Recipes

या उन्हाळ्यात साठवणीचे हे हटके पदार्थ करुन पाहा

Leenal Gawade  |  Apr 26, 2019
या उन्हाळ्यात साठवणीचे हे हटके पदार्थ करुन पाहा

पूर्वी उन्हाळा आला की, साठवणीचे पदार्थ करण्याची घरी लगबग असायची. पापड, सांडगी, मसाले, लोणची  असे पदार्थ आपण करतो. पण आता फार कोणी वाळवणीचे पदार्थ घरी करायला पाहात नाही. कारण ते बाहेर रेडिमेड मिळतात. पण आम्हाला अशा काही सोप्या रेसिपीज मिळाल्या ज्या कदाचित तुम्ही वाळवणीचे पदार्थ म्हणून करुन पाहिल्या नसतील. सध्या इंटरनेटवर या रेसिपीजनी धुमाकूळ घातला आहे. म्हणूनच या रेसिपी आम्हाला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या. मग पाहायच्या का नेमक्या काय रेसिपी आहेत त्या.

उन्हाळ्यात रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर करुन पाहा या रेसिपी

 कोबी आणि डाळीचे पौष्टिक वडे

ही रेसिपी अगदीच युनिक आहे. शुभांगी कीर या मराठी फुड ब्लॉगरने ती शेअर केली आहे. ती आम्हाला वेगळी वाटली म्हणून आम्ही ती तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

साहित्य- 1 ते 2 वाटी हिरव्या मुगाची डाळ,(सालवाली), साधारण अर्धा किलो कोबी, 1 चमचा लसूण, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, हिंग

कृती- आदल्या रात्री तुम्हाला डाळ धुवून रात्रभऱ भिजत ठेवा. सकाळी पाणी न घालता डाळ वाटून घ्या.  कोबी बारीक किसून घ्या.

एका परातीत तुम्ही वाटलेली डाळ घ्या. डाळ हाताने चांगली फेटून घ्या. फेटल्यामुळे डाळ हलकी होते. साधारण 2 ते 3 मिनिटे तुम्हाला चांगले फेटून घ्यायचे आहेत.

डाळ हलकी झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ठेचलेला लसूण, लाल तिखट, जिरे, हिंग, मीठ घाला. त्यात किसलेला कोबी घाला. मिश्रण एकजीव करुन घ्या.

तयार पीठाच्या वड्या प्लास्टिकवर पाडून घ्या. वड्या चांगल्या कुरकुरीत वाळवून घ्या.

तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की याची भाजी करु शकता. ही भाजी करणेही अगदी सोपे असते.

उपवासाचे सांडगे

उपवासाचे सांडगेदेखील चवीला तितकेच चांगलेच लागतात.जर तुम्हाला उपवासाला काही वेगळे खायची इच्छा असेल तर तुम्ही अशापद्धतीने सांडगे बनवू शकता. वाचा उपवासाच्या सांडग्यांची रेसिपी

साहित्य- 1 ते 2 वाटी साबुदाणा, 1 मोठा उकडलेला बटाटा, 1 ते 2 कच्चे बटाटे, मीठ, जीर. हिरव्या मिरचीची पेस्ट, पाणी

कृती- प्रथम साबुदाणा रात्रभर भिजत घाला. तुम्ही ज्या पद्धतीने खिचडी करता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला साबुदाणा भिजवायचा आहे.

दुसऱ्यादिवशी एका परातीत भिजलेला साबुदाणा घेऊन त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन घालावा. साबुदाणा बांधता येईल इतकेच त्याचे प्रमाण हवे. जास्त उकडलेला बटाटा घालू नये कारण तो फारसा फुलत नाही.

त्यात मीठ, जीर (उपवासाला चालत असल्यास ), हिरव्या मिरचीची पेस्ट घाला.

तर दुसरीकडे कच्चा बटाटा सोलून तो जाडसर किसून घ्या. वाळवणीच्या किसाप्रमाणे गरम पाण्यात मीठ घालवून तो वाफवून घ्या. पाण्यातून निथळून तो साबुदाण्याच्या मिश्रणात घाला.

मिश्रण एकजीव करा. घट्ट मळण्याची काहीच आवश्यकता नाही. तयार  मिश्रणाचे सांडगे पाडून घ्या.

2 ते 3 दिवस उन्हात वाळवत ठेवा. उपवासाला मस्त तळून कुरकुरीत उपवासाचे सांडगे खा.

(टीप- तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तेव्हा उकडलेला बटाटा किती घालायचा त्याचा अंदाज घ्या. तुम्ही कच्चा बटाटा त्यात जास्त घातला तर चालू शकेल. कारण तो वाळल्यानंतर चांगला क्रिस्पी लागतो.)

उन्हाळ्यात ही 5 फळे ठेवतील तुम्हाला हायड्रेट

बटाट्याचे वेफर्स

फार पूर्वी तुम्ही घरी बनवलेले बटाट्याचे वेफर्स खाल्ले असतील. हल्ली फार कमी ठिकाणी असे वेफर्स  खायला मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या सोप्या वेफर्सची रेसिपी शेअर करणार आहोत. हे वेफर्स तुमच्या रेडीमेड वेफर्ससारखे लागणार नाहीत. पण विश्वास ठेवा  हे अधिक चविष्ट असतात.

