बॉलीवूड

ज्येष्ठ अभिनेता गिरीश कर्नाड यांचं निधन

Dipali Naphade  |  Jun 9, 2019
ज्येष्ठ अभिनेता गिरीश कर्नाड यांचं निधन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेता गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गिरीश कर्नाड 81 वर्षांचे होते. गिरीश कर्नाड यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी नाटक, स्क्रिप्ट रायटिंग आणि दिग्दर्शन या तिनही क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं. महाराष्ट्रातील माथेरानमध्ये 19 मे, 1938 रोजी जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना नाटकांची आवड होती. शाळेत असल्यापासूनच त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तर 1970 मध्ये कन्नड फिल्ममधून त्यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून सुरुवात केली. गेल्या चार दशकांपासून आपल्या लिखाणाने प्रेक्षकांचं मन गिरीश कर्नाड यांनी जिंकून घेतलं होतं. त्यांनी लिहिलेल्या नाटकांचं इंग्रजी आणि अन्य बऱ्याच भाषांमध्येही अनुवाद करण्यात आला आहे. तसंच या नाटकांचं दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक इब्राहिम अल्काझी, अलेक पदमसी, प्रसन्ना, अरविंद गौर, सत्यदेव दुबे, विजया मेहता, श्यामानंद जलान, अमाल अलाना आणि झफर मोहिउद्दीन यांनी केलं.

आई – वडील दोघांमुळे निर्माण झाली नाटकाची गोडी

गिरीश कर्नाड यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं की, त्यांच्या आई – वडिलांना दोघांनाही नाटकांमध्ये रूची होती. त्यांचे वडील त्यावेळी कामामुळे अनेक ठिकाणी फिरत असतं. मराठी कोणतंही नाटक असो अथवा बालगंधर्वांची कोणतीही नाटकं असोत त्यांना या सर्व नाटकांची पूर्ण माहिती असायची. घरामध्ये नेहमीच नाटकाबद्दल चर्चा होत असे आणि त्याचाच परिणाम त्यांच्या मनावर झाला आणि त्यांनाही नाटकामध्ये रूची निर्माण झाली. गिरीश कर्नाड यांनी दूरदर्शनवरील 80 च्या दशकात केलेली ‘मालगुडी डेज’ या मालिकेची छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. मराठी चित्रपट ‘उंबरठा’मधून त्यांनी मराठी प्रेक्षकांवरही राज्य केलं. अनेक मराठी कलाकारांनी गिरीश कर्नाड यांच्याबरोबर काम केलं आहे. सोनाली कुलकर्णीने चेलुवी ( कन्नड) या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी गिरीश कर्नाड यांच्यासोबत काम केलं असतानाचा फोटोही शेअर केला आहे.  

इंग्लंडमध्ये केलं शिक्षण पूर्ण

गिरीश कर्नाड यांनी कर्नाटक आर्ट कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर इंग्लंडमधून आपलं शिक्षण पूर्ण करून पुन्हा भारतात आले. चेन्नईमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सात वर्ष काम प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतरही त्यांचं मन थिएटरमध्येच अडकलं होतं. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ नाटकाला दिला. त्यांनी पूर्णतः साहित्यामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. गिरीश कर्नाड यांनी विविध भाषांमध्ये स्वतः काम केलं असून विविध भाषांमध्ये चित्रपटही बनवले. अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून गिरीश कर्नाड यांची ओळख होती. इतकंच नाही तर राजकारणातही गिरीश कर्नाड सक्रिय होते.

भारत शासनाने केला होता सन्मान

गिरीश कर्नाड यांना भारत शासनाने पद्मश्री आणि पद्मभूषण हे दोन्ही पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. तर कन्नड चित्रपटांसाठी तीन वेळा त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार आणि एक वेळा उत्कृष्ट स्क्रिनप्ले पुरस्कारही फिल्मफेअरसाठी मिळवला होता. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. साहित्यात गिरीश कर्नाड यांचं नाव अजरामर राहील. गिरीश कर्नाड यांच्या मागे त्यांची पत्नी सरस्वती, मुलगा पत्रकार रघु कर्नाड आणि मुलगी डॉक्टर राधा कर्नाड असा परिवार आहे.

फोटो सौजन्य – Instagram

हेदेखील वाचा – 

अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन

World Cancer Day च्या दिवशीच अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन

अभिनेता कादर खान यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन

 

Read More From बॉलीवूड