Festive

सणासुदीसाठी आले तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’

Aaditi Datar  |  Aug 9, 2019
सणासुदीसाठी आले तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे आपल्या तेजाज्ञा फॅशन ब्रॅन्डव्दारे सातत्याने नाविन्यपूर्ण कलेक्शन्स आणत असतात. मग ते डेनिम कलेक्शन असो नथ दुप्पट्टा कलेक्शन असो वा सिल्व्हर ज्वेलरी कलेक्शन. अशा वेगवेगळ्या कलेक्शन्सनंतर आता तेजाज्ञाने आणलं आहे खास सणावारासाठी ‘दागिना कलेक्शन’.

पारंपारिकता आणि आधुनिकतेचा मेळ

या दागिना कलेक्शनव्दारे पहिल्यांदाच साड्यांवर दागिन्यांचे अनोखे डिझाईन असण्याचं एक्सपिरीमेन्ट करण्यात आलं आहे. साडीच्या पुढील बाजूवर गळ्याजवळ आणि ब्लाउजवर दागिन्यांचे डिझाईन अशी या साड्यांची खासियत आहे. हे साड्यांचे कलेक्शन नुकतेच लाँच करण्यात आले आहे. आपल्या डिझाईनर वेअरमधून पारंपरिकतेला आधुनिकेतेची जोड देण्याचा प्रयत्न करणा-या तेजस्विनी पंडितला ही आगळीवेगळी कल्पना सुचली.

साडीवर घालण्याच्या दागिन्यांचा प्रश्न आता सुटला

या कलेक्शनबाबत सांगताना तेजस्विनी पंडित म्हणाली की, “सण समारंभावेळी तयार होताना दरवेळी प्रत्येकीला पडणारा कॉमन प्रश्न असतो. तो म्हणजे आता या साडीवर कोणते दागिने घालू? हा प्रश्न सोडवण्याच्या कल्पनेतून या कलेक्शनचा जन्म झालाय, असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे नेहमीच साडीचा पदर भरजरी असावा किंवा त्यावर जास्तीत जास्त काम असावं, याकडे लक्ष दिलं जातं. पण आता जमाना सेल्फीचा आहे. त्यामुळे साडीच्या पल्लुपेक्षाही अधिक, गळ्याविषयीचा विचार आजकाल स्त्रीया जास्त करतात, हे माझ्या लक्षात आलं. म्हणूनच पहिल्यांदा मी साडीच्या समोरच्या बाजूला जास्त काम करणं सुरू केलं.“

साडीसोबतच दागिन्यांचाही विचार

तेजाज्ञाच्या डिझाईनर कलेक्शनमध्ये साडीसोबतच नेहमी ब्लाउजचाही विचार होतो. तसे डिझाईनर ब्लाउजही साडीसोबतच दिले जातात. याविषयी तेजस्विनी पंडित म्हणाली की, “एकाक्षणी माझ्या असं लक्षात आलं की, हे पुरेसं नाही आहे. साडी घालतानाच ब्लाउजचा गळा कसा असावा, या सोबतच गळ्यात काय घालायला हवं, याचाही आपल्याला विचार करावा लागणार आणि मग ही कल्पना सुचली. तेजाज्ञाच्याच भाग असलेल्या सुनीता कुलकर्णी यांनी ही कल्पना सत्यात उतरवायला मला मदत केली. त्यांनी दागिन्यांची हूबेहूब दिसणाऱ्या डिझाईन्सवर काम करायला सुरूवात केली. ही डिझाईन्स मी काही जवळच्या मैत्रिणींना अभिप्रायासाठी दाखवली. त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांवरून हे बाकी स्त्रियांनाही आवडेल, हा विश्वास वाटल्यावर आता हे कलेक्शन घेऊन आम्ही आलो आहोत.”

कलेक्शनमधील खास डिझाईन्स

या कलेक्शनमधील खास डिझाईन्सबाबत सांगताना अभिनेत्री अभिज्ञा भावे म्हणाली की, “पुतळी हार, कोल्हापूरी साज, तन्मणी, शिवमुद्रा आणि पैठणीचे मुलभूत डिझाईन या कलेक्शनमधल्या डिझाईन्समध्ये सध्या उपलब्ध असेल. आपल्याकडे श्रावणापासून सण-समारंभाला सुरूवात होते. मंगळागौर, रक्षाबंधन, गणपती-गौरी, नवरात्री, दिवाळी, आणि नंतर लग्नकार्य यामध्ये आता काहीतरी नवं आणि एक्सक्ल्युजिव घालू असं प्रत्येकीलाच वाटतं. म्हणून मग हे कलेक्शन आम्ही लाँच करतो आहोत.”

तुम्हालाही साड्यांवर दागिने कोणते घालायचे हा प्रश्न टाळायचा असल्यास आजच पाहा तेजाज्ञाचं दागिना कलेक्शन.

हेही वाचा –

मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स

साजशृंगार ‘नथी’चा, महाराष्ट्रीयन नथीचा बदलता ट्रेंड

प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत हे 5 दागिने

 

Read More From Festive