मनोरंजन

लॉकडाऊन संपल्यावरदेखील प्रेक्षकांना नाही पाहता येणार ‘या’ मालिका

Trupti Paradkar  |  Apr 21, 2020
लॉकडाऊन संपल्यावरदेखील प्रेक्षकांना नाही पाहता येणार ‘या’ मालिका

सर्व जगावर सध्या कोरोना वैश्विक महामारीच्या संकटाची सावली पसरली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक संकटाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या संकटाचा  सर्वात मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला आहे. गेल्या महिन्याभरापासून अनेक मालिका आणि चित्रपटाचं शूटिंग बंद आहे. बिग बजेट चित्रपट असो अथवा लोकप्रिय मालिका सर्वांनाच यामुळे नुकसान सहन करावं लागत आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि टिआरपी कायम ठेवण्यासाठी अनेक वाहिन्यांनी जुन्या लोकप्रिय मालिकांचे पुनःप्रसारण करण्यास सुरूवात केली आहे. मात्र यामुळे मागील काही महिने अथवा वर्षभरापासून सुरू असलेल्या अनेक लोकप्रिय मालिकांचे प्रेक्षपण थांबवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर आता यातील काही मालिका कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. ज्यामुळे लॉकडाऊन संपल्यावरदेखील प्रेक्षकांना या तीन मालिका आता कधीच पाहता येणार नाहीत. 

Instagram

कोणत्या आहेत या लोकप्रिय मालिका

सोनी टिव्हीवर सुरू असलेली बेहद 2, इशारो इशारो में आणि पटियाला बेब्स या तीन मालिकांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. या मालिका काही दिवसांनी म्हणजेच लॉकडाऊन संपल्यावरही पुन्हा सुरू करता येणार नाहीत. एका मुलाखतीच्या माध्यमातून सोनी चॅनलने याबाबत खुलासा केला आहे. याचं कारण असं की या मालिकांसाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा आधीच संपलेली आहे. या मालिकांचे शूटिंग मार्चपासून बंद आहे. आता सर्व ठीक होईपर्यंत वाहिनीला वाट पाहणं नक्कीच शक्य नाही. सध्याची परिस्थिती पाहता या मालिका पुन्हा सुरू करणं आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही. एखादा लॉजिकल क्लासमॅक्स सीन शूट करून त्या पूर्ण बंद करणं देखील आता जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच सर्वाच्या हिताचा विचार करत आणि निर्मात्यांच्या सहमतीने वाहिनीने या मालिका पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

काय आहे मालिकांच्या निर्मात्यांचे मत

या मालिकांच्या निर्मात्यांचे आणि वाहिनीचे याबाबत एकमत झालेले आहे. पटियाला बेब्सची निर्माती रजिता शर्माच्या मते मार्चपासून मालिकेचं शूटिंग बंद आहे आणि आता आणखी किती दिवस हे सर्व बंद राहील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे मालिका बंद करणं हाच यावर एकमेव उपाय आहे. या तिन्ही मालिका टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे झालेल्या आर्थिक नुकसानमुळे चाहत्यांना या मालिका पुन्हा कधीच पाहता येणार नाहीत. शिवाय या मालिकांचा काय शेवट झाला हे देखील समजणार नाही.

काय आहे या मालिकेतील कलाकारांची प्रतिक्रिया –

‘पटियाला बेब्स’मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अशनूर कौरला तर या बातमीने धक्काच बसला आहे. ती या मालिकेत मिनीची भूमिका करत होती. मालिकेचा विषय नेहमीपेक्षा वेगळा असल्यामुळे कमी दिवसात या मालिकेला चांगलं यश मिळालं होतं. ‘बेहद’ च्या पहिल्या भागाप्रमाणेच जेनिफर विंगेटला दुसऱ्या भागाकडूनही मोठी आशा होती. ‘इशारो इशारो में’ मधील कलाकारांचीदेखील सारखीच अवस्था आहे. मात्र आता वेळच अशी आहे की कलाकार असो वा प्रेक्षक प्रत्येकाला आपल्या भावनांना आवर घालावा लागेल. काही मालिका आणि प्रेक्षकांचे अतूट नातं आपोआप निर्माण होत असतं. त्यामुळे या मालिकांच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच निराश करणारी आहे. कोरोनाचं संकट लवकर जाऊन मनोरंजन विश्वाला पुन्हा सुगीचे दिवस पुन्हा यावेत अशी आशा यामुळे चाहते व्यक्त करत आहेत. 

फोटोसौजन्य –

 

अधिक वाचा –

ट्रक ड्रायव्हर्समध्ये आजही प्रसिद्ध आहेत ही अजय देवगणची गाणी

करण जोहरच्या रुही आणि यशच्या विनोदी व्हिडिओचा आला सीझन 2

कला आणि कलाकारांबद्दल प्रेम असणाऱ्या बाळासाहेबांची आठवण

Read More From मनोरंजन