बाप्पासाठी खास नेवैद्य असतो तो मोदकांचा. आता बाप्पांचा आवडता नेवैद्य म्हटल्यानंतर मोदक तर प्रत्येकाकडे आवर्जून गणपतीच्या दिवसात केले जातात किंवा बाहेरून आणले जातात. याच निमित्ताने खानदानी राजधानीचे कॉर्पोरेट शेफ महाराज जोधाराम चौधरी यांनीही मोदकाच्या काही वेगळ्या आणि खास रेसिपीज आपल्यासोबत शेअर केल्या आहेत.
पाहूया वेगळ्या मोदकांच्या घरी करण्यासाठी झटपट रेसिपीज –
- चॉकलेट मोदक
- केसर मावा मोदक
- मोतीचूर मोदक
- काजू मोदक
- कोकोनट मोदक
- ड्रायफ्रूट मोदक
- उकडीचे मोदक
चॉकलेट मोदक Chocolate Modak
सहसा गणपतीत आपण चॉकलेटचे मोदक हे बाहेरून आणतो किंवा बरेचदा दर्शनाला घरी येणारे पाहुणे बाप्पाला प्रसाद म्हणून ते घेऊन येतात. यंदा हेच मोदक तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी करा. घरातील बच्चेकंपनी नक्कीच खूष होईल.
साहित्य – 2 कप रिकोटा चीज, 1 कप कंडेस्ड मिल्क, 1/2 कप स्वीट चॉकलेट चिप्स, 1 चमचा कोको पावडर.
कृती – जाड बुडाचं भांडं मध्यम आचेवर तापवून घ्या. त्यात चीज घाला आणि ते शिजवा. रिकोटा चीज घट्ट होऊ लागल्यावर त्यात कंडेस्ड मिल्क घाला आणि काही मिनिटं शिजवा. गॅस बंद करा. आता त्यात कोको पावडर, चोको चिप्स घालून मिक्स करा. हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मोदकाच्या मोल्डमध्ये ते भरून मोदकाचा आकार द्या. तयार आहेत तुमचे चॉकलेट मोदक.
केशर मावा मोदक Kesar Mawa Modak
यंदा घरच्यांना मावा, वेलची आणि केशरयुक्त असे केशर मावा मोदक करून सरप्राईज द्या.
साहित्य – मावा 1 कप, साखर ½ कप, वेलची पूड, केशराच्या काड्या, दूध 2 चमचे.
कृती – मावा चांगला मळून घ्या. त्यातील गुठळ्या असतील तर ते सारखं करून घ्या. दूधामध्ये केशराच्या काड्या किमान 20 मिनिटं भिजवून ठेवा. एका ताटात तूप लावून ते ताट तयार ठेवा. आता मावा, साखर, केशरयुक्त दूध एका नॉन स्टिक पॅनमध्ये घेऊन चांगलं मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. मिश्रण चांगल घट्ट होईपर्यंत शिजवा. लक्षात घ्या हे मिश्रण जास्त कडक किंवा सुकता कामा नये. मग ते गॅसवरून काढून त्यात वेलची पूड घाला. मग तूप लावून ठेवलेल्या ताटात हे मिश्रण काढा. थंड झाल्यावर याचे गोळे मोदकाच्या साच्यात घालून मोदकाचा आकार द्या. तयार आहेत तुमचे केशर मावा मोदक.
मोतीचूर मोदक MOTICHUR MODAK
साहित्य – बेसन एक वाटी, साखर 1.5 वाटी, पाणी 1.5 वाटी, तेल एक चमचा, वेलची पूड 1/2 चमचा, पिस्त्याचे तुकडे 1 चमचा आणि केशराच्या काड्या, तळण्यासाठी तूप किंवा तेल.
