मनोरंजन

महेश मांजरेकर ऊर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’मध्ये धमाल

Dipali Naphade  |  Jan 23, 2019
महेश मांजरेकर ऊर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’मध्ये धमाल

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी ओळख निर्माण करुन आणि चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांतून आपल्या बिनधास्त कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी व्यक्ती म्हणजे महेश मांजरेकर. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटांमध्ये महेश मांजरेकरच्या अभिनयाचा चांगलाच दबदबा आहे. त्याचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये महेश मांजरेकरने स्वत:च्या मेहनतीने आपले हक्काचे स्थान निर्माण केले. ज्या व्यक्तीला मार्गदर्शनाची गरज आहे त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन देणा-या महेशने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. काही भूमिका या गंभीर आहेत तर काही अगदी हलक्या-फुलक्या पण मनोरंजक. अशीच एक मनोरंजक आणि खळखळून हसायला लावणारी भूमिका घेऊन महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येत आहे आणि ती भूमिका आहे गडबडे बाबाची.

गडबडे बाबाची भन्नाट भूमिका

नवीन वर्षाच्या दुस-या महिन्याच्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर एक मस्त-जबरदस्त-भन्नाट भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.  अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी ‘गडबडे बाबा’ या एका ‘कूल’ साधूची भूमिका साकारली आहे. भाविकांच्या मनातील प्रश्नांचे-शंकेचे ‘अगदी हटके स्टाईल’ने निरसन करणारे गडबडे बाबा या चित्रपटात एक से बढकर एक अफलातून डायलॉगने धुमाकूळ घालणार आहेत याचा अंदाज नुकतेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमधून आलाच असेल. प्रेम-लग्न यांविषयी गडबडे बाबांचे असणारे अचूक भाकीत आणि विचार हे प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करणार. महेश मांजरेकर ब-याच दिवसांनंतर अशा हलक्या-फुलक्या भूमिकेत दिसणार आहेत.

वाचा – ‘सिम्बा’नंतर सिद्धार्थ आणि सौरभच्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’

महेशसोबत दिसणार सिद्धार्थ आणि सौरभ

महेशसह या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आयुष्य व्यर्थ घालवायचे नसेल तर प्रेम करा आणि गडबडे बाबांचे भाकीत अन् भावनेविषयी विचार जाणून घ्यायचे असेल आणि मजेशीर गोष्टींना सामोरं जायचं असेल तर हा चित्रपट नक्कीच एक धमाल घेऊन आला असेल असं सध्याच्या ट्रेलरवरून अंदाज येत आहे. नक्की काय गौडबंगाल आहे हे कळण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. मात्र महेश, सिद्धार्थ आणि सौरभ या त्रिकूटाने या चित्रपटात नक्कीच धमाल आणली असणार असा अंदाज सध्या लावला जातोय. 

वाचा – महाराष्ट्राच्या हास्य जत्रा पर्व २ मध्ये सिद्धार्थ आणि सौरभची हजेरी

सध्या  सिद्धार्थ आणि सौरभ प्रमोशनमध्ये ‘व्यस्त’

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या सिद्धार्थ आणि सौरभ दोघेही व्यस्त आहेत. चित्रपटाचं प्रदर्शन काही दिवसांवर येऊन ठेपलं असल्यामुळे सध्या दोघेही विविध ठिकाणी जाऊन प्रमोशन करत आहेत. नुकतेच ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व २’ मध्येही येऊन सिद्धार्थ आणि सौरभने धमाल उडवून दिली. शिवाय सध्या अनेक मराठी वाहिनीवरदेखील या चित्रपटाचं प्रमोशन चालू आहे. बऱ्याच दिवसांनी मराठीमध्ये अशा तऱ्हेचा कॉमेडी शैलीचा चित्रपट येत असल्यामुळे प्रेक्षकांच्यादेखील या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर उतरतो का हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे.

वाचा – ‘टोटल धमाल’चं धमाल ट्रेलर, अजय – अनिल- माधुरीचा तडका

Read More From मनोरंजन