आरोग्य

कधी कधी न रडताही का येतं डोळ्यातून पाणी, जाणून घ्या तज्ञ्जांचा सल्ला

Trupti Paradkar  |  Oct 4, 2021
कधी कधी न रडताही का येतं डोळ्यातून पाणी, जाणून घ्या तज्ञ्जांचा सल्ला

अश्रू हे डोळ्यांसाठी काही प्रमाणात लाभदायी असतात कारण डोळे ल्युब्रिकेटेड ठेवण्यासाठी आणि डोळ्यात गेलेले बाहेरील कण काढून टाकण्यासाठी ते उपयुक्त असतात. मात्र बऱ्याचजणांना न रडताही डोळ्यात सतत पाणी येण्याचा त्रास जाणवतो. मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. निता शाह यांनी डोळ्यातून असं सतत पाणी येण्यामागचे कारण विस्तृतपणे सांगितलं आहे. वैद्यकीय शास्त्रात रडण्याव्यतिरिक्त डोळ्यातून अश्रू येणं याला एपिफोरा असे म्हणतात. हे एका आजाराचं लक्षण आहे, ज्यात डोळ्यात अपुऱ्या टिअर फिल्म ड्रेनेज तयार होतात. या परिस्थितीत अश्रू नॅसोलाक्रिमल सिस्टिमच्या माध्यमातून जाण्याऐवजी चेहऱ्यावर ओघळतात. डॉ. निता शाहच्या मते, “अश्रूंची प्रमाणापेक्षा अधिक निर्मिती आणि कोंडलेल्या वाहिन्या यामुळे डोळ्यातून पाणी येते. बाळांमध्ये, कोंडलेल्या वाहिन्या हे सर्वसाधारण आढळणारे कारण आहे. काही बालकांमध्ये जन्मजात अविकसित वाहिन्या असतात, काही आठवड्यांनी या पूर्ण विकसित झाल्यावर त्या रिकाम्या होतात. अश्रूवाहिनी निमुळती झाली असेल किंवा कोंडली असेल तर संसर्ग होण्याचा धोका असतो. परिणामी, अश्रूंच्या पिशवीत अश्रू साचून राहू शकतात. प्रौढांमध्ये आणि मोठ्या मुलांमध्ये अश्रूंची अतिनिर्मिती हे सामान्यपणे आढळणारे कारण असते.” त्यासोबतच बाहेरचं काही डोळ्यात गेले तर सामान्य तापमान असलेल्या स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे आणि रुग्णाने डोळे चोळू नये. हे केल्यानंतरही डोळ्यात गेलेले बाहेरचे काही डोळ्यातच असल्याची जाणीव कायम असेल तर रुग्णाने नेत्रविकारतज्ञाचा सल्ला घ्यावा. ल्युब्रिकेशनसाठी कृत्रिम अश्रू, अँटिबायोटिक ड्रॉप्स वापरून ते कण बाहेर काढावेत. रासायनिक घटकांमुळे इजा झाली असेल तर भरपूर स्वच्छ पाणी घेऊन डोळा धुवावा आणि रुग्णाने नेत्रविकारतज्ञाची भेट ताबडतोब घ्यावी.

डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी सोपे डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain)

डोळ्यातून पाणी येण्याबाबत काही लक्षणे आणि उपाय

अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येणे ही स्थिती एका अॅलर्जनमुळे उद्भवते जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या प्रमाणापेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे निर्माण होते.  त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात खाज येणे, डोळे लाल होणे, आणि पाहताना त्रास होणे हे परिणाम होतात. रुग्णांनी ॲलर्जेन टाळावेत, डोळे चोळू नये आणि कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नयेत. संसर्गजन्य कंजन्क्टिव्हायटिसमध्ये डोळे लाल होणे, वेदना होणे, प्रकाशाकडे बघण्यास त्रास होणे, चिकटपणा जाणवणे,  चिकट द्रव बाहेर येणे ही लक्षणे दिसू शकतात. हा संसर्ग कोणत्याही उपचाराविना एका आठवड्यात बरा होऊ शकतो.

डॉ. निता शाहच्या मते, “ या लक्षणांपासून दिलासा मिळण्यासाठी रुग्णाने स्क्रीन टाइम कमी करणे आवश्यक आहे, अँटि रिफ्लेक्टिव्ह कॉटिंग असलेले चष्मे वापरावे,  ब्ल्यू लाईट फिल्टर वापरला जाऊ शकतो आणि 20- 20- 20 या नियमाचा अवलंब करावा.  या नियमांमध्ये वीस मिनिटे स्क्रीन वापरल्यानंतर वीस सेकंदांसाठी वीस फूट लांबपर्यंत दूर पाहावे.  त्याचप्रमाणे उबदार कपड्याने डोळ्याला लावणेही हितकारक असेल.  डोळ्यांमध्ये शुष्कपणा किती आहे यानुसार कृत्रिम अश्रू आणि जेल यांचा वापर केला जाऊ शकतो.  शुष्कपणा गंभीर स्वरूपाचा असेल तर कोंडलेल्या ग्रंथी मोकळ्या करण्यासाठी आयआरपीएलचा (इंटेन्स रेग्युलेटेड पल्स लाइट थेरपी) वापर केला जाऊ शकतो.” त्याचप्रमाणे “निचरा मार्गाला झालेली इजा व अडथळा यामुळे डोळ्यातून पाणी येण्याचे प्रमाण वाढू शकते. ज्यासाठी उपचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सौम्य वा कर्करोगयुक्त ट्युमर्स म्हणजेच लॅक्रिमल ग्लँड ट्युमर्स किंवा पॅरानेझल सायनसेसचे ट्युमर यामुळे गंभीर स्वरुपाचा शुष्कपणा येऊ शकतो. यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.”

डोळे जळजळ उपाय, करा सोप्या पद्धतीने (Dolyana Khaj Yene Upay)

Read More From आरोग्य