DIY सौंदर्य

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

Trupti Paradkar  |  Apr 26, 2019
केस धुताना करू नका या ‘7’ चुका

लांबसडक आणि काळेभोर केस स्त्रीच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र आजकाल अनेकींना केस गळण्याची चिंता सतावत असते. बऱ्याचदा केस विंचरताना अथवा केस धुताना केस मोठ्या प्रमाणावर गळतात. कधी कधी केस गळण्यामागचे कारण हवामानातील बदल अथवा धुळ-प्रदूषण असू शकते. मात्र बऱ्यादचा तुमच्या कडून होणाऱ्या काही शुल्लक चुकांमुळे तुमचे केस गळू शकतात. अनेकवेळा केस धुताना केल्या जाणाऱ्या काही गोष्टी तुमच्या केस गळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तुम्ही देखील केस धुताना या चुका करत असाल तर ताबडतोब त्या करणं बंद करा. कारण त्यामुळे तुमचे केस गळणं नक्कीच थांबेल.

यासोबत वाचा Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल (Hair Spa At Home In Marathi)

लांबसडक केस हवे असतील तर करू नका या चुका

1.गरम पाण्याने केस धुणे

काही जणींना अती गरम पाण्याने केस धुण्याची सवय असते. मात्र गरम पाण्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. पाण्याचे तापमान जास्त असेल तर त्यामुळे तुमचे केस कोरडे आणि निस्तेज होतात. शिवाय केसांची मुळं यामुळे दुखावली जातात आणि केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. यासाठी केस धुण्यासाठी कोमट अथवा थंड पाण्याचा वापर करा.

2.अती प्रमाणात शॅंपूचा वापर करणे

केस धुताना दोन पेक्षा अधिक वेळा शॅंपू करू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते. केसांना नैसर्गिक तेलाची गरज  असते. ज्यामुळे केसांचे पोषण होते आणि केस चमकदार दिसतात. जर केस फार तेलकट अथवा खराब झालेले असतील तरच दोन वेळा शॅंपू करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणार असाल तर एखाद्या सौम्य शॅंपूचा वापर करा आणि तो फक्त एकदाच केसांवर लावा. शिवाय केसांना सल्फेट फ्री शॅंपू वापरा

3.कंडिश्नर केसांच्या मुळांना लावणे

केसांना शॅंपू केल्यावर केसांना कंडिश्नर लावण्याची गरज असते. मात्र कंडिश्नर केसांच्या मुळांना कधीच लावू नका. केस आणि केसांच्या टोकाकडील भाग यावर कंडिश्नर लावावे आणि ते लगेच धुवून टाकावे. केसांच्या मुळांना कंडिश्नर लावल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते.  शिवाय केस धुतल्यावर लगेच कंडिश्नर लावू नका त्याआधी केस हलक्या हाताने पिळून घ्या. केसांमधील पाणी निघून गेल्यावर त्यावर कंडिश्नर लावा.

कोरड्या केसांची काळजी घेणं आता अजून सोपं (How To Take Care Of Hair In Marathi)

4.केस जोरजोरात रगडून धुणे

केस धुताना ते जोरजोरात घासून अथवा रगडून धुवू नका. कारण त्यामुळे ते कमजोर होतात  आणि लवकर तुटतात. यासाठी शॅंपू केसांना लावल्यावर केस हलक्या हाताने चोळून धुवा. ज्यामुळे तुमचे केस तुटणार नाहीत.

5.टॉवेलने केस रगडून पुसणे

केस धुतल्यावर ते टर्किशच्या टॉवेलने कधीच पुसू नका कारण त्यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते. केस एखाद्या सुती कापडाने अथवा पंचाने पुसा. ज्यामुळे केसांचे नुकसान होणार नाही.

6.केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरणे

केस धुतल्यावर ते सुकवण्यासाठी दररोज हेअर ड्रायर वापरू नका. कारण त्यामुळे केस लवकर कोरडे होतात. नैसर्गिक पद्धतीने केस न सुकल्यास ते तुटण्याची शक्यता जास्त असते. कारण हेअर ड्रायरमुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. एखादी स्पेशल हेअरस्टाईल केल्यावर हेअर ड्रायर वापरण्यास काहीच हरकत नाही. मात्र नियमित हेअर ड्रायर वापरू नका.

7.धुतल्यावर केस घाईघाईत विंचरणे

केस धुतल्यावर लगेच कंगवा अथवा ब्रशने जोरजोरात विंचरल्यामुळेदेखील तुमचे केस लवकर तुटू शकतात. यासाठी केस कोरडे झाल्यावर केसांमधील गुंता सावकाश सोडवा.

केस धुताना या चुका टाळल्यास तुमचे केस लांब आणि चमकदार नक्कीच होतील.

सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From DIY सौंदर्य