DIY सौंदर्य

फेसपॅक लावूनही येत नाही चेहऱ्यावर ग्लो, हे आहे कारण

Trupti Paradkar  |  Jul 26, 2021
फेसपॅक लावूनही येत नाही चेहऱ्यावर ग्लो, हे आहे कारण

चेहऱ्यावर ग्लो यावा यासाठी तुम्ही अनेक सौंदर्योपचार करत असता. महिन्यातून एकदा फेशिअल करणं सतत चेहरा क्लिन ठेवणं, नवनवीन उत्पादनं ट्राय करणं. मात्र कधी कधी एखादा कार्यक्रम अचानक ठरतो आणि अशा वेळी चेहऱ्यावर ग्लो मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे फेसपॅक लावणं हाच तुमच्यासमोर असतो. पण बऱ्याच जणींना असा अनुभव येतो की फेसपॅक लावण्यामुळे तुम्हाला हवा तसा ग्लो मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या फेसपॅकमध्येच काही तरी प्रॉब्लेम आहे असं वाटू लागतं. मात्र असं नसून तुम्हीच तो फॅसपॅक चुकीच्या पद्धतीने लावलेला असतो. यासाठी अचानक ठरलेल्या एखाद्या कार्यक्रमासाठी चेहऱ्यावर पटकन ग्लो हवा असेल तर फेसपॅक लावताना कधीच या चूका करू नका. 

फेसपॅक लावताना टाळा या चुका 

तु्म्ही फेसपॅक कशा पद्धतीने लावता यावर तुमच्या चेहऱ्यावर त्या फेसपॅकचा काय परिणाम होणार हे अवलंबून असते. यासाठी फेसपॅक लावताना या चुका करू नका. 

फेसपॅक लावल्यावर निवांत न बसणे –

कोणताही फेसपॅक, फेसमास्क लावल्यानंतर काही मिनीटे शांत एकाजागी बसणं  गरजेचं असतं. मात्र अनेक महिलांना काम करत, गप्पा मारत असताना फेसपॅक लावण्याची सवय असते. या क्रिया करताना तुमच्या चेहऱ्यावरील स्नायू आकुंचित आणि प्रसरण पावत असतात. अशा हालचालींमुळे तुमच्या चेहऱ्यावरील फेसपॅकचा परिणाम योग्य पद्धतीने होत नाही. यासाठीच  फेसपॅक लावल्यावर कमीत कमी पंधरा मिनीटे दुसरे कोणतेही काम करू नका आणि बोलूही नका. यासोबतच जाणून घ्या काय आहे रबर फेसमास्क, कसा कराल त्वचेसाठी वापर यासोबतच वाचा त्वचेची काळजी घेण्यासाठी करा काकडीचा रात्री झोपण्यापूर्वी वापर

फेसपॅक काढण्याची चुकीची पद्धत –

फेसपॅक सुकल्यावर तो तुम्ही कसा  काढता  हे खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक फेसपॅक सुकल्यावर तो हलक्या हाताने बोटांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत अथवा ओल्या स्पंजने पुसून काढावा. मात्र काही जणी त्वचेवर स्पंज रगडून रगडून फेसपॅक पुसून काढतात. चुकीच्या पद्धतीने फेसपॅक काढण्यामुळे तुम्हाला हवा तसा ग्लो मिळत नाही. सकाळी उठल्यावर चेहरा दिसत असेल सूजलेला तर करा हे उपाय

गरम पाण्याने चेहरा धुणे –

काही जणींना फेसपॅक काढण्यासाठी गरम पाणी वापरण्याची सवय असते. हिवाळा अथवा पावसाळ्यात थंडावा सहन न झाल्यामुळे त्वचेला गरम पाणी लावल्याने बरे वाटत असले तरी यामुळे त्वचेचे नुकसान होते. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स मोकळे होतात आणि प्रदुषण, धुळ, मातीचा संपर्क झाल्यामुळे त्वचेवर इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो.यासाठी चेहरा स्वच्छ करताना पाळा हे नियम, त्वचेच्या समस्या होतील दूर

फेसपॅक लावण्याची वेळ –

फेसपॅक मध्ये विविध सामग्रीचा वापर केलेला असतो. त्यामुळे काही फेसफॅक ठराविक वेळेपर्यंतच त्वचेवर ठेवावे लागतात. मात्र अनेकींना वाटतं की जितका जास्त वेळ चेहऱ्यावर फेसपॅक असेल तितका जास्त चांगला परिणाम चेहऱ्यावर दिसेल. मात्र हे फार चुकीचे आहे. कोणताही फेसफॅक चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनीटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नये. 

या चुका टाळल्या तर तुम्ही चेहऱ्यावर लावलेला  फेसपॅक तुमच्या त्वचेवर योग्य परिणाम  करेल आणि तुम्हाला हवा तसा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल. तेव्हा फेसपॅक लावूनही चेहऱ्यावर ग्लो येत नसेल तर तुम्ही या चुका करत नाही ना याची काळजी घ्या. 

Read More From DIY सौंदर्य