Budget Trips

Weekend Gateway : शांत आणि नयनरम्य हरिहरेश्वर

Aaditi Datar  |  Apr 17, 2019
Weekend Gateway : शांत आणि नयनरम्य हरिहरेश्वर

चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. तसंही मुंबईकरांना गर्दीतून सुटका हवी असतेच. आता प्रत्येक घरात या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग झालं असेल किंवा सुरू असेल. दरवर्षी कुटुंबाला एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणं जरा कठीणच आणि रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी.  


गोव्याचं फॉरेन पब्लिक आणि झिंगाटपणा टाळायचा असल्यास हरिहरेश्वरचे किनारे तुमचं मनापासून स्वागत करतील. कारण इकडे ना पब कल्चर आहे ना शॉपिंग मार्केट्स. इथे आहे निवांतपणा आणि शांत समुद्रकिनारे. कोणत्याही प्रदूषणापासून मुक्त असलेले इथले समुद्रकिनारे आणि दिवसाच्या वेळेनुसार बदलणारा समुद्राच्या पाण्याचा रंग एक वेगळाच अनुभव देऊन जातो. शांतपणे समुद्रकिनाऱ्यावर फिरावं, वाळूत बसावं आणि सोबतीला समुद्रावरचा खारा वारा.

माझ्या आठवणीतलं हरिहरेश्वर अजूनही ताजं आहे. पण आमची तिकडे जाण्याची वेळ जरा चुकली होती. कारण तिकडे पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याचा हवा तसा आनंद घेता आला नाही. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात असलेलं आणि मुंबईपासून अवघ्या 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. येथेच सावित्री नदी समुद्राला मिळते. इथल्या पुजाऱ्यांच्या सांगण्यानुसार हरिहरेश्वरचा उल्लेख हा स्कंद पुराणात आढळतो. हरिहरेश्वर चारी बाजूंनी हरिहरेश्वर, हरीशांचल, ब्रम्हादी आणि पुष्पादी या डोंगरांनी वेढलेलं आहे. एकीकडे समुद्राच्या लाटांचा आवाज तर दुसरीकडे देवळाच्या घंटांचा मधूर ध्वनी तुमच्या मनाला शांतता देतो.

जर तुम्ही भाविक असाल तर इथल्या सुंदर समुद्रकिनारीच असणाऱ्या देवळातही दर्शनाला जाऊ शकता. कोकण किनारपट्टीवरील हरिहरेश्वर हे एक निसर्गरम्य आणि पवित्र तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर गावात हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक आणि हनुमान अशी चार मुख्य मंदिरे आहेत. तसंच समुद्रकिनाऱ्यानजीक विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणं आहेत. देशातील एकूण 108 तीर्थस्थानांपैकी असूनही याला प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मानले जाते. हरिहरेश्वरचा उल्लेख हा महापवित्र क्षेत्र म्हणून ‘श्री हरीहरेश्वर माहात्म्य’ पोथीमध्ये आढळतो. असं म्हटलं जातं की, इथे आल्यावर पहिल्यांदा काळभैरवाचं दर्शन घ्यावं आणि हरिहरेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा काळभैरवाचं दर्शन घ्यावं.

हरिहरेश्वरमधील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिर जरी समुद्र किनारी असलं तरी प्रदक्षिणा घालण्यासाठीचा मार्ग हा डोंगरावरुन आणि समुद्रातून जातो. या मार्गातील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून तुम्ही डोंगराची प्रदक्षिणा पूर्ण करू शकता. या प्रदक्षिणेचं अंतर एक कोसाचं असल्याने त्याला कोसाची प्रदक्षिणा असंही म्हणतात. या प्रदक्षिणेच्या मार्गातच एक गणपतीची मूर्तीही आहे. जिला प्रत्येक भाविक मनोभावे पूजतात. ही मूर्ती इथेच प्रकट झाली होती, असं म्हणतात. पण या प्रदक्षिणेला जाताना भरती-आहोटीची वेळ पाहून जावं. तसं हा रस्ता खडतर आणि खडकाळ आहे त्यामुळे जपूनच जावं. जर तुम्ही आतापर्यंत कधी केवड्याचं बन पाहिलं नसेल तर इकडच्या समुद्रकिनाऱ्यावर नीट शोधल्यास पाहता येईल.

