DIY सौंदर्य

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा | Tips For Summer Makeup In Marathi

Vaidehi Raje  |  Apr 7, 2022
Tips For Summer Makeup In Marathi

आता उन्हाळा सुरु झाला आहे आणि सूर्य चांगलाच तापतोय. उन्हाळा म्हटलं की भयंकर उकाडा आणि या उकाड्याने लगेच घाम येतो. ज्या क्षणी आपण मेकअप करतो, तेव्हा जर आपण काही मिनिटेही विना पंख्याचे किंवा एसीचे राहिलो की घामाघूम होतो आणि आपली मेकअपची सगळी मेहेनत व वेळ वाया जातो. उन्हाळ्यातील मेकअपच्या काही प्रमुख समस्या म्हणजे केकी फाउंडेशन, अस्ताव्यस्त पसरलेला मस्करा, चिकट झालेले लिपस्टिक, चिकट तेलकट झालेले कपाळ आणि इतर अनेक समस्या येतात. खराब झालेला मेकअप आणि घामाने भिजलेले चेहरा हा उन्हाळ्याचा एक नकोसा भाग आहे. अर्थात यावर उन्हाळ्यात मेकअप न करणे हे उत्तर नाही. कुठेही प्रेझेंटेबल दिसायचं म्हटलं की मेकअप करण्यावाचून पर्याय नाही. अशा वेळी उन्हाळ्यात मेकअप कसा करावा हा प्रश्न पडतो. यावर उत्तर आहे की उन्हाळ्यात आपल्याला स्वेट-प्रूफ मेकअप करण्याची गरज असते. म्हणजे आर्द्रता कितीही वाढली तरीही आपला चेहरा नैसर्गिकरित्या, ताजातवाना आणि सुंदर दिसू शकेल. 

उन्हाळ्यात मेकअप करताना फॉलो करा या टिप्स – Summer Makeup Step By Step In Marathi

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा

उन्हाळ्यात आर्द्रता आणि गरम हवामानात आपला मेकअप एक तासापेक्षा जास्त काळ टिकून राहणे कठीण असते. हल्ली तर आपण फेस मास्क लावतो त्यामुळे मेकअप केल्यावर घाम येण्याची शक्यता आणखीनच वाढलेली आहे. या दोन्हीचे संयोजन करणे फारच कठीण आहे आणि त्यामुळे अनेकांनी मेकअप करणे पूर्णपणे बंदच केले आहे. आपण हवामानावर नियंत्रण ठेवू शकत नसलो तरी तुम्ही थोडे सावध राहून उन्हाळा आणि आर्द्रतेवर मात करू शकतो. उन्हाळ्यात मेकअप कसा करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या मेकअप टिप्स फॉलो करा आणि उन्हाळ्यातही छान ताजा तवाना लूक मिळवा. 

क्लिंजिंग 

मेकअप करताना चेहरा स्वच्छ करणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. उन्हाळ्यात आपला चेहेरा तसाही चिकट व तेलकट होतो त्यामुळे उन्हाळ्यात ऑइल फ्री फेस वॉश वापरला तर त्वचा टवटवीत आणि फ्रेश होते. याशिवाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चिकट ,घामट व तेलकट होण्याऱ्या त्वचेसाठी आपण घरगुती उपाय करु शकतो. तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती, बेसन, कडुलिंब, मसूर डाळीचे पीठ यांसारखे घरगुती पदार्थ वापरून आपण फेसपॅक बनवू शकतो. मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा ओला करा. नंतर बोटांवर फेसवॉश घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा व गोलाकार मसाज करा. काही सेकंद थांबा आणि मग चेहेरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

बर्फ लावणे 

उन्हाळ्यात मेकअप करताना बर्फ वापरण्याचा पर्यायही सोपा आणि प्रभावी ठरू शकतो. चेहेऱ्याला मेकअपच्या आधी बर्फ लावल्याने केवळ घामाची समस्या कमी होत नाही तर त्वचेला थंडपणा आणि आरामही मिळतो. चेहरा धुतल्यानंतर किंवा मेकअप करण्याच्या काही मिनिटे आधी तुम्ही चेहेऱ्यावर बर्फाचा खडा फिरवू शकता. असे केल्याने घाम येणे कमी होईल आणि मेकअपही बराच वेळ टिकून राहील.

