बॉलीवूड

असे बॉलीवूड सेलिब्रिटी ज्यांनी आई-वडील होण्यासाठी घेतला सरोगसीचा आधार

Dipali Naphade  |  Mar 25, 2019
असे बॉलीवूड सेलिब्रिटी ज्यांनी आई-वडील होण्यासाठी घेतला सरोगसीचा आधार

आजकाल आपल्याला बऱ्याचदा सरोगसी हा शब्द ऐकू येत असतो. साधारणतः आपल्याला मूल हवं असेल तर काही जण पैसे देऊन एखाद्या स्त्री ची बाळ होण्यासाठी मदत घेतात. त्याला सरोगसी म्हणतात. पण याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. बऱ्याच जोड्या अशा असतात ज्यांना मूल हवं असतं पण काही कारणाने त्यांना मूल होऊ शकत नसतं. त्या जोड्या अशा महिलांची मदत घेऊन सरोगसीद्वारे आपल्या मुलाला जन्म देत असतात. ही सरोगसी दोन प्रकारची असते. एक म्हणजे ट्रेडिशनल सरोगसी आणि एक म्हणजे जेस्टेशनल सरोगसी. आता तुम्ही म्हणाल म्हणजे नक्की काय? कारण सरोगसी म्हणजे नक्की काय हे माहीत आहे पण हे दोन प्रकार बऱ्याच जणांना माहीत नसतात.

ट्रेडिशनल सरोगसीमध्ये आईच्या गर्भाशयामध्ये वडिलांचे शुक्राणू प्रत्यारोपण करण्यात येतात तर जेस्टेशनल सरोगसीमध्ये आई आणि वडील या दोघांचेही शुक्राणू आणि अंडी ही सरोगेट आईच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपण करण्यात येतात. आम्ही तुम्हाला या सरोगसीचा आधार घेऊन आई – वडील झालेल्या सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत. यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे बॉलीवूडचा बादशाह.

1. शाहरुख खान

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी दोन मुलांनंतर एका मुलाला जन्म दिला ज्याचं नाव अबराम आहे. या मुलाचा जन्म हा सरोगसी पद्धतीने झाला आहे. सरोगसीचा आधार घेऊन बॉलीवूडमध्ये आई – वडील झालेली ही पहिली जोडी आहे. त्यानंतर बॉलीवूडमध्ये सरोगसीचा एक ट्रेंडच सुरू झाला. शाहरूख आणि गौरीला अजून एक मूल हवं होतं. पण त्यासाठी त्यांनी सरोगसीचा आधार घेतला. त्यांची दोन्ही मुलं ही मोठी होती. पण तरीही त्यांनी तिसऱ्या मुलाला जन्म देण्याचं ठरवलं आणि त्यानंतर सरोगसीचा आधार घेत अबरामचा जन्म झाला.

2. आमिर खान

बॉलीवूड स्टार आमिर खानची पत्नी किरण रावनेदेखील आझादला जन्म देण्यासाठी सरोगसीचा आधार घेतला. या मुलाचा जन्म होण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींना सामोरं गेलं असल्याचं दोघांनी एक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. शिवाय आझादचा जन्म होण्यासाठी त्यांनी बरीच वाट पाहिली असंही स्पष्ट केलं. याआधी किरणला दिवस गेले होते. मात्र किरण काही कारणामुळे आई होऊ शकली नाही. त्यानंतर दोघांनीही सरोगसीचा आधार घेत आझादला जन्म दिला. त्यामुळे आझाद हा दोघांसाठीही अतिशय स्पेशल आहे असंही त्यांनी बऱ्याचदा सांगितलं आहे.

3. लिझा रे

बॉलीवूड अभिनेत्री लिझा रे ने 46 व्या वर्षी दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. तिलादेखील या मुलींसाठी सरोगसीचा आधार घ्यावा लागला. पण ही गोष्ट मुलींचा जन्म झाल्यानंतर साधारण तीन महिन्यांनी तिने सोशल मीडियावर जाहीर केलं. लिझाला 2009 मध्ये ब्लड कॅन्सर झाला होता आणि याचा उपचार करून 2010 मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली होती. तर त्यानंतर 2012 मध्ये तिने उद्योगपती जेसन देहनीबरोबर लग्न केलं आणि नंतर ती सरोगसीचा आधार घेत आई झाली.

