आरोग्य

आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात

Dipali Naphade  |  Aug 16, 2019
आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात

प्रत्येक नवजात बालकासाठी आईचं दूध हे पूर्णान्न असतं हे कित्येक वर्ष अगदी डॉक्टर्स सांगत आले आहेत. पण अजूनही काही ठिकाणी हे पाळलं जात नाही. पण आईच्या दुधामुळेच नवजात बालकांना परिपूर्ण सुरुवात मिळते हे सर्व महिलांनी लक्षात घ्यायला हवं. दिवस पूर्ण भरून प्रसूती झालेल्या बाळांसाठी आईचे दूध लाभदायक असतेच, निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (एनआयसीयू) दाखल असलेल्या बाळांसाठी आईचे दूध अधिक लाभदायक असते. या दुधामुळे बाळाला पोषक आहार मिळतोच, त्याचप्रमाणे या दुधाचे अनेक वैद्यकीय लाभही असतात. म्हणून, मातांनी आपल्या बाळांना स्तनपान दिले जाईल याची खातरजमा करावी. याविषयी आम्ही पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमधील पीडियाट्रिक्स आणि निओनॅटोलॉजी विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. तुषार पारीख यांच्याशी संवाद साधून तुमच्याासाठी याची माहिती काढली आहे. प्रत्येक गरोदर महिलेला याची माहिती असणं आवश्यक आहे. 

नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या ‘या’ 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

दुधापासून मिळतात बालकाला अनेक लाभ

Shutterstock

दरवर्षी 120 पेक्षा अधिक देशात 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. जन्मल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत स्तनपान दिले पाहिजे असे जागतिक स्तनपान सप्ताहाचे ध्येय आहे. कारण या दुधामधून आरोग्याचे लाभ मिळतात, महत्त्वाची पोषक तत्वे मिळतात, न्यूमोनियासारख्या घातक आजारांपासून संरक्षण मिळते, नवजात बालकांच्या वाढीस चालना मिळते. मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळांना स्तनपानाचा खूपच लाभ होतो. 

प्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत ‘हे’ ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स

गर्भधारणा झाल्यापासून 37 आठवडे किंवा त्या आधी झालेल्या प्रसूतीला मुदतपूर्व प्रसूती म्हणतात. दर वर्षी सुमारे दीड कोटी मुलांची प्रसूती मुदतपूर्व होते आणि हा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेली मुलांना मातांपासून विलग असतात आणि आईच्या दुधातील संरक्षक लाभांमुळे हे दूध या बाळांना अधिक आवश्यक असते. त्याचप्रमाणे त्यांना आरोग्य आणि वाढीच्या समस्यांचा धोका अधिक असतो. आईचे दूध हे औषधांसारखे कार्य करते. त्यामुळे पालकांना आईच्या दुधाचे महत्त्व असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या मुदतपूर्व बाळांना सुदृढ सुरुवात करून देऊ शकतील अशी माहिती डॉ. तुषार पारीख यांनी दिली आहे. 

वाढीला चालना देणारे घटक आईच्या दुधात

Shutterstock

आईच्या दुधात प्रतिरोधक पेशी, इम्युनोग्लोब्युलिन्स, संप्रेरके, प्रोबायोटिक्स आणि वाढीला चालना देणारे घटक 

असतात. या संदर्भात झालेल्या अभ्यासांमध्ये आढळून आले आहे की, स्तनपानावर वाढलेल्या बाळांना संसर्ग (सेप्सिस) आणि नेक्रोटायझिंग एंटरोकोलायटिस (अपचन आणि त्याने आतड्यांना येणारी सूज) होण्याची शक्यता कमी असते. मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळांसाठीही पहिल्या सहा महिन्यांमध्ये केवळ स्तनपान देण्याची शिफारस करण्यात येते. ६ महिन्यांनंतर इतर अन्नपदार्थांसह स्तनपान २ वर्षांपर्यंत सुरू ठेवावे. 

याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर सांगतात “आईच्या दुधाचे अनेक फायदे असल्यामुळे नवजात बालकासाठी स्तनपान आवश्यक असते. कोलोस्ट्रम हे आईच्या शरीरात सर्वप्रथम तयार होणारे दूध असते आणि आतड्यांची वाढ आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी ते आवश्यक असते. त्याचप्रमाणे या दुधात ओमेगा-३ सारखे मेदयुक्त घटक असतात, जे मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांच्या मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असतात. हे घटक सामान्यत: शेवटच्या तिमाहीमध्ये विकसित होतात. पण मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे या वाढीवर थोडाफार परिणाम झालेला असू शकतो. मातेच्या दुधाचे प्रमाण जेवढे वाढते तेवढाच सडन इन्फंट डेथ सिन्ड्रोम (एसआयडीएस),अलर्जी, लहानपणी होणारा मधुमेह आणि स्थूलपणाचा धोका कमी होतो. दररोज 10 मिलिलीटर जास्त दूध प्यायल्यास सेप्सिसचा धोका 19 टक्क्यांनी कमी होतो. 

#WorldBreastFeedingWeek : स्तनपानाने टळतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका…हे खरं आहे का

त्यांनी पुढे सांगितलं “एनआयसीयूमधील वास्तव्यानंतरही आईच्या दुधामुळे नवजात बालकाच्या मेंदूचा विकास अधिक जोमाने होतो. ज्या बाळाला दररोज आईचे 110 मिलिहून दूध मिळते त्याचा 18 व्या महिन्यातील बुध्यांक आणि बिहेव्हिअरल स्कोअर्स (वागणुकीतील गुण) वाढतात आणि फॉर्म्युला दुधाच्या तुलनेने लघुकालिन व्यंगे निर्माण होण्याची शक्यता कमी असते. स्तनपान मिळत असलेल्या मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळांना हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज मिळतो आणि तो मिळाल्यानंतर पहिल्या वर्षात हॉस्पिटलमध्ये पुन्हा दाखल व्हावे लागण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मृत्यू किंवा व्यंगांचे प्रमाणही कमी होते आणि जीवनमानाचा दर्जा सुधारतो.”

Read More From आरोग्य