वाचा – घरगुती सोप्या ब्युटी टिप्स मराठी

टोनिंग 

टोनिंग हा स्किन केअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. टोनरमुळे त्वचेतील अशुद्धता निघून जाते आणि मुरुमांच्या समस्या देखील कमी होतात. तसेच त्वचेचे पोअर्स सुद्धा लहान होतात. स्वतःसाठी टोनरची निवड करताना आपली त्वचा कोरडी आहे की तेलकट किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे की सेन्सिटिव्ह हे बघून त्याप्रमाणे टोनरची निवड करा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पेरूचा अर्क असलेले टोनर उपयुक्त ठरू शकतो, कारण त्यात अँटी-सेबम गुणधर्म असतात. तसेच सॅलिसिलिक ऍसिड असलेले टोनर देखील उपयुक्त ठरतात. तर कोरड्या त्वचेसाठी कोरफडअसलेले टोनर वापरले जाऊ शकते. कोरफड चेहेऱ्याला  मॉइश्चराइझ करते व त्वचेला हायड्रेट करते. ज्यांना ऍक्ने किंवा पिम्पल्सची समस्या आहे त्यांनी अल्फा-हायड्रॉक्सी ऍसिड असलेल्या टोनरची निवड करावी. ऍक्ने असलेल्या त्वचेसाठी विच हेझेल असलेले टोनर देखील फायदेशीर ठरू शकते.तुम्हाला जर घरगुती टोनर बनवायचे असेल तर तुम्ही काकडीचा रस, कोरफडीचा गर व  गुलाबपाणी घालून तुम्ही घरच्या घरी टोनर बनवू शकता. नुसतेच गुलाबपाणीही टोनर म्हणून वापरता येऊ शकते. 

गुलाब पाण्यामुळे त्वचा तेलकट होण्यास प्रतिबंध होतो आणि त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे उन्हाळ्यात तर तुम्ही गुलाबपाण्याचा टोनर म्हणून नक्कीच वापर करू शकता. मेकअपच्या वेळेला आधी त्वचा फेस वॉश किंवा क्लिन्जरने स्वच्छ करून मग कापसाच्या बोळ्याने चेहेऱ्यावर व मानेवर टोनर लावून घ्या. पुढील मेकअप करण्याआधी टोनर त्वचेमध्ये शोषले जाईपर्यंत थांबा. 

सनस्क्रीन लावणे 

तुम्ही घरात असा किंवा बाहेर, प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येकानेच सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. सनस्क्रीन आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करते. सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेवर बारीक रेषा, अकाली सुरकुत्या, डाग/फ्रिकल्स, सनटॅन आणि सनबर्न होऊ शकतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात घराबाहेर जायचे असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे.

आपल्यासाठी सनस्क्रीन लोशन निवडताना आपली त्वचा कोणत्या प्रकारात मोडते हे लक्षात घेऊनच सनस्क्रीनची निवड करा.  जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल आधारित किंवा वॉटर बेस्ड लोशन घ्या. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर आधारित सनस्क्रीन लोशनची निवड करा. मेकअप करताना चेहेरा स्वच्छ करून घेतल्यावर मग बोटाने चेहरा आणि मानेवर सनस्क्रीन लावा व हाताने त्वचेवर मसाज करत सनस्क्रीन त्वचेत मुरवा. यासाठी  तुम्ही मेकअप ब्लेंडचाही वापर करू शकता. 

योग्य प्राइमर वापरा

तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग केल्यानंतर लगेच चेहेऱ्यावर चांगला प्राइमर लावा. प्राइमरमुळे मेकअप जास्त काळ टिकून राहतो व चेहऱ्याच्या मेकअपसाठी एक बेस तयार करतो. मॅटिफायिंग प्राइमर वापरणे हा तेल-मुक्त आणि उष्णतारोधक मेकअप करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे कारण प्राइमर त्वचेवरील दोष लपवतो व चेहेऱ्यावर अतिरिक्त चमक आणण्यास मदत करतो. 

