लाईफस्टाईल

वटपौर्णिमा माहिती 2022, शुभ मुहूर्त | Vat Purnima Information In Marathi

Dipali Naphade  |  Jun 1, 2021
वटपौर्णिमा माहिती 2022, शुभ मुहूर्त | Vat Purnima Information In Marathi

वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण. खरंतर या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते असं म्हणायला हवं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे. महाराष्ट्रीयन महिला हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात. एकमेंकीना खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आणि त्याची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या नवऱ्यासाठी उपवास ठेवते. बायका खास वटपौर्णिमा साठी बनवलेले उखाणे घेऊन नाविन्य आणि उत्साह दाखवतात.

वटपौर्णिमा शुभ मुहूर्त 2022

वटपौर्णमेचा हा सण मंगळवार, 14 जून 2022 रोजी आला आहे. साधारण जून महिन्यातच ही वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पहाटे 3.32 पासून ते 25 जून रात्रौ 12.09 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही वडाची पूजा करू शकता. वटपौर्णिमा म्हणजे नक्की काय आणि याचा काय इतिहास आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊ. 

वटपौर्णिमा माहिती – Vat Purnima Information In Marathi

Vat Purnima Information In Marathi

वटपौर्णिमा ही अनादी कालापासून चालत आलेली हिंदू धर्मातील परंपरा आहे. यामागील इतिहास नेहमी रंजकपूर्वक सांगितला जातो. वटपौर्णिमा का आणि कशासाठी करतात सावित्रीने यमदेवाकडून आपला पती सत्यवानाचे प्राण याच दिवशी परत आणले. त्यामुळे सुवासिनींसाठी हा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ही घटना ज्यादिवशी घडली त्यादिवशी पौर्णिमा होती. त्या दिवसापासून सुवासिनी महिला या पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे. त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. खरं तर हे व्रत तीन दिवसांचे असते. पण आता महिलांना तीन दिवस हे व्रत करणे शक्य नाही. त्यामुळे केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करून हे व्रत करण्यात येते. आपल्याकडे अनेक महिला खास या दिवशी सुट्टी घेऊन हे व्रत करतात आणि अगदी सजूनधजून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात. 

वटपौर्णिमेची कथा

पौराणिक कथेनुसार, भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासह राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात नवऱ्याबरोबर राहून सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभ केले. 

सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने या गोष्टीसाठी नकार दिला आणि आपल्या पतीसह जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले. तिसरे वरदान मागताना, मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने तथास्तु असे म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. यावेळी वेगवेगळे उपवास पदार्थही घरी बनविण्यात येतात.

खरं सांगायचं तर वटपौर्णिमा हे पूर्वीच्या काळी एकत्र जमण्याचं निमित्त होतं. वडाच्या झाडाजवळ चांगला ऑक्सीजन मिळतं तो म्हणजे अगदी दोन्ही अर्थाने. एक म्हणजे श्वासोच्छवासाचा ऑक्सीजन आणि दुसरा म्हणजे आपल्या मैत्रिणींचा थोड्या कालावधीसाठी का असेना पण मिळणारा सहवास. कारण पूर्वी ‘रांधा वाढा उष्टी काढा’ हेच स्त्रियांचं काम होतं. सर्व महिलांना त्याकाळी नटण्याची आणि एकत्र राहण्याची संधी मिळायची. आताही हाच उद्देश बऱ्याच अंशी असतो. तर यावेळी एकमेकींना चिडवण्यासाठी उखाणेही घेतले जातात. ही एक प्रकराची मजामस्ती या दिवशी करण्यात येते.

वटपौर्णिमा कशी साजरी करावी – How To Celebrate Vat Purnima In Marathi

वटपौर्णिमेची माहिती

सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर वटसावित्री अर्थात वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. गावाकडे आजही या दिवशी वडाला सात फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी गाणी गाऊन प्रार्थना केली जाते. या दिवशी सुवासिनी सौभाग्यलंकार परिधान करून आणि अगदी नव्या कोऱ्या साड्या नेसून खास पूजा करायला एकत्र जमतात. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. पण ती प्रथा योग्य नाही असाही सल्ला देण्यात येतो. वडाची फांदी तोडली म्हणजे त्यातील प्राण निघून जाणे. मग अशा पूजेला कोणताही अर्थ राहात नाही. वडाच्या झाडाखाली जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळते आणि त्यामुळेच तिथे जाऊन ही पूजा करावी असं सांगण्यात येते. संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून तुम्ही वडाची पूजा करून घ्यावी. मात्र यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (coronavirus) घरात राहूनच तुम्ही पूजा करावी असंही आवाहन करण्यात येत आहे. बाहेर जाऊन पूजा करण्यापेक्षा मनोभावे तुम्ही घरच्या घरी उपवास करून देवाकडे प्रार्थना करावी. 

हे व्रत सदर दिवशी केल्याने अखंड सौभाग्यप्राप्ती होते असा समज आहे. तसंच संतानप्राप्तीसाठीही हे व्रत करण्यात येते. या पवित्र दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असाही समज आहे. त्यामुळे आजही आधुनिक महिलाही संपूर्ण रूढी परंपरा जपत ही वडाची पूजा पूर्ण करतात. 

ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी महिला हे व्रत करतात. तर काही महिला हे तीन दिवसाचे पूर्ण व्रत करतात. व्रतारंभ हा पौर्णिमेच्या आधी दोन दिवस करण्यात येतो. तर ज्यांना हे जमणार नसते, त्यांनी दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा. हे तिन्ही दिवस अगदी षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. पण रोज शक्य नसल्यास, घरी पूजा, जप, नामस्मरण करण्यात यावे असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तिसऱ्या दिवशी अर्थात वटपौर्णिमेला नित्यकर्म, आंघोळ आणि देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी.

वटपौर्णिमा पूजेसाठी साहित्य – Pooja Samagri List For Vat Purnima

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही ठराविक साहित्य लागते. तुम्ही जर पहिल्यांदाच ही पूजा करणार असाल आणि तुम्हाला याबद्दल माहीत नसेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. 

वाचा – भगवान शिव वरून मुलांची नावे

वटपौर्णिमा पूजा विधी – Puja Vidhi Of Vat Purnima In Marathi

Instagram

आजही आपल्या घरातील परंपरा आणि आपल्या घरातील वारसा जपण्यासाठी थोरा मोठ्यांना आवडतं. पर्यावरणाच्या दृष्टीनेही आपण वडाला खूपच मानतो. त्यामुळे या दिवशी वडाची पूजा करून त्याच्या दीर्घायुष्यासाठीही प्रार्थना केली जाते. वडाचे झाडे हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते. वडाच्या झाडेचे अनेक फायदे आहेत. या दिवशी प्रत्यक्ष वडाची पूजा करतात. वडाखाली चौरंग मांडून ही पूजा केली जाते अथवा वडाला हळद कुंकू वाहून त्याला धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करण्यात येते. 

यावर्षीही तुम्ही उपवास करणार असाल तर ही वटपौर्णिमेची इत्यंभूत माहिती आम्ही खास तुमच्यासाठी दिली आहे. तुम्ही नक्की याचा उपयोग करा.

POPxo मराठीकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Read More From लाईफस्टाईल