बॉलीवूड

‘खतरों के खिलाडी’चा विजेता पुनीत, आदित्यने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Dipali Naphade  |  Mar 10, 2019
‘खतरों के खिलाडी’चा विजेता पुनीत, आदित्यने जिंकलं प्रेक्षकांचं मन

‘खतरों के खिलाडी’चा प्रत्येक सीझन अप्रतिम असतो. सेलिब्रिटीजना वेगवेगळ्या संकटांना तोंड देत मार्ग काढताना बघून प्रेक्षकांना आनंद मिळत असतो. यावर्षीदेखील नेहमीप्रमाणे हा शो चर्चेत राहिला आणि नेहमीच टॉप शो राहिला. या शो चा विजेता कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. नुकताच याचा ग्रँड फिनाले सोहळा पार पाडला. रोहित शेट्टी आणि अक्षयकुमारने या वर्षीचा विजेता घोषित केला. पहिल्या भागापासून पुनीत आणि आदित्यने एकमेकांना खूपच चांगली टक्कर दिली. अगदी पहिल्या स्टंटपासून दोघेही कधी मागे हटले नाहीत. या भागाचा विजेता होण्यापूर्वीच्या स्टंटमध्येही पुनीत आणि आदित्य यांच्यातच सामना रंगला आणि विजेता होण्याचा मान पुनीत जे. पाठकने पटकावला. असं असलं तरीही आदित्य नारायणने प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून घेतली आहेत. इतकंच नाही तर ‘खतरों के खिलाडी’चा निवेदक असणाऱ्या रोहित शेट्टीनेही वेळोवेळी आदित्यची प्रशंसा केली.


पुनीतला केवळ एकदाच मिळाला फिअरफंदा

पुनीत पहिल्या भागातील स्टंटपासून फिअरफंदापासून दूर राहिला. ‘खतरों के खिलाडी’ या स्पर्धेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची भीती तुम्ही मनातून काढून टाकणं गरजेचं असतं. पुनीतने हे प्रत्येकवेळी सिद्ध करत या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पुनीतला ग्रँड फिनालेच्या एक आठवडा आधी झालेल्या एका टास्कमध्ये फक्त फिअरफंदा मिळाला. पण त्याआधी त्याने कोणत्याही स्टंटमध्ये हा फिअरफंदा मिळवला नसून तो कोणत्याही एलिमिनेशन स्टंटमध्ये आला नव्हता. यावेळीदेखील त्यांच्या खांदेदुखीमुळे त्याला हा फिअरफंदा मिळाला होता. शिवाय पुनीतने एकदाही कोणताही स्टंट अबॉट केला नाही.

आदित्यने पुनीतला दिली टक्कर

आदित्य नारायणने पुनीतला अप्रतिम टक्कर दिली. अगदी पहिल्या भागापासून आदित्यने अप्रतिम स्टंट केले. इतकंच नाही तर त्याने प्रत्येक खेळामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. एक स्टंट करताना आदित्यच्या डोळ्याखाली दुखापत होऊन त्याला टाके पडले पण तरीही त्याने स्टंट पूर्ण केल्यानंतरच डॉक्टरांची मदत घेतली. त्याच्या या खिलाडू वृत्तीला रोहितनेदेखील सलाम केला. आदित्यनेही कोणताही स्टंट अबॉट केला नाही. इतकंच नाही तर त्याची जिंकण्याची जिद्द प्रत्येक स्टंटमध्ये दिसून आली. इतर स्पर्धक घाबरत असलेल्या कोणत्याही गोष्टीला पुनीत आणि आदित्य कधीही न घाबरता कायम लिमिटलेस राहिले. इतकंच नाही तर ग्रँड फिनालेच्या आधी झालेल्या स्टंटमध्ये भारतीला पोहता येत नसल्यामुळे एकट्याने स्टंट करून सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं.


आदित्य आणि पुनीतने नेहमीच एकमेकांना केलं बुस्ट

प्रत्येक स्टंटमध्ये तू करू शकतोस हा विश्वास नेहमीच दोघांनी एकमेकांना दिला. एकवेळ आदित्यला टाके पडल्यानंतर करण्यात आलेल्या स्टंटमध्ये आदित्यऐवजी पुनीतने स्टंट केला आणि आादित्यसाठी तो स्टंट त्याने जिंकला होता. त्यानंतर पुनीतबद्दलचा आदर वाढल्याचंही एका मुलाखतीमध्ये आदित्यने सांगितलं आहे. शिवाय प्रत्येकवेळी दोघांनी एकमेकांना बुस्ट केलं आणि स्पर्धा ही स्पर्धेसारखीच खेळली. कोणत्याही खेळामध्ये दोघेही मागे हटले नाहीत. एकमेकांना अप्रतिम टक्कर दिली. पुनीतने बाजी मारली असली तरीही आदित्यनेही प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. 

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा – 

‘खतरों के खिलाडी’ सीझन 9 चा विजेता ठरणार का पुनीत पाठक

खतरों के खिलाड़ी- 9: जिगर पे ट्रीगर घेण्यासाठी सेलिब्रिटींना किती मिळतात पैसे

म्हणून अक्षय कुमार आजही आहे ‘खिलाडी’

 

 

 

Read More From बॉलीवूड