लाइट बेस लावा

उन्हाळ्यात जितका कमी मेकअप, जितक्या कमी लेअर्स तितकी तो खराब होण्याची भीती कमी असते. उन्हाळ्यात घामामुळे मेकअप लगेच खराब होऊ शकतो अशावेळी स्वेट-प्रूफ मेकअपचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा बेस मेकअप मर्यादित ठेवणे, जेव्हा चेहेऱ्यावर घाम येतो तेव्हा तुमचे बेस लेयर केकी दिसू शकतात. तसेच जाड बेसमुळे त्वचेची रंध्रे बंद होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्यात शक्यतोवर फाउंडेशन लावू नये आणि नैसर्गिक फिनिशसाठी थेट कन्सीलर लावावे. शक्य असल्यास, फक्त बीबी क्रीम आणि कन्सीलरची कागदाइतकी पातळ लियर लावा. जर तुम्हाला फाउंडेशन लावायचेच असेल तर मॅट टेक्सचर आणि फिनिश असलेल्या फाउंडेशनची निवड करा. बेस लावल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरने तो लॉक करा. कॉम्पॅक्ट पावडर तुमच्या चेहऱ्यावर तेल, चमक आणि सीबम नियंत्रित करण्यास मदत करेल.

पावडर ब्लश वापरू नका 

ब्लश कोणत्याही लूकमध्ये संतुलन  आणते आणि त्वचा निरोगी व टवटवीत दिसण्यात मदत करते. परंतु पावडर ब्लश वापरल्याने तुमचा चेहरा गुळगुळीत होऊ शकतो. तुमचा स्वेट -प्रूफ मेकअप आणखी चांगला होण्यासाठी तुम्ही जेल किंवा ब्लश टिंट वापरा आणि नंतर गाल गुलाबी दिसण्यासाठी क्रीमी लिपस्टिकचा वापर करा. 

हायलाइटर लावण्यास विसरू नका 

उन्हाळ्यात प्रत्येकाला चांगला, नैसर्गिक ग्लो आवडतो परंतु बरेच स्वेट-प्रूफ मेकअप उत्पादने ही मॅट स्वरूपात असल्याने मेकअप थोडा डल वाटू शकतो. अशावेळी हायलाइटर तुमचा स्वेट-प्रूफ मेकअप चमकवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.तुमचा रंग उजळ करण्यासाठी आणि चेहेऱ्यावर ग्लो आणण्यासाठी नाक, हनुवटी, कपाळावर हायलायटर नक्की लावा. 

आयशॅडोसाठी शिअर आणि पेस्टल शेड्सचा वापर करा 

रिच आणि डीप आयशॅडो सुंदरच दिसतात. परंतु उन्हाळ्यात मात्र या शेड्स जड वाटू शकतात. तुमचा समर प्रूफ मेकअप लुक लाईट ठेवण्यासाठी शिअर, पेस्टल शेड्सची निवड करा. हलक्या शेड्स उन्हाळ्याच्या वातावरणाशी जुळतात आणि घाम आला तरीही छान दिसतात. 

वॉटरप्रूफ मस्कारा निवडा

उन्हाळ्यात डोळ्यांचा मेकअप टिकून राहावा म्हणून घाम येण्यापासून संरक्षण करण्यासाठी लॉन्ग वेअर फॉर्म्युले असतात. उन्हाळ्यात मस्कारा पसरू नये म्हणून तुमच्या पापण्यांसाठी वॉटरप्रूफ मस्काराची निवड करा. 

मॅट लिपस्टिकची निवड करा 

तुमच्या ओठांच्या नाजूक त्वचेला सूर्याच्या उष्णतेचा आणि अतिनील किरणांचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे ओठांचा मेकअप करण्याआधी ओठांना पौष्टिक लिप बाम लावा. व त्यानंतर उत्तम कव्हरेज देणारे,  दीर्घकाळ टिकणारे, जलरोधक लिक्विड मॅट लिपस्टिक लावा. अशाप्रकारे स्वतःसाठी एक परफेक्ट लिपस्टिक शेड निवडा.

