चिंच… नुसत्या नावानेच तोंडाला पाणी सुटलं ना. चिंचेत अनेक पौष्टिक गुणधर्म असतात म्हणूनच भारतीय आहारात चिंचेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एक छोटा चिंचेचा गोळा गुळासोबत टाकल्यामुळे तुमच्या नेहमीच्या डाळ अथवा भाजीला एक छान चव येते. आंबट गोड चवीची ही चिंच आजवर तुम्ही अनेकदा चाखली असेल. पण या चिंचेचे आरोग्य आणि सौंदर्यावर होणारे फायदे आणि तोटे तुम्हाला माहीत आहेत का ?
चिंचेतील पोषक घटक –
चिंचेत अॅंटि सेप्टिक गुणधर्म असतात. एवढंच नाही तर चिंच व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. चिंच थंड गुणधर्माची असल्यामुळे चिंचेचा स्वयंपाकात वापर केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. थंड गुणधर्म असल्यामुळे आहारात जास्त प्रमाणात चिंच वापरू नये. अती प्रमाणात चिंच खाल्लास शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
चिंचेचे फायदे
चिंचेत अनेक पोषक घटक असल्यामुळे कमी प्रमाणात चिंच आहारात असेल तर त्याचे चांगले फायदे होऊ शकतात.
केसांच्या समस्या कमी होतात –
त्वचेखाली सीबमच्या निर्मितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिंच फायदेशीर ठरते. चिंच खाण्यामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांचे गळणे थांबते. खाण्याप्रमाणेच हेअरमास्क म्हणूनही तुम्ही केसांवर चिंचेचा वापर करू शकता. केस पांढरे झाले असतील तर चिंचेचा कोळ आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून तुमच्या केसांना लावा. या दोन्ही घटकांची एक छान पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. सुकल्यावर वीस मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. ज्यामुळे तुमच्या केसांना एक छान रंग चढेल आणि केस चमकदार होतील.
त्वचेसाठी उपयुक्त –
चिंचेत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए,बी,सी असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर याचा चांगला परिणाम होतो. त्वचेवर एखाद्या फेसपॅकप्रमाणे तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही चिंचेची पावडर, हळद आणि दही एकत्र करून तुमच्या चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील जुनाट व्रण, काळे डाग कमी करण्यासाठी चिंचेचा कोळ आणि हळद एकत्र करून त्वचेवर लावल्यास चांगला फायदा होतो. चिंचेमुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा मुळापासून स्वच्छ होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर चिंच तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. कारण चिंचेत भरपूर प्रमाणात हायड्रोसिल अॅसिड असते. ज्यामुळे चिंच खाण्यामुळे तुमची भूक कमी होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर त्यामध्ये चिंचेचा वापर करा. ज्यामुळे तु्म्हाला भुकेवर नियंत्रण ठेवणं शक्य होईल.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते –
डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, अशा डोळ्यांच्या समस्या चिंचेमुळे कमी होऊ शकतात. चिंचेमधील पोषक घटक तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. डोळ्यांवर चिंचेच्या पाणी लावल्यामुळे डोळ्यांना थंडावा आणि आराम मिळू शकतो. मात्र त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण तुमच्या डोळ्यांची काय समस्या आहे हे समजल्याशिवाय डोळ्यांवर थेट कोणताही उपचार करू नये.
ह्रदयाचे कार्य सुधारते –
चिंचेमुळे शरीरातील कोलेस्ट्ऱॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. जेव्हा शरीरात पोटॅशिअमचे प्रमाण वाढते तेव्हा तुमचा रक्तदाब कमी होतो. चिंचेमध्ये पोटॅशिअम योग्य प्रमाणात असते ज्यामुळे तुमच्या रक्तदाबावर योग्य नियंत्रण राहते. यात व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे प्रतिकार शक्ती मजबूत होते आणि तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारू लागते.
चिंचेचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –
चिंच जितकी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकीच तिचा अती वापर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो.
- काही लोकांना त्याच्या शरीर प्रकृतीप्रमाणे चिंचेची अॅलर्जी असू शकते. ज्यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढून त्यांना चक्कर, अंगाला खाज येणे, अंगावर पित्त येणे, सूज येणे, श्वसनाचा त्रास होणे असा त्रास जाणवतो.
- घशाचे विकार, घसा खवखवणे, खोकला अशा आरोग्य समस्या असताना कधीच चिंच खाऊ नये. कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील आम्ल पदार्थ वाढण्याची शक्यता असते.
- जास्त प्रमाणात चिंच खाण्यामुळे शरीरात एस्ट्रोजन या हॉर्मोन्सची निर्मिती वाढू शकते. ज्यामुळे महिलांना गर्भाशयाच्या आणि मासिक पाळीच्या समस्या निर्माण होतात.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या कारणांसाठी स्वयंपाकात केला जातो आमसुलाचा वापर
गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पिण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण