Care

पावसामुळे खूप गळत असतील केस तर करा हे घरगुती उपाय

Trupti Paradkar  |  Jun 28, 2021
पावसामुळे खूप गळत असतील केस तर करा हे घरगुती उपाय

पावसाला सुरुवात झाली की मन अगदी प्रसन्न होते. मात्र पावसाळा हा असा एक ऋतू आहे ज्यात तुम्ही भिजल्याशिवाय राहूच शकत नाही. सहाजिकच याचा परिणाम तुमच्या त्वचा आणि केसांवर होतो आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात. पावसात भिजल्यामुळे सर्वात जास्त नुकसान होतं तुमच्या केसांचं. कारण  केस या दिवसांमध्ये अचानक भरपूर गळू लागतात. पावसात भिजताना तुम्हाला याची कल्पनाही नसते की या भिजण्याचा  तुमच्या केसांवर किती मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम होणारर आहे. यासाठीच या काळात केस गळणे रोखण्यासाठी हे उपाय करणं विसरू नका.

पावसात भिजल्यावर केसांबाबत करू नका या चुका

पावसात भिजल्यावर जर केस वेळीच सुकवले नाहीत तर केस खूप गळतात. यासाठी पावसाळ्यात या चुका मुळीच करू नका. 

केसांना शॅम्पू करा –

पावसात भिजणं तुम्हाला आवडत असेल तरी पावसात भिजल्यावर केस तसेच कोरडे करू नका. घरी आल्यावर पुन्हा केस स्वच्छ शॅम्पूने धुवा. कारण आजकाल पावसाच्या पाण्यात केमिकल्स आणि केसांसाठी हार्श ठरणारे वायू असतात. त्यामुळे जर तुम्ही पावासात भिजून आल्यावर लगेच केस शॅम्पूने धुणं खूप गरजेचं आहे. मात्र केस भिजलेले असो वा धुतलेले ते लगेच कोरड्या टॉवेलने पुसून घ्या आणि हवेवर सुकवा. 

पावसाळ्यात केसांना हिट देऊ नका –

पावसाळ्यात केस नाजूक आणि कमजोर होतात. अशा काळात जर तुम्ही केसांवर ड्रायर, स्ट्रेटनर अथवा इतर स्टाईलसाठी हिट देणाऱ्या साधनांचा वापर केला तर तुमचे केस लवकर खराब होऊन गळू लागतात. यासाठी या काळात केमिकल युक्त प्रॉडक्ट कमी वापरा आणि केसांना अती स्टाईल करून खराब करू नका. 

आठवड्यातून एकदा कोमट तेलाने मालिश करा –

घरातील मोठी माणसं आपल्याला केसांना नियमित तेल लावण्यास सांगतात. याचं कारण तेलामुळे केसांचे योग्य पोषण होतं. दररोज जरी केसांना तेल लावता आलं नाही तरी कमीत कमी आठवड्यातून एकदा तुम्ही केसांना कोमट तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. ज्यामुळे केस कोरडे होणार नाहीत  आणि पावसाळी वातावरणाचा केसांवर वाईट परिणाम होणार नाही. 

ओल्या केसांवर कंगवा अथवा हेअर ब्रश करू नका –

पावसाळ्यात तुमचे  केस भिजण्यामुळे सतत ओले होत असतात. अशा वेळी ओल्या केसांमधून कंगवा अथवा हेअर ब्रश फिरवल्यास तुमचे केस लवकर तुटून गळू लागतात. यासाठी पावसाळ्यात केस ओले असतील तर ते कंगवा अथवा ब्रशने विंचरू नका. केस आधी कोरड्या हवेत सुकू द्या मगच कंगवा अथवा ब्रश फिरवा.

ओले केस बांधून ठेवू नका –

बऱ्याचदा काम करताना अथवा गरम होतं म्हणून आपण केस क्लचने वर बांधून ठेवतो. मात्र जर तुमचे केस ओले  असतील तर ते मुळीच असे बांधून ठेवू नका. कारण असं केल्यामुळे तुमच्या केसांचे जास्त नुकसान होऊ शकतं. यासाठीच सर्वात महत्त्वाचं आहे केस आधी कोरडे करा आणि मगच त्याचा आंबाडा घाला अथवा ते बांधून ठेवा.

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या ब्युटी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये  जरूर सांगा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

नारळ तेलाचा अती वापर ठरेल घातक, होतील या त्वचेच्या समस्या

त्वचेची काळजी घेण्यासाठी करा काकडीचा रात्री झोपण्यापूर्वी वापर

पावसाळ्यात भिजण्याआधी अशी तयार करा तुमची त्वचा

Read More From Care