मेकअपच्या शेवटी सेटिंग स्प्रे वापरा 

तुमचा मेकअप किती काळ टिकेल हे मेकअपच्या उत्पादनांवर नाही तर तुम्ही कश्या पद्धतीने मेकअप करता यावर अवलंबून आहे. म्हणूनच मेकअप झाल्यावर सेटिंग स्प्रे मारणे आवश्यक आहे. सेटिंग स्प्रे तुम्ही वापरलेल्या सर्व हीटप्रूफ मेकअप उत्पादनांना सील करण्यात मदत करेल आणि तुमचा मेकअप तुम्ही मेकअप रिमूव्हरने काढेपर्यंत टिकून राहील.  खरं तर उन्हाळ्यात भारंभार मेकअप कशाला हवाय, या वातावरणात तुम्ही ‘न्यूड’ मेकअपनेही सुंदर दिसाल.

उन्हाळ्यात आय मेकअपसाठी टिप्स – Eye Makeup In Summer In Marathi

डोळ्यांचा मेकअप जर उत्तम झाला असेल तर त्याने कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य अधिक वाढते. पण आयमेकअप जर चांगला नसेल तर त्यामुळे संपूर्ण चेहेऱ्याचाच लूक बिघडतो. त्यात तर उन्हाळ्यात आयमेकअप टिकणे फार कठीण असते. काजळ, आयलायनर, मस्कारा किंवा इतर कोणताही मेकअप जास्त काळ टिकू शकत नाही. अशावेळी वॉटरप्रूफ आणि स्मजप्रूफ उत्पादने वापरणे शहाणपणाचे ठरते जेणे करून घामामुळे काजळ, आयलायनर पसरणार नाही. तुमचे डोळे अधिक चांगले डिफाइन करण्यासाठी आणि डोळ्यांच्या मेकअपमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून उन्हाळ्यात कोहल वापरा. ते जास्त काळ टिकून राहील. 

उन्हाळ्यात डोळ्यांचा मेकअप करताना मिनिमम लूक ठेवणे चांगले. भुवया डार्क करा आणि पापण्यांवर एकच मेटॅलिक आयशॅडो लावा. यामुळे तुमचा लूक बॅलन्स होईल. 

उन्हाळात असा करा लिप मेकअप – Lip Makeup In Summer

तुम्हाला उन्हाळ्यात मेकअप करताना मिनिमम पण फ्रेश लूक हवा असेल तर लीप टिंट तुम्हाला हा लूक देण्यात मदत करेल.लीप टिंट तुमच्या ओठांना नैसर्गिक रंग देईल. तुमच्याकडे जर लीप टिंट नसेल तर तुम्ही ते घरच्या घरीही बनवू शकता. ओठांचा मेकअप करताना मिक्सिंग प्लेटवर फक्त थोडासा लिप बाम घ्या. त्यात थोडासा पावडर ब्लश घाला आणि दोन्ही चांगले मिसळा. हे तुम्हाला एक सुंदर रंग देईल! जर तुमच्याकडे ब्लश नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुमचे लिप लाइनर किंवा क्रीमी लिपस्टिक देखील वापरू शकता. ते चांगले मिसळून आपल्या ओठांवर थोडेसे लावा. उन्हाळ्यात त्वचेप्रमाणेच ओठांना देखील संरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे 15 किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेले लिपग्लॉस किंवा लिप बाम लावणे चांगले. यामुळे तुमचे ओठ हायड्रेटेड तसेच सुरक्षित राहतील.

उन्हाळ्यात तुमच्या ओठांना उष्णतेपासून ते थंड आईस्क्रीमपर्यंत अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा वेळी जर तुम्हाला तुमचा ओठांचा मेकअप जास्त काळ टिकवायचा असेल तर या टिप्स वापरून बघा. 

उन्हाळ्याच्या दिवसात मेकअप जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी टिप्स – How To Keep Your Makeup Long Lasting

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा

उष्ण हवामान असले की काहीही उपाय केले तरी घाम येणारच. अशावेळी जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवणं फारच अवघड असतं. तुम्ही खालील टिप्स वापरून तुमचा मेकअप देखील दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता आणि कोणतीही चिंता न करता तुमची पार्टी, ऑफिस, पिकनिकचा आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी काही टिप्स.