कृती – बेसन एका मोठ्या वाडग्यात घेऊन त्यात अर्ध वाटी पाणी घाला. त्याचं पातळ मिश्रण करून घ्या पण यात गुठळ्या राहता कामा नये. त्यात एक चमचा तेल घाला आणि चांगलं फेटून घ्या. जोपर्यंत त्याला थोडा फेस येत नाही. एका पॅनमध्ये तूप घालून ते मध्यम आचेवर ठेवा. आता यावर झारा धरून बेसनाची बुंदी पाडून घ्या. ही बुंदी किमान 5 मिनिटं तळा. मग टिश्यू पेपरवर काढून निथळून घ्या. म्हणजे त्यातील एक्सट्रा तूप किंवा तेल शोषलं जाईल. आता दुसऱ्या पॅनमध्ये साखरेचा पाक बनवून घ्या. एक तारी पाक तयार झाल्यावर त्यात वेलची पूड आणि पिस्त्याचे तुकडे घाला. या पाकात बुंदी घालून चांगलं मिक्स करा आणि 15 मिनिटं तसंच ठेवा. आता हे बुंदी मिक्स्चर साच्यात घालून मोदकाचा आकार द्या. जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर हातानेच मोदकाचा आकार द्या.
काजू मोदक KAJU MODAK
साहित्य – 2 कप मावा, 1 कप काजू पावडर, 1/2 कप पिठीसाखर, वेलची पूड आणि खाण्याचा पिवळा रंग.
कृती – मावा घेऊन त्यात पिठीसाखर आणि काजू पावडर एका जाड बुडाच्या पॅनमध्ये घालून मिक्स करा. हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवा आणि चांगलं मिक्स होऊ द्या. मग शेवटी त्यात खाण्याचा पिवळा रंग घाला. हे मिश्रण वितळू लागल्यावर त्यात वेलची पूड घाला. 5-6 मिनिटं शिजवून एका प्लेटमध्ये काढा आणि ते थंड होऊ द्या. माव्यात गुठळ्या नाहीत ना ते पाहून घ्या आणि मोदकाच्या साच्यात घालून मोदक तयार करा. आता सर्व्ह करा तुमचे काजू मोदक.
कोकोनट मोदक Coconut Modak
साहित्य – 1 कप ताजा खोवलेला नारळ, 200 ग्रॅम मावा किंवा मिल्क पावडर, 1 कप साखर, वेलची पूड आणि दोन चमचे तेल.
कृती – मिक्सरच्या भांड्यात वेलची पूड किंवा अख्खी वेलची आणि साखर वाटून घ्या. एका भांड्यात मध्यम आचेवर तूप तापत ठेवा आणि मग ते तापल्यावर त्यात नारळ घाला. नारळातील पाणी आटेपर्यंत ते परतून घ्या. नारळात पाणी राहिल्यास त्याचे मोदक होणार नाहीत. नंतर त्यात मावा आणि पिठीसाखर घालून त्याचं सारण तयार करा. यात पाणी किंवा दूध अजिबात घालू नका. हे मिश्रण चांगलं झाल्यावर त्याला तूप सुटेल. मग ते सारण एका बाऊलमध्ये काढून घ्या. ते पूर्णतः थंड होण्याआधीच त्याला मोदकाचा आकार द्या.
ड्रायफ्रूट मोदक Dry Fruit Modak
साहित्य – 15 खजूर बिया काढलेले, 10 सुके अंजीर, ¼ कप मनुका, ¼ कप बदाम, ¼ कप पिस्ते, ¼ सोललेले अक्रोड, ¼ कप डेसीकेटेड नारळ, 4 वेलचीची केलेली पूड, एक चमचा तूप
कृती – खजूर, अंजीर आणि मनुका चांगलं बारीक चिरून घ्या. बदाम, अक्रोड आणि पिस्त्याचेही तुकडे करा. एका पॅनमध्ये डेसिकेटेड नारळ घेऊन तो खरपूस भाजून घ्या. नंतर एका वाडग्यात काढून ठेवा. चिरलेला सुका मेवासुद्धा पॅनमध्ये तूपावर थोडा परतून घ्या. थंड होऊ द्या. आता त्यात खोबरं मिक्स करा. हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. मग त्याचे लिंबाएवढे गोळे करून मोदक साच्यात भरून मोदक तयार करा.