साहित्य-  पातळ सालीचे  बटाटे घ्या (मार्च, एप्रिल दरम्यान अशा प्रकारचे बटाटे बाजारात जास्त मिळतात),

कृती- बटाट्यांची साल काढून घ्या. पीलरच्या मदतीने सालं काढल्यास उत्तम. सालं काढलेले बटाटे तुम्ही लगेचच पाण्यात घाला. नाहीतर बटाटे काळे पडतात.

तुम्हाला आवडत असलेल्या डिझाईनमध्ये बटाट्याचे चीप्स काढून घ्या. तयार चीप्स तुम्हाला पाण्यातच ठेवायचे आहे.

बटाट्यामध्ये स्टार्ज असतो त्यामुळे तुम्हाला दोन ते तीन पाण्यातून बटाटे काढायचे आहेत.

एका भांडयात पाणी घेऊन तुम्हाला त्यात तुरटी फिरवायची आहे. त्यात बटाटयाचे काप तुम्हाला रात्रभर ठेवायचे आहे.

पाण्यातून काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ते धुवून घ्यायचे आहेत. तुम्हाला एक भांडे पाणी गरम करायला ठेवायचे त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचे चीप्स शिजायला ठेवायचे आहे. एक उकळी येईपर्यंत ते चांगले शिजवायचे आहेत. तुम्हाला चीप्स पारदर्शक झालेले दिसतील.

आता चीप्स तयार झाले हे तुम्हाला कळत नसेल तर  चिप्स हातात घेऊन थोडे वाकवून पाहा. जर ते तुटले नाही म्हणजे ते तयार आहेत. जर तुटले तर ते जास्त शिजले आहेत. या रेसिपीसाठी जास्त शिजलेले चीप्स आपल्याला नको

स्ट्रेनरमधून पाणी काढून एका स्वच्छ चादरीवर चीप्स चांगले वाळवून घ्यायचे आहेत.वाळल्यानंतर तुम्ही हे चीप्स कधीही तळून खाऊ शकता.

 रव्याची कुरडई

कुरडया खायला अनेकांना खूप आवडतात. पण ते करायची कडकड सगळ्यांना नको असेत. गहू भिजत ठेवा. त्याचे पाणी बदला. आणि त्याचा चीक काढा सगळेच कठीण होते. पण गव्हाच्या कुरडईपेक्षा रव्याच्या कुरडईला थोडा कमी वेळ लागतो. आणि ती करायलाही तशी सोपी आहे.

साहित्य- अर्धा किलो रवा (कोणताही), पाणी, मीठ, कुरडईचा साचा, पापड खार

कृती- अर्धा किलो रवा एका भांड्यात घेऊन तुम्हाला कणकेप्रमाणे  रवा मळून घ्यायचा आहे. हा गोळा साधारण 10 तास तसाच तिंबून ठेवायचा आहे.

साधारण 8 ते 10 तासानंतर तुम्हाला चीक काढायचा आहे. चीक काढण्यासाठी तयार गोळा पाणी घालून फोडून घ्या. एक दुसरे भांडे घेऊन तुम्हाला त्यातून चीक काढायचा आहे. चीक काढणे म्हणजे तुम्हाला पातळ जाळी घेऊन त्यातून पाणी काढायचे आहे. तुम्ही ज्यावेळी चीक काढाल त्यावेळी तुम्हाला उरलेल्या रव्याचा गोळा अगदीच रबरासारखा वाटेल. जो पर्यंत त्यातून पांढरे पाणी येत आहे तो पर्यंत त्यात चीक आहे असे समजावे.

पाणी स्वच्छ निघाले की, आता त्यातून चीक निघणार नाही,असे समजावे.

 काढलेला चीक रात्रभर तसाच ठेवून द्यावा.सकाळी अलगद उघडून वर आलेले पाणी काढून टाकावे. त्याच्या तळाशी चीक आलेला असतो. तो तुम्हाला कुरडईसाठी वापरायचा आहे. चीक निघून जाईल इतकेही पाणी काढू नका.

आता तुम्हाला चीक मोजून घ्यायचा आहे. जितका चीक, तितकेच पाणी असे त्याचे प्रमाण असणार आहे. एका पातेल्यात पाणी गरम करुन त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापड खार टाकायचे आहे. पाण्यात चीक घालून ते सतत ढवळत राहा. त्याच्या गुठळ्या होता कामा नये. जर आवश्यक असेल तर पाणी घाला. तुमचा चीक तयार  तुम्हाला कुरडईच्या साच्यात घेऊन तुम्हाला कुरडई पाडून घ्यायच्या आहेत.

