श्रावण सुरु झाला की, बाजारात वेगवेगळ्या भाज्या दिसू लागतात. सगळीकडे चांगला पाऊस पडल्यामुळे या काळात काही खास हिरव्या पालेभाज्या उगवतात. याशिवाय काही असा फळभाज्या आहेत ज्या काळात अगदी हमखास मिळतात. श्रावणात मासांहार वर्ज्य असल्यामुळे या काळात शरीरात जास्तीत जास्त प्रमाणात प्रथिनं, क्षार आणि जीवनसत्वे जाण्यासाठी भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. तुम्हाला भाज्या आवडत नसल्या तरी देखील श्रावणात मिळणाऱ्या भाज्या या अधिक चविष्ट आणि वेगळ्या असतात. जाणून घेऊया श्रावणात मिळणाऱ्या या भाज्यांचे फायदे
श्रावण भेंडी
श्रावण भेंडी हा प्रकार तुम्ही बाजारात नक्की पाहिला असेल. श्रावण भेंडी यालाच ‘नवधारी भेंडी’ असे देखील म्हटले जाते. ही भेंडी आकाराला थोडी लांब असतात. रोजच्या भेंडीचा आकार हा फार फार तर बोटाइतका मोठा असतो. पण श्रावण भेंडीचा आकार हा थोडा लांब असतो. या भेंडीला नऊ धार असतात हे त्याचे आणखी एक विशेष त्यामुळे भाजीच्या गोल गोल चकत्या पाडल्यानंतर त्याच्या 9 धार अगदी स्पष्ट दिसतात. या भेंडी चवीला अधिक चांगल्या लागतात.यामध्ये बुळबुळीतपणा थोडा कमी असतो. ही चविष्ट भाजी शरीराला भरपूर फायबर पुरवते.
करटुलं
कंटुळ किंवा करटुल नावाची ही भाजी तुम्ही सगळ्यांनीच बाजारात पाहिली असेल. कारल्यासारखी दिसणारी ही भाजी. पण छोट्या छोट्या आकाराची असतात. गोल गोल आकाराच्या या भाजीवर लहान लहान काटे असतात.ही भाजी कारल्याप्रमाणे चवीला कडू लागते. पण कारल्यासारखी ती कडक नसते. ती आतून खूपच नरम असते. त्यामुळे ही भाजी शिजवल्यानंतर त्याचा एक वेगळाच स्वाद लागतो. श्रावणात घरी आणून हमखास ही भाजी एकदा तरी खाल्ली जाते.
श्रावण घेवडा
श्रावणात घेवडा देखील येतो. ही भाजी श्रावण घेवडा नावाने ओळखली जाते. श्रावणात या घेवड्यामध्ये शेंगा येतात. त्यामुळे याच काळात ही भाजी येते. श्रावण घेवडा भाजी चवीला फारच चविष्ट लागते. यातील शेंगा काढून ही भाजी केली जाते किंवा काही जण त्याच्या हिरव्या बाहेरच्या आवरणासह ही भाजी करतात.त्यामुळे ही भाजी आणखी छान लागते. श्रावण घेवडा हा प्रथिनं आणि फायबर यांचे योग्य प्रमाण असल्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही भाजी मदत करते.
बांबूचे कोंब
बांबूचे कोवळे कोंबही या दिवसात निघतात. खूप जण या दिवसात कोवळ्या बांबूची भाजी देखील खातात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर नव मातेचे शुद्धीकरण होण्यासाठी तिला कोबळ्या कोंबाची भाजी खायला दिली जाते. बांबूचा मऊ मासंल भाग हा भाजीसाठी वापरला जातो. बांबू ही एक तंतूमय वनस्पती असल्यामुळे यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते.
आता श्रावणात तुम्ही या भाज्यांचा आस्वाद नक्की घ्या.
अधिक वाचा
‘या’ पावसाळी रानभाज्यांची चव तुम्ही चाखली आहे का
भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
श्रावणातच आहे खमंग, कुरकुरीत अळूवडीचा खरा स्वाद, रेसिपी खुमासदार!