Natural Care

रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी

Trupti Paradkar  |  Mar 14, 2019
रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी

रंगपंचमीचा सण म्हणजे रंगाची उधळण. विविध रंगासोबतच हा सण आनंदही घेऊन येतो. पुरणपोळी, थंडाई या होळी स्पेशल डिशेस यामुळे या सणात खाण्यापिण्याचीही चंगळ असते. होळीसाठी मित्रमंडळी, नातेवाईकमंडळी एकत्र येतात. एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात आणि रंग लावतात. त्यामुळे दुरावलेली नाती जवळ आणण्यासाठी रंगपंचमी एक चांगलं माध्यम आहे. होळीच्या सणावर अनेक गाणीही रचण्यात आली आहेत. अनेकांच्या घरी होळीचं खास सेलिब्रेशन आयोजित केलं जातं. मात्र या आनंदाच्या क्षणांना अचानक गालबोट लागू शकतं जेव्हा कोणीतरी तुम्हाला निकृष्ठ दर्जाचा रंग लावतं.आजकाल बाजारात अनेक खराब दर्जाचे रंग उपलब्ध असतात. रंगपंचमी खेळताना कोण – कोणत्या दर्जाचे रंग वापरेल हे सांगता येत नाही. शिवाय रंग लावल्यावर याबाबत तक्रारदेखील करता येत नाही. कारण यावर तुम्हाला उत्तर मिळू शकतं “बुरा न मानो होली है”. वास्तविक या खराब दर्जाच्या रंगामुळे तुमची त्वचा आणि केसांचे नुकसान होऊ शकतं. यासाठी रंगपंचमी खेळण्याच्या आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या त्वचेचं आणि केसांचं रक्षण होऊ शकतं. यासाठीच रंगपंचमीला त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी खाली दिलेले उपाय जरूर करा. शिवाय आपली त्वचा संवेदनशील असल्यामुळे तिची व्यवस्थित काळजी घेणं फार गरजेचं आहे. रंगपंचमीतील खराब रंगांमुळे तुमच्या केसांचंदेखील अतोनात नुकसान होऊ शकतं. त्वचा आणि केसांवर केमिकल्सयुक्त रंगाचा विपरित परिणाम होऊ शकतो. कधी कधी हे रंग साबण अथवा तेलाने निघत देखील नाहीत. शिवाय बऱ्याचदा रंगपंचमी घराबाहेर उन्हात खेळली जाते. सुर्यकिरणांमधील अतिनील किरणांमुळे त्वचा काळंवडण्याची देखील शक्यता असते. यासाठीच रंगपंचमी खेळण्याआधीच याबाबत सावध राहणे उत्तम ठरेल. रंग लावण्याआधीच काळजी घेतली त्वचा आणि केसांचे नुकसान होणे टाळता येऊ शकते.

मात्र काहीही असलं तरी शक्य असेल तर नैसर्गिक आणि चांगल्या दर्जाचे रंग खेळण्यासाठी वापरा. कारण नैसर्गिक कोरडे रंग वापरल्यास अधिक नुकसान होत नाही. आम्ही तुम्हाला रंगपंचमी खेळल्यानंतर रंग काढून टाकण्यासाठीदेखील काही टीप्स देत आहोत.

रंगपंचमी खेळण्याआधी कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी

त्वचेवर एरंडेल तेल लावा

रंगपंचमी खेळण्याआधी त्वचेवर कोल्ड प्रेस एरंडेल तेल लावा. कारण एरंडेल तेल हे एक उत्तम स्किनकेअर उत्पादन आहे. एरंडेल तेलामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट असतं. त्यामुळे तुमच्या त्वचेचे चांगले पोषण होते. एरंडेल तेलामुळे तुमची त्वचेतील कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही रंगपंचमी खेळण्याआधी त्वचेवर एरंडेल तेल लावता तेव्हा तुमच्या त्वचेचे संरक्षण होते.

त्वचेवर ऑईल लावा

ऑलिव्ह ऑईल त्वचेच्या कोणत्याही समस्येवर गुणकारी ठरू शकते. यासाठी रंगाचा सण साजरा करण्याआधी शरीरावर ऑलिव्ह ऑईल लावा. तेल लावल्यावर थोडावेळ त्वचेवर मसाज करा आणि त्यानंतर रंगपंचमी खेळण्यास जा.

त्वचा आणि केसांना नारळाचे तेल लावा

नारळाचे तेल हे एक बहुगुणी तेल आहे. खाद्यपदार्था तयार करण्यापासून ते अगदी त्वचेला मसाज करण्यापर्यंत कशासाठीही तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता. यासाठी रंगपंचमी खेळण्याआधी तुमच्या त्वचेवर आणि केसांवर नारळाचे तेल लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांचं संरक्षण होईल.

केस मोकळे सोडू नका

रंगपंचमी खेळताना केस कधीच मोकळे सोडू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. शिवाय शक्य असल्यास केसांना एखाद्या स्कार्फ गुंडाळून ठेवा.

जाड पोताचे कपडे वापरा

रंगपंचमी खेळण्यासाठी जाड पोताचे आणि शरीरपूर्ण झाकतील असे कपडे वापरा. पूर्ण बाह्याचे आणि जाड पोताच्या कपड्यांमधून रंग तुमच्या त्वचेच्या खोलवर जाणार नाहीत.

वाचा – रंगपंचमीची संपूर्ण माहिती 

रंगपंचमी खेळल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्याल

त्वचेवरील रंग काढून टाकणं हे एक महाकठीण काम असतं. काही रंग तर त्वचेवरून काढून टाकण्यासाठी बरेच दिवसदेखील लागतात. जर तुम्ही रंगपंचमी खेळण्याआधीच त्वचेची काळजी घेतली तर नंतर त्वचेवर लावलेला रंग काढणं तुम्हाला सोपं जाऊ शकतं.

रंगपंचमी खेळल्यावर केसांची काळजी कशी घ्याल

त्वचेची काळजी घेण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. चमचमीत आणि मीठाचा वापर केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळा.

डोळ्यांची विशेष काळजी घ्या कारण रंग खेळताना तो सर्वात आधी डोळ्यात जाण्याची अधिक शक्यता असते. डोळे हा अवयव नाजूक असल्याने त्याची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खेळताना डोळ्यांवर गॉगल लावू शकता. खेळताना चुकून डोळ्यात रंग गेल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरीत थंड पाण्याने डोळे स्वच्छ करा. अधिक त्रास होत असल्यास नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या.

रंगपंचमी जरी आनंदाचा आणि रंगाच्या उधळणीचा सण असला तरी या सणाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे कोणलाही त्रास होणार नाही याची काळजी घेत सुरक्षित होळी खेळा. पाण्याचा वापर कमी करा. कोरडी होळी खेळण्यास काहीच हरकत नाही. POPXO मराठीकडून सर्व वाचकांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

हेही वाचा –

होली की हार्दिक शुभकामनाएं और संदेश

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

Read More From Natural Care