आपलं जग

सामान्य माणसाच्या नजरेतून #SaveAarey

Aaditi Datar  |  Oct 7, 2019
सामान्य माणसाच्या नजरेतून #SaveAarey

सोमवारी सकाळीच मुंबईकरांना गोरेगावच्या हायवेवरून जाताना सामना करावा लागत होता तो प्रचंड ट्रॅफिक आणि पोलीस बंदोबस्ताचा. आरेतील मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तात बंद ठेवण्यात आला होता. आठवड्याची सुरूवात असल्याने प्रत्येक माणसाच्या वेळेचा खोळंबा झाला होता. तरीपण प्रत्येकाला काळजी आणि उत्सुकता होती ती आरे वृक्षतोडीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची.

गोरेगावकर आणि वृक्षतोड

गोरेगावमध्ये वीकेंडला एकीकडे नवरात्रीचा उत्साह होता आणि दुसरीकडे चर्चा होती ती आरेतील वृक्षतोडीची. पण या वादामुळे सध्या गोरेगावकर आणि आरेतील रहिवासियांचं दैनंदिन जीवन चांगलंच बदललं आहे. कारण एकीकडे चिंता आहे ती पर्यावरणाची आणि दुसरीकडे रोजच्या रूटीनचीही. मी स्वतः गोरेगावकर असून अगदी आरे चेकनाक्याजवळ आमचं घर आहे. त्यामुळे आरे वृक्षतोड आणि त्याबाबतच्या घडामोडी आम्ही रोज पाहत आहोत. प्रत्येक गोरेगावकरांना या घडामोडी सुरू असताना मुंबईबाहेरील नातेवाईकांचे काळजीपूर्ण फोनही येत होते. पण मुंबई पोलिसांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे परिस्थिती आटोक्यात होती. आरे प्रश्नामुळे गोरेगावातील वाहतुकीवर परिणाम होतोय. नवरात्रीत आरे कॉलोनीतील गावदेवीच दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्येही दर्शनाला जाण्याबाबत संभ्रम दिसून आला. याच प्रश्नाने प्रत्येक वॉट्सअप ग्रुप गाजतोय आणि सोशल मीडियाही.

आरे वृक्षतोडीबाबत मुंबईकरांचे मतप्रवाह

Instagram

या मुद्याबाबत मुंबईकरांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाहानुसार पर्यावरणाची हानी करून प्रगती साधता येणार नाही. आरे जंगल हे मुंबईचं फुफ्फुस्स आहे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार जर मुंबईवरचा भार कमी करायचा असेल तर मेट्रो हवीच आणि त्यासाठी वृक्षतोड झाली तरी पुन्हा नव्याने झाड लावण्यात येणार आहेत. मग विरोध का. हे दोन्ही मतप्रवाह त्यांच्या जागी योग्य असले तरी या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असणारा सामान्य मुंबईकरही आहे. ज्याला आरेच्या जंगलात असणाऱ्या वस्तीतील घरी जाता येईल की नाही ही चिंता आहे. काही जणांचा हा रोजचा प्रवासाचा मार्ग आहे. ज्यांचं पोट त्यांच्या रोजंदारीवर आहे. त्यांना ना या आंदोलनाशी घेणं देणं आहे ना वृक्षतोडीशी. त्यांना पुन्हा सर्व लवकर सुरळीत व्हावं असं वाटतंय.

आरे वृक्षतोड आणि मुंबईकर

Shutterstock

खरंतर दिवसेंदिवस मुंबईचा पसारा वाढतोच आहे. त्यामुळे साहजिकच रोजच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम जाणवतोय. त्यामुळेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मेट्रो प्रोजेक्टचं आगमन झालं. दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडसाठी मुंबईतील गोरगाव इथल्या आरे कॉलनीतील तब्बल 2,700 झाड तोडावी लागणार होती. ज्याला मुंबईकरांनी आणि पर्यावरणतज्ञांनी विरोध दर्शविला होता. अनेकांनी मागच्या आठवड्यात मुंबईच्या रस्त्यावर उतरून याबाबत निर्दशनं केली. शनिवारी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. पण आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सगळ्यांचं लक्ष होत, सर्वेाच्च न्यायालय काय निर्णय देतं याबाबत. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला यापुढील वृक्षतोड थांबवण्यास सांगितलं आहे. आत्तापर्यंत जी वृक्षतोड झाली आहे ती ठीक पण यापुढे एकही झाड कापल जाऊ नये.

कलाकारही होत आहेत व्यक्त

मराठी आणि हिंदीतील अनेक कलाकारांनी या सर्व चळवळीत भागही घेतला तर काहींनी मेट्रोच्या बाजूनेही मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटसृष्टीतही याबाबत दोन मतप्रवाह आहेत. पाहूया कलाकारांनी याबाबत केलेले ट्वीट्स.

या प्रश्नांवर सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी नक्कीच तोडगा निघेल आणि सर्व सुरळीत होईल अशी आशा करूया. प्रगतीही महत्त्वाची आहे आणि पर्यावरणाचं जतनही. त्यामुळे या दोन्हीचा सुवर्णमध्ये साधण्यात यावा असं सामान्य मुंबईकरांना वाटतं.

Read More From आपलं जग