घरात सुरक्षित आणि प्रसन्न वाटण्यासाठी घराची स्वच्छता खूप गरजेची आहे. घर स्वच्छ करताना आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे तुमचं बाथरूम. आजकाल मास्टर बेडरूममुळे प्रत्येकाच्या खोलीला अटॅच बाथरूम असतं. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने नियमित बाथरूम वापर झाल्यावर स्वच्छ करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या बाथरूम स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या आणि झटपट टिप्स
बाथरूमची स्वच्छता करण्यासाठी टिप्स
घर स्वच्छ करताना नियमित बाथरूम कसे स्वच्छ करावे यासाठी काही टिप्स
बाथरूमचे वॉश बेसिन स्वच्छ ठेवा –
बाथरूममध्ये सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे बाथरूम वॉश बेसिनचा. कारण सकाळी दात घासताना, प्रत्येक वेळी चुळ भरण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, सतत हात धुण्यासाठी, टॉयलेटचा वापर झाल्यावर असं दिवसभरात सर्वात जास्त वेळ आपण बाथरूमधील बेसिनचा वापर करत असतो. त्यामुळे दररोज बाथरूमचे बेसिन स्वच्छ करणं गरजेचं आहे. यासाठी लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करा आणि बेसिनवर एका स्क्रबरच्या मदतीने लावा. त्यानंतर कोमट पाण्याने बेसिन धुवून टाका. असं नियमित केल्यास तुमचं बाथरूम बेसिन स्वच्छही दिसेल आणि जीवजंतूपासून मुक्तही राहील.
बाथरूमचे कमोड अथवा इंडिएन टॉयलेट स्वच्छ करा –
आठवड्यात दर दोन दिवसांनी बाथरूम कमोड अथवा टॉयलेटचे भांडे स्वच्छ करणे गरजेचं आहे. कारण वॉश बेसिन नंतर जर तु्म्ही बाथरूमध्ये सर्वात कोणती गोष्ट अधिक वापरत असाल तर ती आहे कमोड. दिवसभरात प्रत्येकजण कमीत कमी दोन ते तीन वेळ या गोष्टीचा वापर करत असतो. तुम्ही घरात किती जण आहात आणि तुमचे टॉयलेट किती वेळा वापरले जाते यावरून ते किती वेळा स्वच्छ करावे हे ठरवावे. जास्त वापर होत असेल तर स्वच्छतेसाठी दररोज कमोड स्वच्छच करायला हवे. यासाठी वीस ते तीस मिनीटे कमोडमध्ये हार्पिक अथवा इतर स्वच्छ करणारी साधने वापरून ते थोड्यावर बंद करून ठेवावे. त्यानंतर गरम पाण्याने ते स्वच्छ करावे. कमोड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि मीठ एकत्र करून तयार होणाऱ्या मिश्रणाचा वापरही करू शकता. कमोड वेळच्या वेळी डिस इन्फेक्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण सर्वात जास्त जंतू कमोडवर असतात.
बाथरूम टाईल्स, नळ,काचा आणि आरसे –
बाथरूम अंघोळीसाठी दिवसभरात एकदा अथवा दोनदा वापरले जाते. त्यामुळे बाथरूमधील अंघोळीचा भाग दिवसभरात इतर भागाच्या तुलनेत कमी वेळ वापरला जातो. त्यामुळे आठवड्यातून एकदा अथवा दोनदा असं तुमच्या वेळेनुसार ठरवून टाईल्स, नळ, शॉवर, काचा आणि आरसे स्वच्छ करावे. एखादं चांगलं लिक्विड सोप अथवा बेकिंग सोडा वापरून तुम्ही हा भाग स्वच्छ करू शकता. काच स्वच्छ केल्यावर त्या व्यवस्थित वाईप आऊट करा. टाईल्स धुतल्यावर त्या सुकेपर्यंत पुन्हा लगेचच बाथरूम वापरू नका.
बाथरूममधील साहित्य स्वच्छ करणे –
बाथरूममध्ये ब्रश स्टॅंड, साबणाचे स्टॅंड, बास्केट्स अशा साहित्यासोबतच अंघोळीची बादली, मग अशा प्लास्टिकच्या साहित्याचा वापर होत असतो. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा वेळेनुसार ही सर्व साधने स्वच्छ करून घ्यावीत. ज्यामुळे जीवजंतूचा वावर बाथरूममध्ये कमी राहील. यासाठी भांडी घासण्याचा साबण आणि ब्रश याचा वापर तुम्ही करू शकता. मात्र लक्षात ठेवा बाथरूम स्वच्छ करण्याचे संपूर्ण कीट नेहमी वेगळं ठेवा. त्याचा वापर इतर वस्तू स्वच्छ करण्यासाठी करू नका. शिवाय संपूर्ण बाथरूम स्वच्छ केल्यावर या वस्तू निर्जंतूक करण्यास विसरू नका.
स्वच्छ आणि निर्जंतूक बाथरूमचा वापर केल्यावर मन नक्कीच प्रसन्न होतं. शिवाय वेळच्या वेळी स्वच्छता राखल्यास बाथरूम स्वच्छ करण्याचा त्रासही होत नाही. जर तुम्हाला दररोज बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वेळ नसेल तर हाऊसकिपिंग अॅपची मदत घेऊन मदतनीसांच्या मदतीने दर आठवड्याला तुम्ही तुमच्या बाथरूमची स्वच्छता राखू शकता. कारण ते तुम्हाला काही ठराविक रक्कमेमध्ये तुमचे बाथरूम स्वच्छ आणि निर्जंतूक करून देतात.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
अधिक वाचा –
बाथरूममधील जागा व्यवस्थित वापरण्यासाठी उपयोगी टिप्स
अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टीप्स येतील कामी
बेकिंग सोड्याचे हे ‘25’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Baking Soda In Marathi)