आरोग्य

पावसात भिजल्यावर त्वरीत करा या गोष्टी, नाहीतर पडाल आजारी

Trupti Paradkar  |  Jun 7, 2021
पावसात भिजल्यावर त्वरीत करा या गोष्टी, नाहीतर पडाल आजारी

मान्सुन कधीही दाखल होईल आणि जोरदार पावसाला सुरूवात होईल. वादळी वारा आणि तुरळक पावसाला राज्यात अनेक ठिकाणी सुरूवात झालेली आहे. पावसात भिजणं हा अनेकांच्या आवडीची गोष्ट असते. पहिल्या पावसात मनसोक्त भिजून उन्हाळ्याची काहिली दूर केली जाते. पावसाळ्यात निसर्ग बहरलेला असतो त्यामुळे पिकनिक अथवा निसर्गदर्शनच्या साथीने भिजणं हे ओघाने येतंच. पण नेहमी पेक्षा सध्याचा काळ जरा नाजूक आहे. गेले दोन वर्ष देशात कोरोना महामारीचे वातावरण आहे. त्यामुळे जरी लॉकडाऊनमुळे तुम्ही कंटाळला असाल तरी पावसात भिजण्यापूर्वी  या काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. कारण पावसात भिजताना या चुका केल्या तर तुम्ही लगेच आजारी पडू शकता.

डोके भिजू देऊ नका –

पावसात भिजल्यावर वडिलधारी मंडळी आपल्याला लगेच डोकं म्हणजेच केस पुसण्याचा सल्ला देतात. कारण डोकं हा शरीराचा असा भाग आहे  जो सर्वात वरच्या बाजूला असल्यामुळे पावसाचं  पाणी थेट डोक्यावर पडतं. शरीराचे सर्व कार्य मेंदू नियंत्रित करत असतो. शिवाय मेंदू आणि डोक्याकडचा भाग हा शरीराच्या इतर भागापेक्षा नाजूक असतो. म्हणूनच भिजताना डोक्यावर पाणी पडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. यासाठीच जर  पावसात जाण्याची वेळ आलीच तर छत्री अथवा एखाद्या गोष्टीने डोके झाकून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला पावसाच्या पाण्याचा त्रास होणार नाही.

घरी आल्यावर लगेच कपडे बदला –

पावसात भिजल्यावर घरी येतातच सर्वात आधी आपण कपडे बदलले पाहिजेत. कपडे पटकन बदलण्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान पुन्हा नियंत्रित होते. तुम्हाला जर थंडी वाजत असेल तर कपडे बदलण्यामुळे ती पटकन कमी होते. बऱ्याचदा पावसाच्या पाण्यातून एखाद्या आजाराचे संक्रमण अथवा फंगल संक्रमण होण्याची शक्यता असते. अंघोळ करून, हातपाय धुवून आणि कपडे बदलून तुम्ही या संक्रमणाचा धोका टाळू शकता. 

पायाची निगा राखा –

पावसाळ्यात पायाची निगा राखण्यासाठी बाहेरून घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवावेत. कारण जर तुम्ही फ्लॅट आणि मोकळ्या डिझाईनचे फूटवेअर वापरत असाल तर पावसात पायावर मातीचे  कण, चिखल, पाणी याचा सतत स्पर्श होत असतो. ज्यामुळे पायाचे इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. या काळात नायटा, खरूज, चिखल्या, रिंगवर्म असे विकार पायाला होतात. यासाठीच पाय स्वच्छ धुणे फार गरजेचं आहे.

हाता पायाला अॅंटि बॅक्टेरिअल क्रीम लावा –

पावसात भिजून आल्यावर कपडे बदलताच त्वचेला अॅंटि बॅक्टेरिअल क्रीम लावा. कारण हात पाय धुतल्यावरही पावसाच्या  पाण्यातील बॅक्टेरिआ तुमच्या शरीरावर असू शकतात. मात्र  अॅंटि बॅक्टेरिअल क्रिममुळे ते त्वचेवरून नष्ट होतात. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही त्वचेच्या  समस्या होत नाहीत. कारण पावसाच्या  पाण्यामुळे नायटा, खरूज, खाज, फंगल इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. 

गरम चहा अथवा सूप प्या –

पावसात भिजल्यावर आल्याचा चहा अथवा गरमागरम सूप प्यायल्यामुळे तुम्हाला लगेच बरं वाटू लागतं. यासाठी तुम्ही एखादा आर्युर्वेदिक काढाही नक्कीच पिऊ शकता. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आल्याचा चहा, सूप, काढा पिणे फायद्याचे ठरते. सर्दी , खोकला  अथवा ताप येऊ नये यासाठी पावसात भिजल्यावर हा उपाय जरूर करा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

आयुर्वेदिक काढा रेसिपी (Kadha Recipe In Marathi)

सर्दी खोकला घरगुती उपाय (Home Remedies For Cold and Cough In Marathi)

त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय (Headache Home Remedies In Marathi)

Read More From आरोग्य