4. तुषार कपूर आाणि एकता कपूर

प्रसिद्ध बॉलीवूड स्टार जितेंद्रचा मुलगा तुषार कपूर आणि एकता कपूर या दोन्ही मुलांनी सरोगसीचा आधार घेत मुलांना जन्म दिला. खरं तर तुषार कपूर हा सिंगल फादर बनणारा पहिला अभिनेता आहे. एकता कपूरने आई होण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र शेवटी तिला सरोगसीचा आधार घ्यावा लागला. तुषारने आपला मुलगा लक्ष्य याला चार वर्षांपूर्वी जन्म दिला असून त्यावेळी आपला आनंद व्यक्त करताना आपल्याजवळ यासाठी शब्द नाहीत असंही तुषारने म्हटलं होतं. तर एकता कपूरचं बाळ हे केवळ दोन महिन्याचं आहे. दोन्ही मूलं ही सरोगसीचा आधार घेऊन झाली आहेत. पण त्यासाठी एकताला स्वतःला बाळाला जन्म द्यायचा होता. पण तसं काही कारणाने होऊ शकलं नाही अशा स्वरूपाच्या बातम्यादेखील छापून आल्या होत्या. पण आता तिचा मुलगा रवी कपूर आल्यानंतर तिचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये.

5. सनी लिओनी

पोर्न स्टारपासून ते बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास केलेली अभिनेत्री सनी लिओनी आज तीन मुलांची आई आहे. सनी आणि तिचा पती वेबर यांनी 2017 मध्ये निशा कौरला दत्तक घेतलं. त्यानंतर तिने 2018 मध्ये सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. अशर सिंह वेबर आणि नोआ सिंह वेबर अशी या दोन्ही मुलांची नावं असून या तिनही मुलांची काळजी घेताना सनी आणि तिचा पती वेबर बरेचदा दिसतात. या कुटुंबाचे फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसत असून अगदी सुखी कुटुंब असल्याचंही दिसून येतं. पण सनी आणि वेबरने यासाठी सरोगसीचा आधार घेतला आहे.

6. करण जोहर

बॉलीवूड फिल्म मेकर करण जोहरनेदेखील सरोगेसीद्वारे आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना जन्म दिला. त्याची दोन्ही मुलं ही प्रि – मॅच्युअर होती. त्यामुळे त्यांचा जन्म झाल्यानंतर साधारण तीन महिन्यांनी ही गोष्ट सर्वांना कळली होती. तोपर्यंत ही गोष्ट गुपित ठेवण्यात आली होती. या दोन्ही मुलांची नावं करणने आपल्या आई – वडिलांच्या नावावरून यश आणि रूही अशी ठेवली आहेत. करण आपल्या दोन्ही मुलांचे व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असतो. शिवाय तो त्यांच्याबरोबर बराच वेळही घालवतो. आपल्याला मुलं हवी असल्याचं त्याने आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये म्हटलं होतं.

7. सोहेल खान

सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खाननेदेखील सरोगसीचा आधार घेऊन आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यांचा मोठा मुलगा निर्वाण दहा वर्षांचा झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या मुलाला जन्म देण्यात काही प्रॉब्लेम येत होते. तेव्हा त्यांनी दुसऱ्या मुलासाठी सरोगसीचा आधार घेतला. योहान असं या मुलाचं नाव असून योहान आणि निर्वाणच्या वयामध्ये फरक आहे.

8. कृष्णा आणि कश्मिरा शाह

गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा आणि कश्मीरा शाह या जोडीनेदेखील सरोगसीचा आधार घेतला. कृष्णा आणि कश्मिरा बरेच वर्ष लिव्ह इनमध्ये एकत्र राहत होते. पण त्यानी 2013 मध्ये लग्न केलं. कश्मिरा 45 तर कृष्णा 34 वर्षांचा आहे. त्यांना मूल होण्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स येत होते. त्यामुळे नंतर सरोगसीचा आधार घेत त्यांना दोन जुळी मुलं झाली आहेत. कृष्णा आणि कश्मिराने दोन मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा 

दीपिकाच्या पुढे गेली कंगना, एका चित्रपटासाठी मिळाले तब्बल २४ कोटी

वेबसीरिजमध्ये सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच सर्वाधिक लोकप्रिय

First Look : ‘छपाक’ मध्ये अशी दिसणार दीपिका पदुकोण

 

Read More From बॉलीवूड