आपलं जग

हा न्यूज अँकर होतोय व्हायरल…सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा आहे अँकर

Leenal Gawade  |  May 28, 2019
हा न्यूज अँकर होतोय व्हायरल…सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा आहे अँकर

टीव्हीवर बातम्या वाचणारे न्यूज अँकर या ना त्या कारणामुळे ट्रोल होत असतात. कधी त्यांच्याकडून होणाऱ्या चुका किंवा त्यांनी बोलताना केलेली एखादी चूक अगदी वाऱ्यासारखी पसरते. पण सध्या एका न्यूज अँकरची सोशल मीडियावर खूप तारीफ केली जात आहे. हा न्यूज अँकर साधासुधा नाही बरं का!  12 वर्षांचा आहे आणि हा खास आहे कारण हा लहानगा अंध आहे. पण त्याने एक न्यूज बुलेटीन असे काही सादर केले की,सगळ्या जगाचे लक्ष त्याने स्वत:कडे ओढून घेतले आहे. हा मुलगा जगातील पहिला अंध न्यूज अँकर आहे.

कोण आहे हा न्यूज अँकर ?

या न्यूजचे अँकरचे नाव श्रीरामनुजम असून हा मुलगा कोईंबतुरमधील आहे. लोट्स नावाच्या एका न्यूज चॅनेलवर त्याने तब्बल 22 मिनिटाचे बुलेटीन वाचले आहे. जगाला कधीही पाहू न शकणाऱ्या श्रीरामनुजनला मात्र आज सगळे जग पाहात आहे. ब्रेल लीपीचा उपयोग करत त्याने हे बुलेटीन अगदी सफाईदारपणे वाचले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्याबद्दल काही बोलण्याआधी तुम्ही त्याचा हा व्हिडिओ पाहायला हवा. हा व्हिडिओ त्याच्या बातमी तयारीचा व्हिडिओ आहे

पाहा व्हिडिओ

श्रीरामानुजम ठरला पहिला अंध न्यूज अँकर

आतापर्यंत आपलण मूकबधिरांना बातम्या देताना पाहिले आहे. किंवा त्यांच्यासाठी असलेले विशेष बातमीपत्र ऐकले असेल. पण असा प्रयत्न पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्यामुळे या चॅनेलने श्रीरामानुजमला पहिला अंध न्यूज अँकर जाहीर केलेले आहे. त्यामुळे कधीही जगाला पाहू न शकणाऱ्या श्रीरामानुजमला सगळ्या जगाने पाहिले आहे.

कसा होता त्याचा अनुभव?

त्याचे हे बुलेटीन प्रसारीत झाल्यानंतर त्याच्या मुलाखतीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. त्याने मुलाखतीदरम्यान त्याचा अनुभव शेअर केला तो म्हणाला की, मी लहानपणापासून पाहू शकत नाही. मी अंध आहे. मी ब्रेललिपी वाचतो. पण बातम्या वाचण्याआधी मला फारच भीती वाटत होती. मी करु शकेन की नाही असे मला वाटत होते. पण मी वाचायला घेतल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मी ते वाचले. 22  मिनिटांच्या या काळात मी वेगवेगळ्या बातम्या वाचल्या. यात मनोरंजन, राजकारण, क्रीडा अशा वेगवेगळ्या बातम्या होत्या आणि मला त्या वाचायला फारच आवडले. या बातमीपत्रानंतर माझा विश्वास वाढला. याची तयारी मी आधी केली होती. पण तरीसुद्धा भीती होती ती आता फारच कमी झाली आहे. जनतेकडून मला खूप प्रेम मिळाले याचाही आनंद मला आहे.

नेत्रदान महत्वाचे

या अनोख्या प्रयोगासंदर्भात जेव्हा  चॅनेल हेडशी संपर्क साधण्यात आला त्यावेळी जी के एस सेल्वाकुमार यांनी PTI ला अशी माहिती दिली की, देशात अनेक अंध व्यक्ती आहेत. त्यांना डोळ्यांची गरज आहे. नेत्रदान करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नेत्रदानाविषयी लोकांना अधिक सजग करण्याचा आमचा हा प्रयत्न असून नेत्रदान करुन अंधाचा आयुष्यात तुम्ही प्रकाश आणावा अशी आमची इच्छा आहे.

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From आपलं जग