Care

हिवाळ्यात केस कोरडे होऊ नयेत म्हणून आधीच घ्या अशी काळजी

Trupti Paradkar  |  Nov 6, 2020
हिवाळ्यात केस कोरडे होऊ नयेत म्हणून आधीच घ्या अशी काळजी

हिवाळ्यात वातावरणात वाढू लागलेला गारवा तुमच्या त्वचा आणि केसांवर परिणाम करू लागतो. हिवाळा सुरू झाला की आपण त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात तर करतो पण केसांची हवी तशी निगा राखली जात नाही. ज्यामुळे तुमचे केस कोरडे आणि  निस्तेज दिसू लागतात. म्हणूनच वातावरणात बदल व्हायला सुरवात होण्याआधीच त्वचा आणि केसांची निगा राखण्यास सुरूवात करायला हवी. जाणून घ्या हिवाळ्याआधी कशी राखावी केसांची निगा ज्यामुळे होणार नाही नुकसान

हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनरचा वापर कमी करा –

केसांवर निरनिराळी स्टाईल करण्यासाठी तुम्ही ड्रायर, स्ट्रेटनर, कर्लर असे अनेक टूल्स वापरत असता. मात्र हिवाळ्यात हे सर्व टूल्स वापरणे जाणिवपूर्वक कमी करावे. कारण त्यामुळे तुमचे केस जास्त कोरडे होऊ शकतात. अशा वातावरणात केसांचे क्युटिकल्स या गरम वस्तूंमुळे जळतात आणि केस कमजोर होऊन गळू लागतात.

Shutterstock

केस नियमित ट्रिम करा –

हिवाळ्यातदेखील केस काही ठराविक काळानंतर ट्रिम करायलाच हवेत. कारण त्यामुळे तुमच्या कोरड्या केसांना फुटलेले फाटे निघून जातात आणि केसांची वाढ जोमाने होऊ शकते. साधारणपणे दर तीन महिन्यांनी तुम्ही तुमचे केस ट्रिम करायला हवेत. 

कोमट तेलाने मालिश करा-

केसांना योग्य प्रमाणात तेलाचा पूरवठा होणं खूप गरजेचं  आहे. कारण त्यामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत आणि केस मऊ मुलायम होतात. हिवाळ्यात वातावरणातील वाढत्या गारव्यामुळे तुमचा स्काल्प कोरडा होऊन त्याला सतत खाज येते. यासाठीच अशा स्काल्पवर नेहमी कोमट तेलाने मसाज करावा. हिवाळा सुरु होण्यापुर्वीच आठवड्यातून एकदा केस नारळाच्या अथवा बदामाच्या तेलाने मालिश केल्यास तुमचा स्काल्प निरोगी राहतो. कोमट तेल केसांच्या मुळांना लावावे आणि हलक्या हाताने केसांना मालिश करावे. ज्यामुळे ते तेल केसांमध्ये मुरते आणि केसांना योग्य पोषण मिळते.

Shutterstock

केस धुतल्यानंतर कंडिशनर लावण्यास विसरू नका-

केस धुतल्यावर केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. अशा वेळी हिवाळ्यात जर तुम्ही केसांवर कंडिशनरचा वापर केला नाही तर केसांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच केस धुतल्यावर केसांना कंडिशनर अवश्य करा. ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल.

केसांवर सीरमचा वापर करा –

केसांचे योग्य पोषण करण्यासाठी तुमच्या केसांच्या प्रकारानुसार आजकाल बाजारात विविध प्रकारचे सीरम मिळत असतात. केस धुतल्यानंतर केस सुकण्याआधी केसांना सीरम लावावे. ज्यामुळे केसांवर एक सुरक्षित कोट निर्माण होतो आणि केसांचे रक्षण होते. 

Shutterstock

नियमित आणि भरपूर पाणी प्या –

हिवाळ्यात नकळत आपण पाणी कमी पिऊ लागतो. मात्र कोणत्याही सीझनमध्ये तुमच्या  शरीराला पाण्याची तितकीच आवश्यक्ता असते. यासाठी शरीर, त्वचा आणि केस हायड्रेट राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. हिवाळ्यात पाणी पिणे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही मोबाईलवर वॉटर अर्लाम सेट करू शकता. 

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे  सर्व उपाय कडक थंडीला सुरूवात झाल्यावर करून काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे हिवाळ्याला सुरूवात होण्याआधीच तुमच्या दिनक्रम आणि ब्युटी केअर रूटिनमध्ये  योग्य तो बदल करा. ज्यामुळे थंडीचा तुमच्या  त्वचेवर अथवा केसांवर कोणताच दुष्परिणाम होणार नाही.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

केसांना कापूर तेल लावण्याचे हे आहेत फायदे, हेअर केअर मध्ये करा समावेश

केस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग

केसांचे परफ्युम वापरुन घालवा केसांची दुर्गंधी

Read More From Care