फॅशन

तुमच्या वॉर्डरोबमध्ये आहे का या प्रिंट्सचं कलेक्शन

Trupti Paradkar  |  Jun 30, 2022
तुमच्या वॉर्डरोबमध्ये आहे का या प्रिंट्सचं कलेक्शन

भारतात निरनिराळे फॅब्रिक आणि डिझाईन्स सहज उपलब्ध होतात. कारण भारतात विविध राज्यांमध्ये निरनिराळ्या फॅब्रिक्स आणि प्रिंट्सची परंपराच आहे. अनेक वर्षांपासून भारतात अशा प्रिंट्सचे कपडे बनवण्याची संस्कृती जपली गेल्यामुळे आजही या कला जिवंत आहेत. अनेक राज्यांमध्ये यासाठी कारागिरांना हाताने बनवलेल्या या ब्लॉक प्रिंटिंगचं खास प्रशिक्षण दिलं जातं. हे काम अतिशय नाजूक आणि कलाकुसरीचं असल्यामुळे त्यासाठी कुशल कारागिर लागतात. आजकाल ब्लॉक प्रिंटचे कपडे वापरणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. ज्यामुळे बाजारात या प्रिंट्सनां खूप मागणी आहे.परदेशातील लोकांनाही हे ब्लॉक प्रिंटचे कपडे खूप आवडतात. ज्यामुळे स्टायलिश दिसायचं असेल तर प्रत्येकीकडे कमीत कमी हे पाच ब्लॉक प्रिंटचे कपडे असायलाच हवे. तसंच वाचा हे फॅशन कोट्स (Fashion Quotes In Marathi), अस्सल मराठमोळे साडी कोट्स (Saree Quotes In Marathi), मुंबईत शॉपिंग करण्यासाठी शॉपिंग स्ट्रीट (Fashion Streets In Mumbai)

अजरक प्रिंट

अजरक प्रिंट्सचे कपडे तयार करण्यासाठी पारंपरिक लाल, निळ्या, पिवळ्या , हिरव्या अथवा काळ्या रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अजरक प्रिंट्सच्या कॉटन अथवा सिल्कच्या साड्या, ड्रेस मटेरिअल, दुपट्टा यांना बाजारात खूप मागणी आहे. अजरक प्रिंट हे सिंधु संस्कृतीचं प्रतिक मानलं जातं. अरेबिक भाषेत अजरकचा अर्थ निळा असतो आणि या ब्लॉक प्रिंटसाठी निळ्या रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो म्हणून या प्रिंटला अजरख म्हणत असावेत. सध्या राजस्थान आणि कच्छमधील अजरख प्रिंट सर्वात जास्त लोकप्रिय आहे. सहाजिकच अशा प्रिंटसाठी साडी, दुपट्टा अथवा ड्रेस तुमच्याजवळ असायलाच हवा.

कलमकारी प्रिंट

महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं प्रिंट म्हणजे कलमकारी प्रिंट… कलमकारी प्रिंट करणं खूप कठीण काम असतं. कारण हे पॅटर्न हाताने तयार करावमं लागतं. सुती कापडावर हे प्रिंट तयार करण्यासाठी आधी रात्रभर ते कापड गायीच्या शेणात बुडवून ठेवलं जातं, दुसऱ्या दिवशी सुकवून ते दूध आणि इतर वस्तूंच्या खणीत पुन्हा बुडवून ठेवतात. चांगलं सुकलं की ते नरम करण्यासाठी धोपटून कुटलं जातं. यावर चित्रलेखन करण्यासाठी पाने, फुलं, झाडांची साल, मुळं यांचा वापर केला जातो. पूर्वी हे प्रिंट फक्त इराणमध्ये छापलं जायचं मात्र आता दक्षिण भारतासह गुजरातमध्येही याचे नमुने पाहायला मिळतात.

बांधणी प्रिंट

बांधणी प्रिंटच्या नावातर या प्रिंटची खासियत लपलेली आहे. बांधून तयार करण्यात येणाऱ्या प्रिंटला बांधणी प्रिंट असं म्हणतात. बांधणी प्रिंट तयार करणं कठीण काम असलं तरी त्याचा लुकमात्र खूपच छान दिसतो. चांगल्या परिणामासाठी बांधणी प्रिंटचे काम खूप वेळ घेत आणि सावधपणे करावं लागतं. कारण चूक झाली तर पूर्ण प्रिंट खराब होण्याची शक्यता असते. गुजरातमधील खत्री समाज या प्रिंटला भारतात घेऊन आले. कापडाला गाठी बांधून मग कापड रंगवण्यात येते. कापड सुकल्यावर जेव्हा गाठ सोडण्यात येते तेव्हा बांधणी प्रिंट तयार होते. 

बाटिक प्रिंट

बाटिक प्रिंट तयार करण्यासाठी मेणाचा वापर केला जातो. बाटिक प्रिंट इंडोनेशियामधून दक्षिण आशियात आलं असा दावा केला जातो.  असं असलं तरी भारतातील एक मुख्य कलेपैकी एक असं आजही बाटिक प्रिंटला मानलं जातं. बाटिकचा मूळ उच्चार हा बतीक असा असून याचा अर्थ त्याच्या प्रिंटशी निगडीत आहे. हे प्रिंट तयार करण्यासाठी आधी कापडाला मेण लावलं जातं त्यानंतर कापड रंगवलं जातं. ज्यामुळे जिथे रंग नको असेल त्या ठिकाणी मेणाने डिझाइन काढलेली असल्यामुळे तो भाग रंगहीन राहतो आणि छान डिझाईन तयार होते. 

लहरिया प्रिंट 

आजकाल लहरिया साडी आणि दुपट्टा लोकप्रिय आहेत. शिफॉन, जॉर्जेट अथवा कॉटनच्या कापडावर हे प्रिंट तयार करतात. राजस्थानमध्ये या प्रिंटचे काम मोठया प्रमाणावर केले जाते. या प्रिंटवर गोटापट्टी वर्क केल्यास फॅब्रिक जास्त सुंदर दिसते. जाड्या, पातळ अथवा लहान मोठ्या लाईन्सच्या या प्रिंटची साडी अथवा दुपट्टा तुमच्याजवळ असेल तर तुम्ही तो अनेक प्रकारच्या ड्रेस अथवा ब्लाऊजसोबत पेअर करून स्टायलिश दिसू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From फॅशन