मायक्रोवेव्हमध्ये करा या 5 रेसिपी

*आहेत ना या रव्याच्या कुरड्या एकदम सोप्या

तांदळाच्या सालपापड्या

कुरकुरीत, खुसखुशीत असा पापडाचा प्रकार म्हणजे तांदळाच्या सालपापड्या…. लहानपणीच्या पापडाच्या अनेकांच्या आठवणी असतील. म्हणजे तुम्हीही कधी कोणाच्या घरी जाऊन उडदाचे पापड लाटले असतील. पण आज आपण थोडे वेगळा पापड पाहूया. याला तांदळाच्या सालपापड्या म्हणतात कारण ते सालीसारखे काढून मग वाळवले जातात.

साहित्य- 2 कप  तांदूळ ,जीरे, मीठ,पाव चमचा पापड खार

कृती – दोन दिवस तुम्हाला तांदुळ भिजत ठेवायचे आहेत. कुरडईप्रमाणे तुम्हाला त्याचे पाणी बदलायचे आहे.

दोन दिवसांनी तांदुळ धुवून तुम्हाला तांदुळ मिक्सरमधून काढायचे आहेत. त्यात कणी राहता कामा नये.

तयार तांदळाच्या वाटपात थोडे मीठ घालायचे आहे. साधारण डोशाच्या पिठासारखी याची कन्स्टन्सी हवी.

त्यात तुम्ही जीरे घाला.पाव चमचा पापड खार खालून मिश्रण एकजीव करा.

एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. आता सालपापड्या करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला हे बॅटर शिजवून पापड लाटायचे नाही.

तर तुम्हाला एका ताटाला तेल लावून त्यावर बॅटर तुम्हाला ते डोशासारखे सोडायचे आहे. पातळ करुन तुम्हाला ते ताट गरम पाण्यावर ठेवायचे आहे.

थोड्या कडा सुटायला लागल्यावर ताट उलट करुन आतल्या बाजूला पापड करुन ठेवायचा आहे. साधारण मिनिटभऱ ठेवून ते पाण्यातून काढून सुरीच्या साहाय्याने पापड काढायचा आहे. आणि वाळण्यासाठी ठेववून द्यायचा आहे.

तुम्ही इडलीपात्रातही पापड शिजवू शकता. चांगले होतात.

आंबोशी

आता आंबोशी तसा काही नवीन प्रकार नाही. पण गावात पेजेसोबत आंबोशी खाण्याची पद्धत आहे. शिवाय वरण भातासोबत भाजी नसेल तर आंबोशीमुळे चांगली चव मिळते.

साहित्य- छोट्या कैऱ्या, मीठ

कृती- कैऱ्यांचे पातळ काप करा. त्याला चांगले मीठ लावा. जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर फारच उत्तम तुम्ही त्याला खडे मीठ लावू शकता.

मीठ लावल्यामुळे कैऱ्यांना पाणी सुटते.

कैऱ्या तशाच तुम्ही उन्हात वाळवा.कडकडीत वाळल्यानंतर तुम्ही कैऱ्या कधीही खाऊ शकता. तुम्हाला कैरीचं लोणचं नको असेल तर तुम्ही आंबोशी खाऊ शकता.

टोमॅटो पावडर

टोमॅटोचे भाव कधी वाढतील ाणि कधी कमी होतील सांगता येत नाही. गेल्यावर्षी तर टोमॅटोने शंभरी पार केली होती. त्यामुळे अनेकांनी जेवणातून टोमॅटो काढून टाकला होता. त्यामुळे ज्यावेळी टोमॅटो स्वस्त असतात. त्यावेळी तुम्ही असे टोमॅटो सुकवून त्याची पावडर करु शकता.

साहित्य- 2 ते 3 किलो टोमॅटो

कृती- टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घ्या.

स्वच्छ टोमॅटोला चार चीर द्या. तुम्हाला चार तुकडे करायचे नाहीत. तर तुम्हाला चार पाकळ्या  दिसतील अशा स्वरुपात त्यांना कापायचे आहे. एका पातळ सुती कपड्यावर टोमॅटो पसरवून ठेवा.

कडक उन्हात वाळत ठेवा. दुसऱ्या दिवशी ते उलटे करुन वाळत घाला.

साधारण 8 दिवस हे टोमॅटो पूर्णत: वाळायला लागतात. त्यामुळे कंटाळा करु नका. आणि 8 दिवस टोमॅटो वाळवा.

कडकडीत वाळल्यानंतर तुम्ही कडक वाळलेले टोमॅटो मिक्सरमधून काढू शकता.

तयार पावडरचे टोमॅटो सूप तर उत्तम बनतेच. शिवाय ज्यांना भाजीत टोमॅटो दाताखाली आलेला आवडत नाही ते अगदी आरामात टोमॅटोची पावडर घालून भाज्या करुन शकतात.

 अशाच पद्धतीने तुम्ही आलं, कांदा, लसूण, कोथिंबीर वैाळवून त्यांच्या पावडर बनवू शकता आणि मस्त जेवणात वापरु शकता.

  *तर या काही रेसिपी आम्हाला थोड्या वेगळ्या वाटल्या म्हणून आज आम्ही तुम्हाला शेअर केला आहे. या तुम्ही नक्की करुन पाहा आणि तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी माहीत आहेत त्या आम्हाला कळवा.

 (सौजन्य- shutterstock, Instagram)

 

Read More From Recipes