उकडीचे मोदक Ukdiche Modak
गणपती म्हटल्यावर सगळ्यांकडेच पारंपारिक उकडीचे मोदक आवर्जून केले जातात. दरवर्षी हे मोदक करताना गृहिणींना काहीतरी नवीन शोध लागतोच. तर आपल्यापैकी ज्यांना याची रेसिपी माहित नसल्यास ही रेसिपी नक्की पाहा.
साहित्य : तांदूळाची पिठी 1 1/2 कप, चिमूटभर मीठ, एक चमचा तेल.
सारणासाठी – ताजा खोवलेला नारळ 1 1/2 कप, किसलेला गूळ 1 कप, भाजलेली खसखस 1 चमचा, चिमूटभर वेलची पूड, चिमूटभर नटमेग पावडर
कृती Method
एका नॉन स्टिक पॅनमध्ये सर्वात आधी पाणी गरम करून त्यात मीठ आणि तेल घाला. पाण्याला उकळी आल्यावर गॅस कमी करा आणि त्यात तांदूळाची पिठी घालून ढवळत राहा. गुठळ्या होऊ देऊ नका. पॅनवर झाकण ठेवून त्यावर पाणी घाला. मग किमान 3 मिनिटं कमी आचेवर ही पीठ शिजू द्या. नंतर झाकण काढून त्या तांदळाच्या पीठावर थोडं थंड पाणी शिंपडून पुन्हा झाकून ठेवा. पुन्हा उकळी आल्यावर त्यात पीठ मिक्स करा आणि ढवळत राहा. फक्त काळजी घ्या की, हे करत असताना पारीच्या पीठात गुठळ्या होऊ नयेत. मग दोन मिनिटाने पॅन खालील गॅस बंद करा आणि ती उकड दोन तीन मिनिटं झाकून ठेवा. आता हे पॅनमधील तांदळांचं पीठ किंवा उकड एका परातीत काढून घ्या. तुमच्या हाताला थोडंसं तेल लावून ते चांगलं मळून घ्या. लक्षात घ्या हे पीठ तुमच्या हाताला चिकटता कामा नये. इतकं ते चांगल मळा. मग काही वेळ हे पीठ ओलसर कापडाने झाकून ठेवा.
सारणासाठी नारळ आणि गूळ नॉनस्टिक पॅनमध्ये एकत्र करून शिजवा. ते मध्यम आचेवर थोड लालसर झाल्यावर गॅस बंद करा. लक्षात घ्या हे सारण जास्त शिजता कामा नये. त्यानंतर या सारणात खसखस, वेलची पूड आणि नटमेग पावडर घाला.
तांदळाच्या उकडीला काही भागांमध्ये विभागून त्याचे गोळे करून घ्या. हाताला तेल किंवा तूप लावून त्याच्या वाडग्यासारख्या आकार करा पण लक्षात घ्या हे करताना ती उकड फुटता कामा नये. मग त्यात स्टफिंग भरा आणि मोदकासारखं आकार देत गोलाकार वळून ते बंद करा.
आता हे मोदक मोदकपात्रात उकडायला ठेवा. किमान 10 ते 12 मिनिटं ते उकडायला ठेेवा. उकडून झाल्यावर त्यावर तूपाची धार घालून गरमागरम उकडीचे मोदक सर्व्ह करा.
गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवून भक्तीभावाने बाप्पाची पूजा केली जाते. पण बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी मन नक्की खट्टू होतं. अशावेळी शेअर करण्यासाठी गणपती विसर्जन स्टेटस नक्की पाहा.