इथला समुद्रकिनारा दक्षिण आणि उत्तर या दोन भागात विभागला गेला आहे. पण इथल्या समुद्रकिनाऱ्याचं अजूनही व्यावसायिकीकरण झालं नसल्याने इथे येणारे भाविक तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर आंघोळ करताना दिसतील किंवा खाजगी व्यावसायिक समुद्रावर बाईक राईड उपलब्ध करून देताना दिसतात. तसंच एमटीडीसी (MTDC) कॉम्प्लेक्सतर्फे स्पीट बोटची सुविधा आहे किंवा इथल्या ओपन एअर कॅफेमध्ये बसून समुद्रकिनाऱ्याचं विहंगम दृश्यही एन्जॉय करू शकता. पण एका गोष्टीची काळजी घ्या, समुद्रात खोलवर जाऊ नका. इथल्या स्थानिकांना विचारून तुम्ही सुरक्षित स्पॉट्सवर समुद्राचा आनंद घेऊ शकता.

इथली बरीचशी हॉटेल्स आणि दुकानही देवळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आहेत. हरिहरेश्वरमध्ये आल्यावर स्थानिक चविष्ट जेवण, कैरी पन्ह आणि आंब्याचा स्वाद चाखायला विसरू नका. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्यासाठी इकडे मेजवानीच आहे. तसंच इथे एक खाजगी रिसोर्टही झालं आहे. जिथे गोव्याच्या धर्तीवर शॅक रेस्टॉरंट उभारण्यात आलं आहे.

जर तुम्हाला इथला परिसर आसपासचा परिसर अजून एक्सप्लोअर करायचा असल्यास तुम्ही बागमांडला जाऊ शकता. ट्रेकींगची आवड असणाऱ्यासाठी तिथे बाणकोट किल्ला आहे किंवा तुम्ही स्थानिक वाहनांचा वापर करून वेळास बीचलाही जाऊ शकता. वेळास येथे दरवर्षी नोव्हेंबर आणि मार्च दरम्यान ऑलिव्ह रिडले कासव आपली अंडी घालण्यासाठी येतात. त्यानंतर इथे मोठा कासव महोत्सव असतो. ज्याला मुंबई आणि पुण्यातून लोक पाहण्यासाठी गर्दी करतात. तसंच हरिहरेश्वरजवळील तुलनेने विकसित असलेल्या श्रीवर्धनलाही भेट देऊ शकता. श्रीवर्धनचा किनाराही सुंदर आहे.

कसं पोचाल : हरिहरेश्वर हे मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव आहे. जे इथून जवळपास 60km अंतरावर आहे. एसटीच्या अनेक बसेस हरिहरेश्वरला जातात. तसंच तुम्ही खाजगी वाहनानेही इथे पोचू शकता. हरिहरेश्वरमध्ये अजून जास्त हॉटेल्स नाहीत पण तुम्ही होम स्टेचा ऑप्शन घेऊ शकता. जो चांगला आणि स्वस्तही आहे. एमटीडीसीची इकडे कॉटेजेस आहेत. हरिहरेश्वराला कधीही वर्षभरात कधीही भेट देऊ शकता पण जास्त उन्हाळा असल्यास मात्र टाळा.

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यापासून छोटासा ब्रेक हवा असल्यास हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी. कारण हरिहरेश्वरमध्ये तुमच्याकडे दोन्ही पर्याय आहेत एक म्हणजे तीर्थाटन आणि दुसरा म्हणजे समुद्र पर्यटन.

हेही वाचा – 

New Year Plans: ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं 

फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात 

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

Read More From Budget Trips