अधिक वाचा – मेकअप करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

समरसाठी खास स्किन केयर टिप्स

उन्हाळ्यात आपली त्वचा अतिरिक्त तेलकट, चिकट, निर्जीव होते. तसेच उष्णतेमुळे त्वचेचा दाह देखील होतो. अशावेळी प्रत्येकाची इच्छा असते की आपली त्वचा सुंदर, निरोगी व टवटवीत दिसावी. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. तर या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या काही टिप्स वाचा व त्या ट्राय करून बघा. 

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमचीही त्वचा उन्हाळ्यात सुद्धा छान राहील.

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा याबद्दल सामान्यपणे पडणारे प्रश्न – FAQs

प्र. उन्हाळ्यात मेकअप करणे योग्य आहे का?

उ.प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपल्याला मेकअपचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेऊन आपण उन्हाळ्यातही मेकअप करू शकतो. फक्त जड किंवा जास्त ब्राईट मेकअप करू नये कारण यामुळे त्वचा ठिसूळ दिसू शकते. उन्हाळ्यात हलका मेकअप करावा. 

प्र. उन्हाळ्यात मेकअप कसा करावा?

.उन्हाळ्यात मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जसे की वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड उत्पादने वापरणे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणे, फक्त मॅट लिपस्टिक वापरणे, जास्त शिमरी आणि ग्लिटरी लूक न निवडणे या गोष्टी लक्षात घेऊन वर दिल्याप्रमाणे तुम्ही उन्हाळ्यातही फ्रेश लूक येईल असा मेकअप करू शकता. 

प्र. उन्हाळ्यात फाउंडेशनची शेड कशी निवडावी?

.खरं तर उन्हाळ्यात फाउंडेशन लावणे टाळावे. त्याऐवजी BB क्रीम किंवा कन्सीलर लावावे. पण जर तुम्हाला फाउंडेशन लावायचेच असेल तर आपल्या त्वचेच्या शेड पेक्षा थोडी लाईट शेड निवडा. 

प्र. उन्हाळ्यात पावडर फाउंडेशन लावावे की  लिक्विड फाउंडेशन?

.उन्हाळ्यात मेकअप करताना पावडर फाउंडेशन वापरणेच शहाणपणाचे आहे. कारण पावडर फाउंडेशन तुमच्या त्वचा तेलकट होण्यापासून रोखू शकते.  तसेच ते  त्वचेला चिकटून राहते त्यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो. 

प्र. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी कसा मेकअप करावा?

.बाहेर उन्हात जायचे असेल तर शक्यतो हलका मेकअप करा आणि बाहेर निघण्याच्या 10-15 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. बाहेर उन्हात गेल्यावर घाम येणारच. त्यामुळे क्रीम बेस्ड उत्पादने वापरू नका. तसेच उन्हात दर काही तासांनी तुमच्या चेहऱ्यावर फेस मिस्ट स्प्रे करा, जेणेकरून तुमचा चेहरा ताजा व टवटवीत दिसेल.

उन्हाळ्यात मेकअप करणे व तो टिकवून ठेवणे अत्यंत जिकिरीचे काम असते. म्हणूनच उन्हाळ्यात कमीत कमी उत्पादने वापरून शक्यतोवर हलका मेकअप करावा. मेकअप करताना सनस्क्रीन वापरायला विसरू नये व क्रीम बेस्ड उत्पादनांऐवजी वॉटर बेस्ड उत्पादने वापरावीत. तसेच उन्हाळ्यात त्वचा निस्तेज व निर्जीव होते, त्यामुळे त्वचेचीही योग्य काळजी घ्यावी जेणे करून तुमचे सौंदर्य अबाधित राहील. 

अधिक वाचा –

Quick Makeup Tips In Marathi – 5 मिनिट्समध्ये सोप्या पद्धतीने करा झटपट मेकअप

Read More From DIY सौंदर्य