राखीचं पवित्र बंधन हे भावाबहिणीसाठी खास असतं. त्यामुळे रक्षाबंधन माहिती तर आपल्याकडे सगळ्यांनाच असते. पण यंदा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आपल्याला भावाला देताना तुम्ही त्याच्यासाठी खास घरी बनवलेली शुद्ध आणि पौष्टिक मिठाई नक्की बनवून पाहा.
रक्षाबंधन म्हटल्यावर बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि सोबतच मिठाई भरवून त्याचं तोंड गोड करते. यंदाच्या राखीला तुम्ही आपल्या भावासाठी बाहेरून महागडी मिठाई आणण्याऐवजी घरीच पौष्टिक मिठाई बनवा. कारण सणावाराच्या वेळी बरेचदा मिठाईची जास्त मागणी असल्याने त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. तसंच बाहेरची मिठाईही आरोग्यदायीही नसते. पण घरी आणि स्वतः बनवलेली मिठाई कधीही उत्तमच नाही का? पाहा मिठाईच्या काही सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज तुमच्यासाठी.
नारळाची बर्फी
नारळाची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे खालीलप्रमाणे –
250 ग्रॅम किसलेलं ओलं खोबरं
100 ग्रॅम मावा
200 ग्रॅम साखर
एक चमचा तूप
एक चमचा वेलची
चांदीचा वर्ख
2-3 केशर काड्या
कृती – बर्फी बनवायला सुरूवात करायच्या आधी मावा किसणीवर व्यवस्थित किसून घ्या.
मग कढईत गुलाबीसर होईपर्यंत चांगला परतून घ्या.
मावा थंड झाल्यावर त्यात खोबरं घाला.
दीड तारेचा पाक तयार करा. या पाकात खोबरं आणि माव्याचं मिश्रण घाला व मिक्स करून घ्या.
आता एका ताटात थोडंस तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरवून घ्या.
थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा व वरून चांदीचा वर्ख आणि केशर पाण्याने गार्निश करा.
तयार आहे तुमची स्वादिष्ट नारळाची बर्फी.
कॉर्न स्वीट डिश
कॉर्न स्वीट डिश बनवण्यासाठी लागणारं साहित्य खालीलप्रमाणे –
एक वाडगा ताजे कॉर्नचे दाणे घ्या.
100 ग्रॅम खवा, 100 ग्रॅम नारळाचे तुकडे
100 ग्रॅम देशी तूप, 25 ग्रॅम बदामाचे तुकडे
3-4 वेलची, चिमूटभर खाण्याचा रंग
150 ग्रॅम पिठीसाखर
सजावटीसाठी काजू-बदाम किंवा नारळाचे काही तुकडे
कृती –
कॉर्नचे दाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
कढईमध्ये तूप गरम करून त्यात हे वाटणं गुलाबीसर परतून घ्या.
आता यामध्ये मावा मिक्स करा आणि पुन्हा 5 मिनिटं परता.
नंतर त्यात साखर मिक्स करा आणि 2 वाट्या पाणी घालून ते मंद आचेवर शिजू द्या.
पाणी सुकल्यावर त्यात हलका पिवळा रंग आणि उरलेला मेवा व वेलची पावडर घालून मिक्स करा.
शेवटी बदाम-काजूने गार्निश करा.
तयार आहे तुमचा स्वीर्ट कॉर्न हलवा.
पनीरचे लाडू
पनीरचे लाडू बनवण्यासाठी साहित्य खालीलप्रमाणे –
200 ग्रॅम पनीर, 3/4 कंडेंस्ड मिल्क, 1/4 दूध, 1 चमचा साखर, 2 वेलची तुकडे, केसर, 1 चमचा तूप घ्या.
कृती – पनीर हाताने चांगलं कुस्करून घ्या आणि मऊसर करा.
आता पनीरमध्ये कंडेंस्ट मिल्क, दूध, वेलची दाणे आणि केसर मिक्स करा.
याची पेस्ट बनवून घ्या. जर तुम्हाला गोड कमी वाटलं तर त्यात अजून साखर आणि कंडेंस्ट मिल्क घाला.
एका नॉनस्टिक कढईत तूप घाला आणि हे मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. जोपर्यंत ते कोरडे होईल.
जेव्हा या मिश्रणाचा चिकटपणा कमी होईल तेव्हा गॅस बंद करा.
हे मिश्रण प्लेटमध्ये काढून त्याला लाडूचा आकार द्या. तुमच्या आवडत्या सुका मेव्याने हे लाडू सजवा.
मग यंदा राखी पौर्णिमेला आपल्या भावाला आणि कुटुंबियांना स्वतः बनवलेली घरगुती मिठाई नक्की खाऊ घाला. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.