पानात अगदी कोपऱ्यात वाढलं जाणारं चटकदार लोणचं तुमच्या जेवणाला किती स्वाद आणते ते तुम्हाला माहीत आहे. घरी भाजी नसली तर मस्त लोणच्यावर ताव मारला जातो. वरण भात आणि मस्त आवडीचं लोणचं पानावर वाढलं की, आणखी काही नाही मिळाले तरी चालते. हा आता अनेकांना लोणच्यावर इतके प्रेम असते की, त्यांच्यासाठी लोणची ही टेस्टचेंजर असतात. सध्या इतका उकाडा वाढलाय की, कधी कधी अगदी साधंच जेवावस वाटतं. पण तुमच्या साध्या बोअरींग जेवणाला चटकदार करण्यासाठी तुम्ही घरीच का झटपट लोणचं करत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच झटपट लोणच्याच्या रेसिपी सांगणार आहोत. मग करुया सुरुवात
Table of Contents
रोजच्या जेवणाचा आलाय कंटाळा? मग दुपारच्या जेवणाला करा हे पदार्थ
छुंदा
कैरी किसून केलेला छुंदा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. आता रेडिमेड घेण्यापेक्षा तुम्ही घरीच करुन पाहा छुंदा
साहित्य-½ किलो कैरी, ½ किलो साखर,2 चमचा लाल तिखट,¼ चमचा हळद, 1चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंग. मीठ
कृती- कैरी किसून घ्या. त्यात साखर घालून मिश्रण एकजीव करा. दोन तास मिश्रण बाजूला ठेवून द्या.
साखर विरघळल्यामुळे कैरीला पाणी सुटेल. एका भांड्यात घेऊन कैरी शिजवायला घ्या. त्यात लाल तिखट, हळद, जिरे दालचिनी लवंग पूड करुन घाला. मीठ घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. तुमचा आंबट, गोड छुंदा तयार
मेथांबा
आंबट, गोड, तिखट असा हा मेथांबा अप्रतिम लागतो. तुम्हाला जर खूप आबंट मेथांबा नको असेल तर तुम्ही यासाठी छान तोतापुरी कैरी वापरु शकता.
साहित्य- 1 तोतापुरी कैरी, 1चमचा मेथी, मोहरी आणि जिरे, हिंग, हळद, 3 चमचे लाल तिखट,
कृती- तोतापुरी फार आंबट नसते याची चवही चांगली लागते. म्हणून तुम्ही तोतापुरी कैरीचा मेथांबा करुन पाहा
मध्यम आकाराची ताजी तोतारपुरी कैरी घ्या. त्याची सालं काढून त्याचे बारीक तुकडे करा.
एका खोलगट भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी आणि मेथी घालायची आहे. फोडणी तडतडल्यानंतर त्यात हिंग आणि लगेचच त्यात कैरीचे तुकडे घालायचे आहेत.
मिश्रण परल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट घालून परतून घ्यायचे आहे. मिश्रण चांगले एकजीव होण्यासाठी त्यात अर्धी लहान वाटी पाणी घ्या. पाणी इतकेच घाला.ज्यामुळे मसाला जळणार नाही.
झाकण बंद करुन कैरी शिजून घ्या. यामध्ये तुम्हाला कैरीच्या अर्धे गूळ घाला आणि कैरी शिजवून घ्या. तुमचा मेथांबा तयार…
मायक्रोवेव्हमध्ये करता येतील अशा झटपट रेसिपी
लिंबाचे इन्स्टंट लोणचे (गोड)
तुम्हाला लिंबाचे लोणचे आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारातले लिंबांचे लोणचे करुन पाहायलाच हवे. या रेसिपीचे साहित्य इतके सोपे आहे की, तुम्हाला हे लोणचं तयार करायला फार वेळही लागणार नाही.
साहित्य- लिंब,गूळ, वेलची पूड
कृती-बाजारातून चांगली लिंब आणा.
कुकरच्या भांड्यात अख्खे लिंबू घेऊन त्यात पाणी न घालता दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्या.
त्यात पाणी नाही म्हणून काळजी करु नका.
लिंबातील पाण्यामुळे ती चांगली शिजतात.
कुकर थंड झाल्यानंतर शिजलेली लिंब काढून त्यातील बिया काढून घ्या.
लिंबाच्या गरात तुम्हाला गूळ घालून ते चांगल एकजीव करुन घ्या. त्यात तुम्हाला वेलची पूड घालायची आहे.
तुमचे आंबट-गोड लिंबू लोणचं तयार
मग इतके सोपे लोणचं तुम्ही करताय ना!
या उन्हाळ्यात साठवणीचे असे हटके पदार्थ नक्की करुन पाहा
लिंबाचे तिखट लोणचे
आता लिंबाचे गोड लोणचे आपण पाहिले आता थोडे तिखट लोणचेही करुया. लिंबाचे लोणचे तोंडाची चव आणायला पुरेसे असते. म्हणूनच तुम्हाला बरे वाटत नसेल तर तुम्हाला लिंबाचे लोणचे खाण्याचा सल्ला दिल्ला जातो.
साहित्य- 10 ते 12 लिंबू, तेल, मोठा चमचा मोहरी आणि मेथीचे दाणे, मीठ, लाल तिखट,
कृती- एका भांड्यात तेल दोन मोठे चमचे तेल गरम करुन तुम्हाला त्यात मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे. फोडणी तडतडली की, त्यात लिंबाच्या फोडी,मीठ (खडे मीठ असल्यास उत्तम ), लिंब शिजायला आल्यानंतर त्यात तुम्हाला लाल तिखट घालायचे आहे.
