मेकअप

लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट निवडताना विचारा हे प्रश्न, मग करा फायनल

Dipali Naphade  |  Mar 23, 2021
लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट निवडताना विचारा हे प्रश्न, मग करा फायनल

लग्न ठरल्यानंतर अनेक गोष्टी करायच्या असतात. पण त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे लग्नात सर्वात सुंदर दिसण्यासाठी लागणारा मेकअप आर्टिस्ट निवडणे. हा एक मोठा टास्क झाला आहे. आपण हल्ली सोशल मीडियावरही खूप #beautyvideo पाहतो. आपल्याला अनेक जणांनी केलेला लग्नासाठीचा मेकअप आवडतो. पण जेव्हा मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) निवडायची वेळ येते तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न मनात असतात. पण ते प्रश्न विचारले जात नाहीत. पण जेव्हा लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट निवडायचा आहे तेव्हा फायनल करण्यापूर्वी काही आवश्यक प्रश्न विचारणे अत्यंत गरजेचे आहे. कारण लग्नामध्ये आपणच सर्वात छान दिसावं असं प्रत्येक नवरीला वाटत असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे मेकअप आर्टिस्ट असा हवा अथवा अशी हवी ज्यांनी तुम्हाला वेडिंग लुक कसा असेल याची पूर्ण माहिती आणि ट्रायल द्यावी. पण मेकअपशिवाय (Bridal Makeup) तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणे गरजेचे आहे आणि ते नेमके कोणते हे नक्की मेकअप आर्टिस्टची फायनल निवड करण्यापूर्वी जाणून घ्या. जेणेकरून लग्नात तुम्हाला कोणत्याही वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. 

निरनिराळ्या फेस शेपसाठी ट्राय करा ‘या’ मेकअप टीप्स

 

 

नेमके कोणते प्रश्न विचारावेत

तुमच्यावजळ असा कोणता तयार पोर्टफोलिओ आहे का, जो आम्ही पाहू शकतो?

हे का आहे आवश्यक – तुम्हाला तुमच्या मेकअप आर्टिस्टच्या कामाबाबत माहिती असायला हवा. कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे फोटो असतील, याआधी नववधूला करण्यात आलेला मेकअप असो याची माहिती तुम्हाला हवी. तुम्ही ते फोटो पाहून, त्याचे काम नक्की कसे आहे ते ठरवू शकता. तसंच तुम्हाला यावरून त्याच्या काम करण्याची पद्धत आणि तुमचा लुक कसा असू शकेल याची कल्पना येईल. मेकअप आर्टिस्टचे कौशल्य नक्की काय आहे हेदेखील यावरून तुम्हाला ठरवता येते. कोणत्या पद्धतीच्या मेकअपमध्ये निपुण आहे हेदेखील जाणून घेता येते आणि त्याशिवाय तुम्हाला फायनल करताना तुम्हाला नक्की कोणता लुक हवा आहे हेदेखील तुम्हाला यातून ठरवता येते.  

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

कोणकोणत्या सेवा तुम्ही उपलब्ध करून देणार?

हे का आहे आवश्यक – या प्रश्नामुळे तुम्हाला तुमच्या लग्नात कसे तयार व्हायचे आहे आणि त्याशिवाय अन्य कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला तयारी करायची आहे याचा अंदाज येईल. मेकअपमध्ये साडी नेसवणे, हेअर स्टाईल या गोष्टींचाही समावेश आहे की नाही याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला केवळ मेकअप हवा असेल अथवा केवळ साडी नेसणे आणि हेअर स्टाईल हवी असेल, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मेकअप आर्टिस्टसह ठराव करू शकता. तुम्ही लग्नाआधी या सगळ्या गोष्टी त्यांच्यासह बोलणे आवश्यक आहे. कारण लग्नाच्या घाईत नकार आणि होकार यामुळे आपलीही चिडचिड होऊ शकते. 

कोणकोणत्या पद्धतीचे मेकअप तुम्हाला करता येतात?

हे का आहे आवश्यक – लग्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेकअप केले जातात. आपल्याकडे जाती आणि धर्माप्रमाणेही मेकअप करण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही कोणते कपडे घालणार आहात आणि त्यानुसार तुम्हाला कोणत्या पद्धतीचा मेकअप हवा आहे याचा अंदाज तुम्ही मेकअप आर्टिस्टला देता. पण त्या मेकअप आर्टिस्टला तसा मेकअप करता येतो की नाही हे जाणून घ्यायला हवे. तसंच प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यानुसार गडद आणि लाईट नक्की कसा मेकअप हवा आहे याचीही त्यांच्याकडून माहिती घेणे गरजेचे आहे. 

मेकअप करताना कोणत्या उत्पादनांचा वापर करण्यात येणार आहे? हा मेकअप फोटोच्या दृष्टीने योग्य असेल ना?

हे का आहे आवश्यक – व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट वेगवेगळ्या ब्रँडचा वापर करतात. वेगवेगळ्या कंपनीची उत्पादने वापरतात. पण आपल्या त्वचेला नक्की काय योग्य आहे आणि आपण लग्नात अगदी भडक तर दिसणार नाही ना अथवा आपल्या त्वचेला यामुळे कोणती अलर्जी तर येणार नाही ना याबाबत आधीच माहिती करून घ्यायला हवी. तसंच मेकअप आर्टिस्टला तुम्हाला कोणताही अलर्जी असल्यास आधीच सांगावे जेणेकरून त्या उत्पादनाचा वापर होणार नाही. 

सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

टीममध्ये सहायक आहेत की नाही?

हे का आहे आवश्यक – बऱ्याचदा एकच मेकअप आर्टिस्ट असेल तर लग्नात गोंधळ उडतो. नवरीचा मेकअप अत्यंत महत्वाचा असतो. पण तिच्या इतर नातेवाईकांनाही मेकअप हवा असतो. मग अशावेळी मेकअप आर्टिस्टचे सहायक मदत करतात. त्यामुळे आपल्यासाठी केवळ मेकअप आर्टिस्ट आणि इतरांसाठी सहायक आहे की नाही हे विचारून घ्यावे. 

लागणारे साहित्य मेकअप आर्टिस्ट आणणार की आपल्याला आणायचे आहे?

हे का आहे आवश्यक – तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला ही बाब फायनल करण्यापूर्वी नक्की मेकअप आर्टिस्टसह बोलायला हवी. चेहऱ्यावर कोणत्या ब्रँडचा वापर होणार आणि ब्रश वापरणार हे आपल्याला माहीत असायला हवे. तसंच आपल्याला आपलेच ब्रँड हवे असतील तर तुम्ही मेकअप आर्टिस्टला तसा सल्लाही देऊ शकता. त्यानुसार बोलणी करून तुम्ही ठरवणे योग्य आहे. 

 

Read More From मेकअप