बॉलीवूड

कतरिना कैफ साकारणार ‘पी.टी. उषा’

Trupti Paradkar  |  Apr 25, 2019
कतरिना कैफ साकारणार ‘पी.टी. उषा’

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंडच सुरू आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती होत आहे. अभिनेत्री कतरिना कैफदेखील एका बायोपिकमधून झळकणार आहे.  ती लवकरच भारताची सुवर्ण कन्या पी.टी उषा यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मागील दोन वर्षांपासून पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीची चर्चा आहे. मात्र काही कारणांमुळे हा चित्रपट रखडला होता. आता लवकरच हा बायोपिक तायर केला जाणार आहे. दिग्दर्शक रेवती एस. वर्मा  यांनी चित्रपटासाठी पुढाकार घेतला आहे. रेवती यांनी या चित्रपटातील पी.टी. उषा यांच्या भूमिकेसाठी कतरिना कैफची निवड केली आहे. असं असलं तरी कतरिना कडून याबाबत कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. कतरिना आधी या भूमिकेसाठी प्रियंका चोप्राची निवड करण्यात येणार अशी चर्चा होती. प्रियंकाने मेरी कोम यांची भूमिका यापूर्वी केली आहे. मात्र पी.टी. उषा यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तिने नकार दिला होता. त्यामुळे या बायोपिकचे काम बरेच दिवस रखडले होते. आता मात्र  पी.टी.उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट इंग्रजी, हिंदी, चिनी, रशियन अशा विविध भाषांमधून लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. यापूर्वी महेंद्र सिंग धोनी, मेरी कोम, सचिन तेंडूलकर, मिल्खा सिंग अशा खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पी.टी उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी खेळप्रेमी नक्कीच उत्सुक आहेत.

लवकरच उलगडणार पी.टी. उषा यांचा जीवनप्रवास

पी.टी. उषा या भारताच्या एक निवृत्त धावपटू आहेत. त्यांचा जन्म केरळ मधील एका छोट्याशा गावात झाला.  भारतीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे आहे. पी.टी उषा यांना भारताची सुवर्णकन्या, भारतीय ट्रॅक आणि मैदानाची राणी अशा विविध नावांनी ओळखले जाते. 1980 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर धावणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला धावपटू आहेत. त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये त्यांनी आतापर्यंत 100 हून अधिक पदकं  भारतासाठी कमावली आहेत. त्यामुळे पी.टी उषा यांच्या जीवनावरील चित्रपटामुळे अनेक मुलींना क्रीडाविश्वात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.आजही अनेक गावांमध्ये अशा मुली असतात ज्यांना खेळात करिअर करण्याची इच्छा असते. मात्र अपुऱ्या सोयीसुविधा आणि प्रोत्साहनाचा अभाव यामुळे त्यांच्यामधील कौशल्याला वाव मिळत नाही. मात्र अशा प्रकारचे चित्रपट भारतातील खेळांडूनां प्रोत्साहन देण्यासाठी गरजेचे आहेत.

कतरिनाकडे चित्रपटाची रांग

कतरिना कैफकडे अनेक चित्रपटांची ऑफर आहे. सध्या ती सलमानखान सोबत भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भारतच्या ट्रेलरमधील कतरिनाच्या भूमिकेचे  सर्वत्र कौतुक होत आहे. पहिल्यांदाच कतरिना अशा प्रकारची भूमिका साकारत आहे. भारतचे शूटिंग संपल्यावर ती लगेचच सुर्यवंशीमध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत शूटिंगला सुरूवात करणार आहे. सुर्यवंशी चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि रोहीत शेट्टी करत आहेत. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवळजवळ नऊ वर्षांनी ‘अक्षय आणि कॅट’ पुन्हा एकत्र येणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी अक्षय-कतरिनाची जोडी आणि रोहीत शेट्टीचे अफलातून दिग्दर्शन यातून ‘सुर्यवंशी’ ब्लॉकब्लस्टर नक्कीच ठरणार. शिवाय आता पी.टी. उषाची आव्हानात्मक भूमिकादेखील कतरिनाच्या वाट्याला आल्यामुळे पुढच्या वर्षी कतरिनाचा भाव नक्कीच वधारणार आहे.

 

पाहा कोण दिसणार दयाबेनच्या भूमिकेत

अंकिता लोखंडेने केलं आपल्या बॉयफ्रेंडला किस, व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली खिलाडी अक्षय कुमारची फिरकी

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

Read More From बॉलीवूड