दुसरीकडे तुम्हाला एका फोडणीच्या भांड्यात एका मोठा चमचा मेथी आणि मोहरी भाजून घ्यायची आहे. त्याची पूड करुन तुम्हाला लिंबाच्या मिश्रणात टाकायची आहे. दोन मिनिटे वाफ दिल्यानंतर तुमचे लिंबाचे लोणचे तयार.
टोमॅटोचे इन्स्टंट लोणचे
तुम्हाला रोजची टिपिकल लोणची खाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास लोणच्याच्या रेसिपी शोधून काढल्या आहेत. त्यापैकीच एक आहे टोमॅटोचे लोणचे
साहित्य- साधारण 4 ते 5 मोठे टोमॅटो, चिंचेचा पल्प, लाल तिखट, हळद, मीठ, गूळ,
फोडणीसाठी- तेल, मोहरी, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, लाल सुकी मिरची, हिंग
कृती-टोमॅटो बारीक चिरुन घ्या. एका भांड्यात साधारण 2 ते 3 चमचे तेल गरम करुन घ्या. त्यात टोमॅटोच्या फोडी घाला.
पाणी घालून टोमॅटोच्या फोडी चांगल्या शिजवून घ्या. त्यामध्ये चिंचेचा पल्प टाका.(जर तुम्हाला आबंट- गोड चव हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यात पल्प घालू शकता. पण खूप पल्पही घालू नका) टोमॅटो चांगला शिजण्यासाठी भांडयावर झाकण ठेवा.
दुसरीकडे तव्यावर 1मोठा चमचा मेथी आणि1 मोठा चमचा मोहरी ड्राय रोस्ट करा. त्याची पूड तयार करुन ती टोमॅटोच्या मिश्रणात घाला. त्यात लाल तिखट, हळद, मीठ घालून पेस्ट एकत्र करुन घ्या. मिश्रणाला थोडा ग्लेझ येण्यासाठी त्यात अगदी चमचाभऱ गूळ घाला आणि एक वाफ येऊ द्या.
फोडणीपात्र घेऊन त्यात तेल गरम करा. तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून चांगले तडतडू द्या. त्यात एक लाल मिरची आणि लसूणच्या काही पाकळ्या घाला.
फोडणी टोमॅटोच्या पेस्टमध्ये घाला आणि एकजीव करुन मस्त टोमॅटोचं लोणचं खा.
तिखट चटकदार मिरचीचं लोणचं
पराठ्यासोबत अनेकांना मिरची खायला खूप आवडते. विशेषत:त्यासोबत दिले जाणारे हिरव्या मिरचीचे लोणचं म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. आता हे लोणचं तयार करण्याची इन्स्टंट पद्धत देखील खास तुमच्यासाठी
साहित्य- तिखट हिरव्या मिरच्या (थोड्या मोठ्या घेतल्यास उत्तम), मीठ, हळद, तेल, व्हिनेगर, लिंबाचा रस
मसाल्यासाठी- 1 चमचा जिरं,मोहरी, धणे, ½चमचा मेथी, बडिशेप, ओवा
कृती-मिरचीची देठं काढून त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करुन घ्या.
दुसरीकडे मसाल्याची तयारी करण्यासाठी तव्यावर जिरे, मोहरी, धणे, मेथी, बडिशेप, ओवा घेऊन चांगले भाजून घ्या. त्याची पूड तयार करुन घ्या.
तयार पूड कापलेल्या मिरचीच्या मिश्रणामध्ये टाका. त्यात चमचाभर हळद घाला.मीठ आणि थोडं लिंबू मिळून मिश्रण एकजीव करुन घ्या.
फोडणीसाठी एका भांड्यात साधारण दोन ते तीन चमचे तेल गरम करुन त्यात हिंग घाला. गॅस बंद करुन तेल मिरची मसाला मिश्रणात ओता. त्यावर साधारण एक चमचा व्हिनेगर घाला. तुमचे इन्स्टंट मिरचीचं लोणचं तयार
आवळ्याचे लोणचे
आता तुम्हाला काहीतरी वेगळे लाेणचं खायची इच्छा असेल तर तुम्ही आवळ्याचे लोणचे देखील ट्राय करु शकता. साधारण या दिवसांमध्ये चांगले आवळे बाजारात येतात. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन c तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असते. म्हणून तुम्ही हे लोणचे नक्की ट्राय करु शकता.
साहित्य- 10 ते12 आवळे, एक चमचा मोहरी आणि मेथी, बडिशेप, हिंग, लाल तिखट, हळद, मीठ
कृती- तुम्हाला आवळे इडलीपात्रात वाफवून घ्यायचे आहेत. इडलीपात्रात आवळ्यांना चिरा पाडून ठेवा.
आवळे वाफवल्यानंतर त्यातील बिया काढून टाका.
एका भांड्यात मेथी, बडिशेप, मोहरी भाजून त्याची पूड करुन घ्या.
फोडणीसाठी एका भांड्यात मोहरी आणि हिंग तडतडून द्या. त्यात आवळ्याच्या फोडी घाला. त्यात हळद, मीठ, लाल तिखट घाला.
हे ही लक्षात घ्या
ही लोणची इन्स्टंट असल्यामुळे ती फार फार तर 15 दिवस टिकू शकतात. जर तुम्ही ते नीट फ्रिजमध्ये ठेवत असाल तर ते कदाचित जास्त टिकू शकेल.
लोणच्यासाठी शक्यतो मोहरी किंवा शेंगदाणा तेल वापरा. चव चांगली येते.
इन्स्टंट लोणची करताना फार प्रमाणात करु नका. कारण ती ठेवता येत नाहीत म्हटल्यावर तुम्हाला ती वेळेवर संपवणे आवश्यक असते.