बाहेर कधीही जाऊ नये. महिन्याच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेलं बजेट हे तुमच्या सर्व गरजा तुमच्या प्राथमिकतेनुसार नक्कीच पूर्ण करत असतं. कोणत्या एका महिन्यात तुमचा जर जास्त खर्च झाला, तर दुसऱ्या महिन्यात त्याचा नीट हिशेब करून त्याप्रमाणे बजेट आखून घ्या आणि त्याप्रमाणे दुसऱ्या महिन्यात खर्च करा. वास्तविक आपल्याला लागणाऱ्या महत्त्वांच्या गोष्टींची एक यादीच तयार करून घ्या. आवश्यक खर्च करून झाल्यावर त्या यादीतील गोष्टींवर टीक करत जा. तुम्ही जर अशा गोष्टी ट्राय केल्यात तर तुमचे पैसे नक्की वाचतील. त्यामुळे तुमचे इतर फाल्तू खर्च वाचण्यासाठी मदत होईल. शिवाय असा वाचलेला पैसा तुम्ही गुंतवलात तर तुमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होते आणि तुमचे पैसे वाचतात आणि हळूहळू वाढतात. पण हे नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही वाचवलेला पैसा हा अचानक येणाऱ्या प्रसंगात नक्कीच कामी येत असतो. शिवाय या वाचवलेल्या पैशातून तुम्ही वेळोवेळी साधारण दहा टक्के पैसा वापरून स्वतःसाठी किंवा तुमच्या जवळच्या माणसांसाठीही काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करू शकता. खर्च करण्याचा आनंद हा काही वेळेसाठी असतो. तर जमा करण्याचा आनंद हा नक्कीच खूप मोठा असतो.  जेव्हा तुम्ही तुमचा बँक बॅलेन्स वाढलेला बघता तेव्हा नक्कीच तुम्हाला आनंद झाल्यावाचून राहणार नाही. खरं ना?

Also Read Money Saving Tips In Marathi

3. बचत आणि गुंतवणुकीचे स्मार्ट उपाय फॉलो न करणं
तुम्ही वाचवलेले पैसे जर योग्य तऱ्हेने अर्थात स्मार्ट उपायांनी जर गुंतवले नाहीत तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. आपण वाचवलेले पैशातून साधारण 50 टक्के पैसा अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला महागाईच्या या राक्षसापासून वाचता येईल आणि चांगले रिटर्न्स मिळतील. तुमचं वय जर 30 पेक्षा कमी असेल तर, तुमच्या बचतीचा जास्त भाग हा इक्विटी लिंक्ड प्रॉडक्ट्समध्ये गुंतवा. म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून तुम्ही तुमची बचत विविध तऱ्हेने फंडमध्ये गुंतवू शकता. उदाहरणार्थ बचतीचा निदान 5% भाग हा सोन्यामध्ये गुंतवा. रिअल इस्टेटमध्ये साधारण पाच ते दहा वर्षांसाठी पैसे गुंतवू नका कारण यामध्ये खूपच चढउतार तुम्हाला अनुभवायला मिळतात. पण तुम्हाला जर स्वतःला याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही तज्ज्ञांची मदत करून गुंतवणूक करू शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला नक्की चांगले रिटर्न्स कुठून मिळणार आहेत याची योग्य माहिती घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक करू शकता.

4. नेहमीच उधारी करणं


तुम्हाला जर श्रीमंत बनायचं असेल तर उधारीचं आयुष्य जगणं टाळा. सतत उधार घेणंदेखील मनी मिस्टेक अर्थात चूक असते. एखादी कंपनी घाट्यात असली तरीही मोठ्यातील मोठा उद्योगपती हा उधारीचं आयुष्य जगत नसतो. तर बऱ्याचदा मध्यमवर्गीय माणूसच उधारीचं आयुष्य जगत असतो. तुम्ही जर तुमच्या क्रेडिट कार्डावर कोणत्याही वस्तू ईएमआयवर घेत असाल तर हीदेखील एकप्रकारची उधारीच आहे. याचा अर्थ तुमच्या भविष्यात येणारा पगार तुम्ही येण्याआधीच खर्च करत आहात. तुमच्याजवळ न आलेला पगार खर्च करणं म्हणजे अर्थातच कर्ज. शिवाय तुम्हाला पुढे येणाऱ्या पैशाने तुम्ही आधीच खरेदी केल्यास, तुम्हाला व्याजही भरावं लागतं. जितकी उधारी तुम्ही करत असता, त्यापेक्षा अधिक रक्कम तुम्हाला भरावी लागते. असं जर असेल तर तुमच्याकडे कसा काय पैसा टिकेल आणि जमा होईल? जर चुकूनही तुमच्यावर वाईट वेळ आली तर तुम्ही हे कर्ज कसं फेडणार? येणारी वेळ कोणीच सांगू शकत नाही. सध्याच्या जगात नोकरीचाही काही भरोसा नसतो. अथवा एखाद्या आजारपणात अथवा दुसऱ्या एखाद्या इमर्जन्सीमध्ये पैशांची गरज भासली तर तुम्ही काय करणार? पुन्हा तुम्हाला कर्ज काढावं लागणार. ही सर्व कर्ज फेडेपर्यंत तुम्ही नक्कीच म्हातारे होणार. त्यामुळेच तुम्ही कर्ज काढण्यापेक्षा पैसे वाचवण्यावर अधिक भर द्या. जेणेकरून तुम्ही नीट प्लॅन करून व्यवस्थित श्रीमंत बनू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींचादेखील आनंद घेऊ शकता.

5. आपले सर्व बिल्स वेळेवर न भरणे
तुम्ही जर त्या लोकांपैकी असाल जे वेळेवर कधीही आपल्या क्रेडिट कार्डाचं बिल भरत नाहीत आणि नंतर या बिल्सची मोठी पेनल्टी भरत राहतात. असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही खूपच मोठी मनी मिस्टेक करत आहात. सतत असंच होत राहिलं तर तुम्ही कधीही पैसे वाचवू शकत नाही. तुमच्या आळसामुळे तुम्ही तुमचा बराच पैसा या पेनल्टीमध्ये खर्च करत आहात हे लक्षात घ्या. तुम्ही या गोष्टीकडे अजूनही गांभीर्याने पाहिलं नसेल तर आता तरी निदान जागे व्हा. पेनल्टीवर खर्च करण्यात आलेले पैसे जर वाचवलेत तर तुमचे बरेच पैसे वाचतील हे लक्षात घ्या. दर महिन्याला तुम्ही SIP च्या माध्यमातून निदान 1000 रुपये वाचवले तरीही दहा वर्षांमध्ये तुमच्याकडे बरीच रक्कम जमा होईल याचा नीट विचारपूर्वक हिशेब करा. याचा विचार करून पाहा. त्यामुळे वेळेवर बिल्स न भरणं ही तुमची खूपच मोठी चूक आहे आणि ती वेळेवर सुधारा.

सर्वात पहिल्यांदा स्वतःचा आळस झटकून स्वतःच्या भविष्याची चिंता करा. आपणच आपल्या भविष्याची चिंता करायला हवी. महागाई वाढतच राहणार आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी आपण हातपाय मारायला हवेत आणि अशा चुका टाळल्यास, नक्कीच आपण श्रीमंत होऊ शकतो. निदान अगदी रडतखडत आयुष्य न काढता योग्य निर्णय घेऊन आणि पैसा वाचवून जगण्याचा आनंद तरी नक्कीच मिळवू शकतो. याचा प्रत्येकाने अगदी बारकाईने विचार करण्याची गरज आहे आणि तुम्ही जर नुकतेच नोकरी करायला लागले असाल तर नक्कीच या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करून पैसा वाचवण्याकडे तुमचा कल असू द्या.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा – 

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

New Year Plans: ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं

Read More From लाईफस्टाईल