Recipes

नेहमीच्या वरण /आमटीऐवजी करून बघा हे चटपटीत तामिळ कल्याणम् रसम

Vaidehi Raje  |  Apr 12, 2022
tamil kalyana rasam

कधी कधी आपल्याला नेहमीची आमटी किंवा वरणाचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी चटपटीत आणि तोंडाला चव येईल असं काहीतरी खावंसं वाटतं. अर्थात आपल्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या व वरणांचे असंख्य प्रकार आहेत.  चिंच गुळाचे वरण , नुसत्या जिरं कडिपत्याच्या फोडणीचे वरण, कांदा-टोमॅटोचे वरण , डाळ वांगी , शेवग्याच्या शेंगांचे वरण , मिश्र डाळींचे वरण, पचायला हलके असे नुसत्या मुगाच्या डाळीचे वरण असे अनेक प्रकार आपल्याला माहिती असतात आणि ते आपण करतोच. कधीतरी आपण जेवणात स्वादिष्ट कढी देखील करतो. या सगळ्याव्यतिरिक्त आपल्याला कधीतरी चटपटीत पण पौष्टिक आणि घरच्या घरी पटकन तयार होणारा पर्याय हवा असतो. अशा वेळी जर भाताबरोबर रसम केले तर त्याने तोंडाला चवही येते आणि ते पौष्टिक देखील असते. जसे इडलीचे, डोश्याचे, सांबारचे जसे असंख्य प्रकार आहेत तसेच रसमच्या सुद्धा भरपूर रेसिपीज आहेत आणि प्रत्येक ठिकाणची रेसिपी आणि चव वेगवेगळी आहे. आज आपण बघणार आहोत तामिळ स्टाईलचे कल्याणम् रसम!

तामिळ कल्याणम् रसम 

अस्सल आणि पारंपारिक मसाल्यांनी बनवलेले पारंपरिक तामिळ कल्याणम् रसम  हे विशेषतः अय्यंगार तामिळ ब्राह्मण विवाह मेजवानीमध्ये बनवले जाते. हे रसम त्याच्या ऑथेंटिक फ्लेवर आणि चवीसाठी ओळखले जाते. हे सामान्यतः सांबारच्या जेवणाच्या आधी पोरियल आणि पापडम् सह वाफवलेल्या भाताबरोबर वाढण्याची पद्धत आहे.तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा रसम पावडर अगोदरच बनवून ठेवलीत तर तुमचा वेळ वाचेल आणि तुमचे रसम अगदी झटपट तयार होईल. यामुळे केवळ वेळेची बचतच होत नाही तर मोठ्या प्रमाणात पावडर बनवल्यास ती जास्त चवदार बनते. तसेच जर त्यात तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नसेल तर तुम्ही तो नाही घातलात तरीही चालेल. या रेसिपीमध्ये आंबटपणासाठी चिंच आणि टोमॅटो दोन्हींही वापरले आहे पण तुम्हाला जर चिंचेचा त्रास होत असेल तर तुम्ही चिंच वगळू शकता आणि टोमॅटोचे प्रमाण दुप्पट करू शकता.

तामिळ कल्याणम् रसम

तामिळ कल्याणम् रसम बनवण्याची पद्धत

साहित्य – कल्याणम् रसम पावडरसाठी – 1 टीस्पून तूर डाळ, 1 चमचे धणे दाणे, ½ टीस्पून जिरे, 1 टीस्पून मिरपूड/ काळीमिरी, 2 सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता

रसमसाठी साहित्य – 1 टोमॅटो चिरलेला, कढीपत्त्याची पाने चिरलेली, लसूणच्या  3 पाकळ्या ठेचून, ½ टीस्पून हळद, ½ टीस्पून गूळ, 1½ टीस्पून मीठ, 1 कप चिंचेचा कोळ, 6 कप पाणी, 1 कप शिजवून घेतलेली तूर डाळ, 2 चमचे चिरलेली कोथिंबीर 

फोडणीसाठी साहित्य- : 1 टीस्पून तूप,  1 टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, 1 सुकी लाल मिरची, कढीपत्ता

कृती –  कढईत तूर डाळ, धणे, जिरे, काळीमिरी , सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने कोरडीच भाजून घ्या. सगळ्या मसाल्यांतून सुगंध येईस्तोवर ते मंद आचेवर भाजून घ्या. मसाले थंड झाल्यावर त्यांची मिक्सरमधून बारीक पूड करून घ्या. ही पूड तुम्ही हवाबंद डब्यात साठवून केव्हाही वापरू शकता. एका मोठ्या कढईमध्ये, चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, लसूण पाकळ्या,हळद, गूळ,मीठ, चिंचेचा कोळ आणि 3 कप पाणी घ्या. झाकण ठेवून १५ मिनिटे उकळून घ्या. नंतर त्यात शिजलेली तूर डाळ आणि 3 कप पाणी घाला. चांगले मिसळा आणि तुम्हाला रसम जितके पातळ हवे असेल तितके किंवा किंवा फेस येईपर्यंत उकळवा.आता त्यात आपण बनवलेली कल्याणम् रसम पावडर, आणि मीठ घालून चांगले मिसळा.व फ्लेवर्स मिसळले जाईपर्यंत उकळवा. नंतर फोडणीसाठी तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार करा. ही फोडणी रसमवर घाला आणि वरून चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम वाफवलेल्या भातासोबत कल्याणम् रसमचा आस्वाद घ्या.

फोटो क्रेडिट – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Recipes